पूजा अर्चेसाठी गेला अन् जीव गमावला : महाराष्ट्राच्या तरुणाचा वाराणसीतील हॉटेलमध्ये आढळून आला मृतदेह
वाराणसीतील हॉटेलच्या खोलीत महाराष्ट्रातील तरुणाचा मृतदेह आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ब्रिज गोपाल दुबे असं मृतदेह आढळून आलेल्या तरुणाचं नाव आहे.

Published : August 29, 2026 at 11:50 AM IST
लखनऊ : महाराष्ट्रातील तरुणाचा वाराणसीतील हॉटेलच्या खोलीत मृतदेह आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना शहरातील सिग्रा पोलीस ठाण्याच्या परिसरातील एका हॉटेलमध्ये शुक्रवारी रात्री उघडकीस आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मात्र त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ब्रिज गोपाल दुबे असं मृतदेह आढळून आलेल्या तरुणाचं नाव आहे. ब्रिज गोपाल दुबे हे ठाण्यातील राहणारे होते, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील तरुणाचा वाराणसीत आढळला मृतदेह : सिग्रा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवकांत मिश्रा यांनी सांगितलं की, "मृताची ओळख ब्रिज गोपाल दुबे अशी पटली आहे. ते धार्मिक कारणास्तव, विशेषतः पूजा-अर्चना करण्यासाठी हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. हॉटेलचे व्यवस्थापक जामवंत यादव यांच्या माहितीनुसार, दुबे यांनी चार दिवसांपूर्वी हॉटेलमध्ये 'चेक-इन' केले होते. त्यांनी ४ क्रमांकाची खोली घेतली होती. मूळचे महाराष्ट्रातील रहिवासी असलेले दुबे मिर्झापूरमार्गे वाराणसीला आले होते. वैद्यकीय उपचार आणि औषधोपचारांसाठी वाराणसीला आल्याचंही त्यांनी व्यवस्थापकाला सांगितलं होतं."
पैशांच्या वसुलीसाठी गेले अन् आढळला मृतदेह : महाराष्ट्राचा तरुणा थांबलेल्या हॉटेलचे व्यवस्थापक पैशाची वसुली करण्यासाठी गेले असता, ही घटना उघडकीस आली. याबाबत व्यवस्थापकानं दिलेल्या माहितीनुसार, "शुक्रवारी रात्री उशीरा जेव्हा हॉटेलचे कर्मचारी पैशांच्या वसुलीसाठी त्यांच्या खोलीबाहेर गेले, तेव्हा दरवाजा उघडला गेला नाही. वारंवार ठोठावूनही आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानं कर्मचाऱ्यांनी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी घटनास्थळी येऊन दरवाजा उघडला असता, ब्रिज गोपाल हे पलंगावर मृत अवस्थेत आढळले."
कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू : प्रभारी अधिकारी शिवकांत मिश्रा यांनी सांगितलं की, "मृत्यूचं कारण तपासलं जात आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली जात आहे. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल, सर्व संबंधित बाबींचा विचार करून तपास केला जात आहे."
हेही वाचा :

