बिहारमध्ये 'महागठबंधन'चा दारुण पराभव, तेजस्वी यादव यांना विरोधी पक्षनेतेपद जेमतेम राखता आलं
तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला दारुण पराभव पत्करावा लागला. विरोधी पक्षनेतेपद जेमतेम राखता आले.

Published : November 14, 2025 at 8:02 PM IST
|Updated : November 14, 2025 at 8:25 PM IST
पाटणा (बिहार) : २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. २०० हून अधिक जागांच्या विजयासह, एनडीए पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, २०१० च्या निवडणुकीनंतर आरजेडीला सर्वात मोठा पराभव पत्करावा लागला आहे. तेजस्वी यादव यांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न तर भंगलंच, पण विरोधी पक्षनेतेपदही त्यांना वाचवण्यात थोडक्यात यश आले.
RJD ला विरोधी पक्षनेते पद : २४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेत विरोधी पक्षनेता होण्यासाठी १०% जागा जिंकणे अनिवार्य आहे. त्यामुळे २४ जागा जिंकणे अत्यावश्यक होते. सध्याची परिस्थिती पाहता राष्ट्रीय जनता दल किमान २५ जागा जिंकण्यात यशस्वी झाले. त्यामुळं विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रीय जनता दल दावा करु शकणार आहे.

तेजस्वी यादव यांनी स्वतः वैशाली जिल्ह्यातील राघोपूर विधानसभा मतदारसंघातून विजय प्राप्त केला आहे. त्यांनी भाजपा उमेदवार सतीश कुमार यादव यांचा सुमारे १४,००० मतांनी पराभव केला. ही लढत कठीण होती आणि तेजस्वी यादव हे अनेक फेऱ्यांमध्ये पिछाडीवर होते. अखेर त्यांनी विजय मिळवला.
तेजस्वी यादव तिसऱ्यांदा विजयी : राजद नेते तेजस्वी यादव राघोपूर विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत. त्यांनी २०१५ आणि २०२० मध्येही विजय मिळवला होता. तिन्ही वेळा त्यांनी भाजपा उमेदवार सतीश कुमार यादव यांचा पराभव केला.

पंतप्रधान मोदींचं संबोधन : बिहार विधानसभा निवडणूक निकालानंतर देशभरात भाजपा नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या जनतेचे आभार मानत, काँग्रेस आणि यादव परिवाराच्या जंगलराजवर जोरदार हल्लाबोल केला. या निकालानं जनतेचा निवडणूक आयोगावरील विश्वास अजून वाढल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले.
हेही वाचा -

