ETV Bharat / bharat

नेपाळ पूर अपडेट : अखेर महाराष्ट्रातील भाविकांचा परतीचा प्रवास सुरू ; दोन विशेष रेल्वे बोगींची व्यवस्था

महाराष्ट्रातील तब्बल 100 भाविक काठमांडूमध्ये अडकले होते. महाराष्ट्र सरकारच्या विनंतीवरुन बिहार सरकारनं त्यांची परतण्याची व्यवस्था केली.

Rescues maharashtra Pilgrims In Nepal Flood
महाराष्ट्रातील भाविकांचा परतीचा प्रवास सुरू (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : August 29, 2026 at 12:13 PM IST

|

Updated : August 29, 2026 at 3:49 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

पाटणा : नेपाळमध्ये आलेल्या पुरात महाराष्ट्रातील तब्बल 100 भाविक काठमांडूमध्ये अडकले होते. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारनं या पर्यटकांना परत आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. महाराष्ट्र सरकारकडून बिहार सरकारकडं मदतीची विनंती करण्यात आली होती. या संवेदनशील प्रसंगी बिहार सरकारनं त्यांची परतण्याची व्यवस्था केली. त्यांना महाराष्ट्रात परत पाठवलं आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागानं आपल्या सोशल मीडिया हँडलद्वारे ही माहिती दिली.

Rescues maharashtra Pilgrims In Nepal Flood
महाराष्ट्रातील भाविकांचा परतीचा प्रवास सुरू (ETV Bharat)

"मी बिहार सरकारचे मनापासून आभार मानतो. त्यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आणि उपलब्ध करून दिलेल्या सुविधांबद्दल मी मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांचा ऋणी आहे. या संकटाच्या काळात आम्हाला मदत केली, त्या सर्वांचेही मी आभार मानतो." -महाराष्ट्रातील भाविक

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार राबवण्यात आली मोहीम : ही संपूर्ण मोहीम मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार राबवण्यात आली. मुख्य सचिव तथा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रधान सचिव यांनी त्यावर देखरेख ठेवली. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या समन्वयानं, सीतामढी जिल्हा प्रशासनानं 28 ऑगस्टला तत्परतेनं पावलं उचलली. प्रशासनानं नेपाळ सीमेवरून सर्व भाविकांना सुरक्षितपणे बाहेर काढलं असून त्यांना सीतामढी इथं आणलं. सीतामढीत या भाविकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली. प्रशासनानं त्यांच्यासाठी अन्न, पिण्याचं पाणी आणि इतर आवश्यक सुविधा पुरवल्या. त्यानंतर, 29 ऑगस्टला पहाटे 2:30 वाजता सर्व भाविकांना सीतामढीहून पाटण्याला सुरक्षितपणे नेण्यात आलं.

"प्रशासनानं आम्हाला दिलेला आधार आम्ही कधीही विसरणार नाही. आमची इतक्या चांगल्या प्रकारे काळजी घेतली जाईल, याची आम्ही कधीच कल्पना केली नव्हती. आम्ही बिहार सरकारचे सदैव ऋणी राहू. तिथं अडकलो असताना आम्ही अत्यंत अस्वस्थ होतो, पण आज इथं आल्यावर आम्हाला घरी आल्यासारखं वाटत आहे." -महाराष्ट्रातील महिला भाविक

दोन अतिरिक्त डबे जोडून पर्यटकांना पाठवलं परत : पाटणा जिल्हा प्रशासनानं भाविकांची राहण्याची सोय 'ओ.पी. साह कम्युनिटी हॉल'मध्ये केली. या पर्यटकांची रात्रीच्या जेवणाची व निवासाची व्यवस्था करण्यात आली. सर्व प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करुन रात्रीच्या वेळी इतर आवश्यक सुविधाही पुरवण्यात आल्या. बिहार सरकारच्या मुख्य सचिवांनी नवी दिल्लीतील रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांशी समन्वय साधला. त्यामुळे 'पाटणा-पूर्णा एक्सप्रेस'ला दोन अतिरिक्त डबे जोडण्यात आले. या विशेष रेल्वेनं 29 ऑगस्टला सकाळी 7:30 वाजता सर्व भाविक रेल्वेनं महाराष्ट्राकडं सुरक्षितपणे रवाना झाले आहेत, अशी माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली. या व्यवस्थेमुळे भाविकांनी आनंद व्यक्त करुन बिहार सरकारचे आभार मानले. त्यांनी सीतामढी आणि पाटणा जिल्हा प्रशासनाच्या तत्परतेचं कौतुक केलं. अधिकाऱ्यांची संवेदनशीलता आणि तत्काळ केलेल्या मदत कार्याबद्दल या भाविकांनी प्रशासनाचे आभार मानले.

Rescues maharashtra Pilgrims In Nepal Flood
महाराष्ट्रातील भाविकांचा परतीचा प्रवास सुरू (ETV Bharat)

"आज राखी पौर्णिमा आहे. राखी पौर्णिमा हा सण महाराष्ट्रासह संपूर्ण देशासाठी मोठा सण आहे. संकटाच्या या काळात, बिहारच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आमच्यासारख्या सर्व भगिनींप्रती एका भावाचं कर्तव्य पार पाडलं आहे." - महाराष्ट्रातील महिला भाविक

परराष्ट्र मंत्रालयानं केली बिहार सरकारची प्रशंसा : महाराष्ट्रातील 106 यात्रेकरूंच्या सुरक्षित परतीसाठी राबवण्यात आलेल्या मदत आणि बचाव कार्याची विविध स्तरांवर प्रशंसा झाली आहे. परराष्ट्र मंत्रालय (MEA) आणि गृह मंत्रालयानं (MHA) बिहार सरकार आणि सीतामढी जिल्हा प्रशासनाच्या तत्पर समन्वयाची आणि मानवतावादी भूमिकेचीही प्रशंसा केली आहे.

हेही वाचा :

  1. नेपाळमधील पूरस्थितीमुळे मृतांचा आकडा 469 वर; शेकडो भारतीयांसह हजारो जण बेपत्ता
  2. नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 प्रवाशांचा परतीचा प्रवास सुरू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने प्रवाशांना दिलासा
  3. नेपाळ आणि तिबेटमधील पूर : अचानक ओढवलेल्या आपत्तीमागे नेमकं काय कारण?
Last Updated : August 29, 2026 at 3:49 PM IST