ETV Bharat / bharat

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय, 850 जलदगती न्यायालये आणि महत्त्वपूर्ण खनिजांच्या प्रक्रियेला मंजुरी

महिला आणि मुलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांवर कठोर कारवाई करण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे, असं मंत्रिमंडळाच्या निर्णयांबद्दल पत्रकारांना माहिती देताना मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.

Union Minister Ashwini Vaishnaw
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (ANI)
author img

By PTI

Published : November 4, 2026 at 7:27 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

नवी दिल्ली : केंद्र सरकारनं बुधवारी (4 नोव्हेंबर) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये बाल अत्याचार आणि बलात्काराच्या प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी 850 जलदगती न्यायालयांचे (फास्ट-ट्रॅक) बळकटीकरण आणि विस्तार करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. तसंच महिला आणि मुलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांवर कठोर कारवाई करण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे, असं मंत्रिमंडळाच्या निर्णयांबद्दल पत्रकारांना माहिती देताना मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.

850 जलदगती न्यायालये स्थापन करण्यास मंजुरी : बाल अत्याचार आणि बलात्काराच्या प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी 850 जलदगती न्यायालयांचे (फास्ट-ट्रॅक) बळकटीकरण आणि विस्तार करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. ते म्हणाले, "अशा प्रकरणांवर तोडगा काढण्यासाठी विद्यमान कायद्यांचा पूर्णपणे वापर आणि अंमलबजावणी करणे, तसेच नवीन कायदे तयार करण्याच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. फौजदारी कायदा (सुधारणा) अधिनियम, 2018 लागू झाल्यानंतर आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, ऑक्टोबर 2019 मध्ये जलदगती विशेष न्यायालये (FTSCs) स्थापन करण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजना सुरू करण्यात आली, ज्यामध्ये विशेष पॉक्सो (EPOCSO) न्यायालयांचा समावेश आहे." याचबरोबर, "ही न्यायालये बलात्कार आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचं संरक्षण (पॉक्सो) अधिनियम, 2012 अंतर्गत येणाऱ्या गुन्ह्यांशी संबंधित प्रलंबित प्रकरणांची वेळेवर सुनावणी आणि निपटारा करण्यासाठी समर्पित आहेत," असंही त्यांनी सांगितलं.

अधिकृत सांख्यिकी प्रणालीसाठी 4,371 कोटी रुपये मंजूर : केंद्रीय मंत्रिमंडळानं बुधवारी देशाच्या अधिकृत सांख्यिकी प्रणालीत सुधारणा करण्यासाठी 4,371.1 कोटींच्या योजनेला मंजुरी दिली. 'सांख्यिकीय परिवर्तन, विश्लेषण आणि संशोधनासाठी भारत विकास उपक्रम' ही योजना 2030-31 पर्यंत पाच वर्षांसाठी राबविण्यात येईल. दरम्यान, या योजनेचा उद्देश एक गतिमान, रिअल-टाइम डेटावर आधारित आणि भविष्यासाठी सज्ज अशी अधिकृत सांख्यिकी चौकट विकसित करणे हा आहे. तसंच वेळेवर डेटाची उपलब्धता सुनिश्चित करणे, अधिक व्यापक डेटा संकलन, समान डेटा संचांचे उत्तम एकत्रीकरण आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वापरासाठी अनुकूल डेटाबेस तयार करणे ही या योजनेची प्राथमिक उद्दिष्ट्ये आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, या योजनेसाठी एकूण 4,371.1 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

ऊर्जा साठवण प्रणालीसाठी 14,500 कोटींच्या योजनेला मंजुरी : केंद्रीय मंत्रिमंडळानं बुधवारी 2026-27 ते 2030-31 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी 92 गिगावॅट-तास ऊर्जा साठवण क्षमता असलेल्या प्रकल्पाच्या विकासासाठी 14,500 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली. 2030 पर्यंत 500 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जा क्षमता गाठण्याच्या देशाच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे. मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की, या योजनेअंतर्गत तीन तंत्रज्ञानांद्वारे एकूण 92 गिगावॅट-तास साठवण क्षमता विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे. याअंतर्गत, बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली अंतर्गत 30 गिगावॅट-तास, पंप्ड स्टोरेज प्रकल्पांद्वारे 60 गिगावॅट-तास आणि उदयोन्मुख साठवण तंत्रज्ञानाद्वारे 2 गिगावॅट-तास क्षमता विकसित केली जाईल. तसंच ही योजना 2030-31 पर्यंत, म्हणजेच पाच वर्षांसाठी राबविण्यात येईल.

महत्त्वपूर्ण खनिजांच्या प्रक्रियेला मंजुरी : केंद्रीय मंत्रिमंडळानं बुधवारी लिथियम आणि निकेलसारख्या महत्त्वपूर्ण खनिजांच्या प्रक्रियेला प्रोत्साहन देण्यासाठी 2,814 कोटींच्या योजनेला मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की, देशात महत्त्वपूर्ण खनिजांच्या प्रक्रियेला प्रोत्साहन देण्यासाठी 2,814 कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली आहे. महत्त्वपूर्ण खनिजे अर्थव्यवस्था, उद्योग आणि आधुनिक तंत्रज्ञानासाठी अत्यावश्यक आहेत. मात्र, त्यांची मर्यादित उपलब्धता आणि पुरवठा काही निवडक देशांवर अवलंबून असल्यानं एक आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होते.

हेही वाचा :

  1. राहुल गांधी यांचे 'राष्ट्रविरोधी' शिक्के मारणे आणि 'परदेशी संबंध' या मुद्द्यांवर पंतप्रधान मोदींना खुल्या चर्चेचे आव्हान
  2. रशियन परराष्ट्र मंत्र्यांचा फेरफार केलेला व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांकडून ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांच्याविरोधात एफआयआर दाखल
  3. चक्रीवादळ 'मुरासू'चा सहा जिल्ह्यांवर परिणाम; अमित शाहांनी आंध्र प्रदेशला केंद्राकडून मदतीचं दिलं आश्वासन