टीईटी पेपर फूट प्रकरण : महाराष्ट्र पोलिसांची बिहारमध्ये धडक : हाजिपूरमध्ये कॅफेवर छापेमारी
TET Paper Leak प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांनी बिहारच्या वैशालीमध्ये छापेमारी केली आहे. वैशालीमधील एका कॅफेवर महाराष्ट्र पोलिसांनी रात्रभरापासून छापेमारी केली.


Published : July 2, 2026 at 12:32 PM IST
पाटणा : महाराष्ट्रात TET Paper Leak झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी बिहारमधून तीन आरोपींना पकडलं. त्यामुळे प्रकरणाचा कसून तपास महाराष्ट्र पोलीस करत आहेत. त्यात आता महाराष्ट्र एसटीएफ (STF) आणि वैशाली पोलिसांनी TET पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. वैशाली पोलिसांच्या मदतीनं, ठाणे पोलिसांनी बुधवारी रात्री हाजीपूरमधील कचहरी रोडवर असलेल्या एका सायबर कॅफेवर छापा टाकला. या पथकानं रात्रभर कॅफेमध्ये तपास केला, अशी माहिती वैशाली पोलिसांनी दिली आहे.
टीईटी पेपरफुटी प्रकरणी वैशालीमध्ये छापेमारी : वैशाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "पहाटे 1 वाजेपर्यंत चाललेल्या या छाप्यानंतर एसटीएफच्या पथकानं कॅफे मालक सोनू कुमारसह तिघांना ताब्यात घेतलं. महाराष्ट्र एसटीएफचं पथक सध्या या तिघांची चौकशी करत आहे. रात्रभर ठाणे पोलीस आणि वैशाली पोलिसांची पथक कचहरी रोडवरील सायबर कॅफेबाहेर तैनात होती.

महाराष्ट्र पोलिसांना सापडले महत्त्वाचे पुरावे : पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छाप्यात महाराष्ट्र एसटीएफच्या पथकाला अनेक डिजिटल पुरावे सापडले आहेत. या पुराव्याची सखोल तपासणी केली जाईल. या कारवाईनंतर, महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, "महाराष्ट्र टीईटी पेपरफुटीशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे."
"महाराष्ट्रातील टीईटी पेपरफुटी प्रकरणात तपासासाठी आम्ही वैशाली इथं आलो. आम्हाला काही संशयास्पद कागदपत्रं सापडली आहेत. या प्रकरणात कसून तपास सुरू आहे. लवकरच पुढील कारवाई करण्यात येईल." अधिकारी, महाराष्ट्र पोलीस
काय म्हणाला अटक केलेल्या आरोपीचा भाऊ ? : अटक करण्यात आलेल्या सोनूचा मोठा भाऊ जितेंद्र कुमार यानं सांगितलं की, "सोनू बुधवारी संध्याकाळी गाव सोडून हाजीपूरला गेला होता. मात्र तो तिथं पोहोचला नाही आणि घरीही परतला नाही. सोनू फोन उचलत नसल्याचं त्याच्या पत्नीनं कळवलं. रात्रभर त्याचा शोध घेण्यात आला, परंतु तो सापडला नाही."
"सोनू इथं सायबर कॅफे चालवतो. आज जेव्हा आम्ही दुकानावर पोहोचलो, तेव्हा आम्हाला समजलं की तिथं छापा टाकला जात आहे. तपास पथकानं आम्हाला सोनू महाराष्ट्र टीईटी पेपरफुटी प्रकरणात सामील आहे आणि त्याला अटक करण्यात आली आहे, असं सांगितलं. पोलीस माझ्या दुसऱ्या भावाचाही शोध घेत आहेत, तो पाटण्यात राहतो." - जितेंद्र कुमार, आरोपी सोनूचा मोठा भाऊ.
समस्तीपूरच्या बिजेंद्र गुप्ताशी आहे कनेक्टेड : सहदेई येथील रहिवासी असलेला सोनू 2009 पासून हाजीपूरमध्ये सायबर कॅफे चालवत आहे. त्याचे संबंध समस्तीपूरचा रहिवासी आणि पेपरफुटी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असलेल्या बिजेंद्र गुप्ताशी आहेत. यापूर्वी, महाराष्ट्रात अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींच्या चौकशीदरम्यान सोनूचा धाकटा भाऊ विकास याचं नाव समोर आलं होतं. या माहितीमुळेच पोलीस पाटण्यातील सायबर कॅफेपर्यंत पोहोचले, अशी माहिती वैशाली पोलीस सूत्रांनी दिली आहे.
पेपरफुटीचे बिहारमध्ये धागेदोरे : TET पेपरफुटीनंतर पोलिसांनी भिवंडीमध्ये छापेमारी केली. त्यातून या प्रकरणाचे बिहार आणि हरियाणात धागेदोरे असल्याचं स्पष्ट झालं. त्यानुसार बिहारमधून आणि हरियाणातून आरोपींना अटक करण्यात आलं. आरोपींच्या चौकशीतून बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील बिजेंदर गुप्ताचं नाव समोर आलं. तेव्हापासून महाराष्ट्र एसटीएफ (STF) पथक विविध राज्यांमध्ये छापेमारी करत आहे.
बिजेंदर गुप्ताची पत्नी अटकेत : बिजेंद्र गुप्ताच्या शोधात महाराष्ट्र एसटीएफ पथक बिहारमध्येही दाखल झालं. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य सूत्रधाराचा शोध घेत असताना हे पथक समस्तीपूरमधील त्याच्या घरी तळ ठोकून आहे. दरम्यान, एसटीएफ पथकानं बिजेंद्र गुप्ताच्या पत्नीला पाटण्यात अटक केली असून तिची सध्या चौकशी सुरू आहे. टीईटी पेपरफुटीचा तपास करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचं एक पथक गेल्या काही दिवसांपासून बिहारमध्ये आहे. वैशाली पोलिसांच्या सूत्रांनुसार, हाजीपूरमध्ये तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून महाराष्ट्र पोलीस सध्या त्या तिघांचीही चौकशी करत आहेत.
टीईटी पेपरफुट प्रकरण : टीईटी परीक्षेसाठी महाराष्ट्रातील 4.28 लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती. परंतु 28 जून रोजी नियोजित असलेल्या परीक्षेच्या अवघ्या 24 तास आधी पेपर फुटला. परिणामी, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं ही परीक्षा रद्द केली.
हेही वाचा :

