मोबाईल फोनवरून वाद, कर्नाटकात धाकट्या भावानं केली थोरल्या भावाची हत्या
पोलिसांनी सांगितलं की, मंगळुरू शहरातील बेजाई कोट्टार क्रॉसजवळ मोबाईल फोनवरून झालेल्या किरकोळ वादातून एका व्यक्तीनं आपल्या मोठ्या भावाची निर्घृणपणे चाकूनं वार करून हत्या केली.

Published : August 31, 2026 at 5:27 PM IST
मंगळुरू (कर्नाटक) : मंगळुरूमध्ये मोबाईल फोनवरून झालेल्या वादातून धाकट्या भावानं थोरल्या भावाची चाकूनं वार करून हत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितलं की, रविवारी रात्री मंगळुरू शहरातील बेजाई कोट्टार क्रॉसजवळ मोबाईल फोनवरून झालेल्या किरकोळ वादातून एका व्यक्तीनं आपल्या मोठ्या भावाची निर्घृणपणे चाकूनं वार करून हत्या केली. आदिवेप्पा (40) असं मृत व्यक्तीचं नाव आहे.
पोलिसांनी आरोपीला केली अटक : मंगळूर शहर पोलीस आयुक्त सुधीर कुमार रेड्डी यांनी सांगितलं की, आरोपीचा धाकटा भाऊ राजू (36) याला उरवा पोलिसांनी अटक केली आहे. मूळचे बेळगाव जिल्ह्यातील बैलाहोंगला तालुक्यातील असलेले हे कुटुंब कोट्टार क्रॉसजवळच्या एका भाड्याच्या घरात राहत होते. उदरनिर्वाहासाठी त्यांची आई एक छोटे दुकान चालवते. तर दोन्ही भाऊ मजुरीचं काम करत होते. दोघांनाही दारूचं व्यसन होतं.
मोबाईल फोनवरून दोघांमध्ये वाद : रविवारी रात्री साडेदहा ते अकराच्या दरम्यान मोबाईल फोनवरून त्यांच्यात वाद झाला. जेव्हा भांडण वाढलं, तेव्हा संतापलेल्या धाकटा भाऊ राजूनं मोठा भाऊ अदिवेप्पा याच्यावर चाकूनं वार केले. ज्यावेळी त्यांची आई रात्री दुकान बंद करून घरी परतली. तेव्हा अदिवेप्पा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तिला दिसला. यानंतर त्याला तातडीनं मंगळुरू येथील वेनलॉक रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत झाल्याचं घोषित केलं, असं पोलिसांनी सांगितलं.
गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू : उरवा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून आरोपी राजू याला अटक केली. तसंच पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेबद्दल बोलताना मंगळूर शहर पोलीस आयुक्त सुधीर कुमार रेड्डी म्हणाले, "ही घटना अंतर्गत कौटुंबिक वादातून घडली आहे. या प्रकरणात मृताचा सख्खा भाऊ आरोपी असून, पोलिसांनी त्याला आधीच ताब्यात घेतलं आहे आणि त्याची चौकशी करत आहेत."
हेही वाचा :

