वॉशरुममध्ये शिवाजी महाराजांचे फोटो लावल्याचा आरोप; बँक्वेट हॉलचा मालक असलेल्या आमदाराच्या भावानं काय दिली प्रतिक्रिया?
हरियाणातील फरिदाबाद येथील सिक्री येथील मिलान बँक्वेट हॉलच्या वॉशरूममध्ये शिवाजी आणि राणी पद्मावती यांचे चित्र लावण्यात आल्यानं मोठा वाद निर्माण झाला.


Published : February 23, 2026 at 7:25 PM IST
|Updated : February 23, 2026 at 8:48 PM IST
फरिदाबाद (चंदीगड) : हरियाणाच्या फरिदाबादमधील सिक्री येथील मिलन बँक्वेट हॉलच्या वॉशरूममध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी पद्मावती यांचे छायाचित्र लावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. त्यानंतर महाराष्ट्रासह देशभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे. बँक्वेट हॉलचे मालक, भाजपा आमदाराचे भाऊ टिपरचंद यांनी वॉशरूममध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी पद्मावती यांचे छायाचित्र लावले नसल्याचा दावा केला.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये फरिदाबादच्या सिक्री परिसरातील मिलन बँक्वेट हॉलमध्ये वॉशरूमच्या बाहेर छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी पद्मावती यांचे छायाचित्र लावण्यात आल्याचे दिसून येते. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर बँक्वेट हॉलचे मालक टिपरचंद यांच्यावर चौफेर टीका करण्यात आली. ते हरियाणाचे भाजपा आमदार मूलचंद शर्मा यांचे भाऊ आहेत.
छत्रपति शिवाजी महाराज जी का अपमान महाराष्ट्र कभी सहन नहीं करेगा। महाराज केवल एक ऐतिहासिक व्यक्तित्व नहीं, बल्कि महाराष्ट्र की अस्मिता, स्वाभिमान और प्रेरणा के स्रोत हैं। उनके सम्मान के साथ खिलवाड़ करना पूरे महाराष्ट्र की भावनाओं को ठेस पहुँचाना है। सोशल मीडिया पर वायरल हो रहे…
— Ramdas Athawale (@RamdasAthawale) February 23, 2026
अत्यंत गंभीर आणि अपमानजनक- व्हायरल व्हिडिओचा संदर्भ देत, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कारवाई करण्याची मागणी केली. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं, "महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कधीही सहन करणार नाही. महाराज हे केवळ एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व नाहीत तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे आणि प्रेरणेचे स्रोत आहेत. त्यांच्या सन्मानाशी छेडछाड करणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या भावना दुखावणं आहे. सोशल मीडियावर फिरत असलेल्या व्हिडिओमध्ये, छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी पद्मावती यांचे फोटो वॉशरूममधील "पुरुष-महिला" साइनबोर्डजवळ दाखविल्या आहेत. ही बाब अत्यंत गंभीर आणि अपमानजनक आहे. संबंधित हॉल व्यवस्थापनानं तात्काळ हे फोटो काढून सार्वजनिकरित्या माफी मागावी. जर त्वरित कारवाई केली गेली नाही, तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचतील. त्यांची जबाबदारी पार पाडून कायदेशीर आणि लोकशाही मार्गानं योग्य पावले उचलतील. समाजाच्या सन्मानाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही", असा मंत्री आठवले यांनी इशारा दिला.
लज्जास्पद आहे- काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो वॉशरुममध्ये लावण्याच्या प्रकारावरून कारवाईची मागणी केली. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं," हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्यासाठी एक आदरणीय व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या फोटोचा अशा प्रकारे गैरवापर केला जाऊ शकत नाही. हरियाणा सरकारनं ते फोटो त्वरित काढून टाकावेत, ही विनंती आहे. भाजपा सरकार वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशाचा अपमान का करू देतात? लज्जास्पद आहे".
वॉशरूमबाहेर घोड्याचा फोटो असल्याचा दावा- व्हायरल व्हिडिओ वादाबद्दल, मिलन बँक्वेट हॉलचे मालक आणि भाजपा आमदाराचे भाऊ टिप्पर चंद यांनी सांगितलं की हा व्हिडिओ त्यांच्या बँक्वेट हॉलचा नाही. त्यांना व्हॉट्सअॅपवरून काही फोटो पाठवण्यात आले होते. बँक्वेट हॉलच्या वॉशरूमच्या बाहेर घोड्याचा फोटो लावण्यात आल्याचा त्यांनी दावा केला. प्रशासन सध्या परिसरातील बेकायदेशीर बँक्वेट हॉलवर कारवाई करून पाडत आहे. यामुळे संतप्त होऊन कोणीतरी त्यांच्या बँक्वेट हॉलचे नाव वादात ओढले आहे. . तथापि, शहराबाहेर असल्यानं कॅमेरासमोर स्पष्टीकरण देण्यास नकार दिला.
मिलन बँक्वेट हॉलनं काय दिलं स्पष्टीकरण?दरम्यान, मिलन बँक्वेट हॉलच्या फेसबुक पेजवरून पोस्ट करत वेगळेच स्पष्टीकरण दिल्यानं संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. पोस्टमध्ये म्हटलं की, काही दिवसांपूर्वी, आमच्या रिसॉर्टमध्ये प्रदर्शित केलेल्या काही फोटोबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. प्राचीन ड्रेसिंग शैली दर्शविणारी कलाकृती ही केवळ शौचालय परिसराचे सौंदर्यात्मक वाढीसाठी होती. त्यातून छत्रपती शिवाजी महाराज किंवा राणी पद्मावती यांचे चित्रण किंवा साम्य दाखविण्याचा हेतू नव्हता. कोणत्याही प्रकारे दुखावले गेले असेल किंवा गैरसमज झाला असेल तर आम्ही मनापासून माफी मागतो. आपल्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि आदरणीय व्यक्तींचा आदर करणं आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. समस्या आमच्या लक्षात येताच, एका तासाच्या आत फोटो काढून टाकले आहेत.

