'सिंघम' शिवदीप लांडे यांचा बिहार विधानसभा निवडणुकीत पराभव; किती मते मिळाली?
माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा बिहारमधील जमालपूर मतदारसंघाच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. संयुक्त जनता दलाचे उमेदवार नचिकेत मंडल विजयी झाले आहेत.

Published : November 14, 2025 at 7:27 PM IST
|Updated : November 14, 2025 at 10:52 PM IST
हैदराबाद- आयजीपी पदाचा राजीनामा देऊन राजकारणात कारकीर्द आजमावू पाहणाऱ्या माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांना विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला आहे. जमालपूर मतदारसंघात संयुक्त जनता दलाचे उमेदवार नचिकेत मंडल यांनी शिवदीप लांडे यांचा पराभव केला.
शिवदीप लांडे यांना २७ व्या मतफेरीत एकूण १५,४१९ मते मिळाली. तर विजयी झालेले संयुक्त जनता दलाचे उमेदवार नचिकेत मंडल २७ व्या मतफेरीत ९२,७८६ मते मिळाली. त्यांना शेवटच्या म्हणजे २९ व्या फेरीत ९६,६९३ मते मिळाली. त्यांनी इंडियन इन्क्ल्यूझिव्ह पार्टीचे उमेदवार नरेंद्र कुमार यांचा ३६,२२८ मतांनी पराभव केला. नरेंद्र कुमार यांना ६०,४५५ मते मिळाली आहेत. तर शेवटच्या फेरीत शिवदीप लांडे यांना १५,६५५ मते मिळाली आहेत. त्यांचा ८१,०२८ मतांनी पराभव झाला आहे.
- बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी हिंदू सेना या स्वतंत्र पक्षाची स्थापना करून राज्यातील अनेक जिल्ह्यांचा दौरा केला होता. राज्यातील राजकारणातून घराणेशाही पूर्णपणे नष्ट करायची आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून तरुणांना त्यांनी राजकारणात येण्याचं आवाहन केलं होतं.
शिवदीप लांडे यांनी विधानसभा निवडणुकीत २४३ जागांवर तरुण उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, त्यांनी मुंगेर जिल्ह्यातील जमालपूर जागेवरुन अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. शिवदीप लांडे हे माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांचे जावई आहेत. ४८ वर्षीय शिवदीप लांडे हे २००६ च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवेचे अधिकारी होते. त्यांनी १९ सप्टेंबर २०२४ रोजी सरकारला राजीनामा सादर दिला. राजीनामा दिल्यानंतर त्यांना पूर्णियाहून बिहार पोलीस मुख्यालयात बोलावण्यात आले. त्यांच्यावर आयजी प्रशिक्षणाची जबाबदारी देण्यात आली. ११७ दिवसांनंतर १३ जानेवारी २०२५ रोजी राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्वीकारला. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर, गृह विभागानं १४ जानेवारी रोजी त्यांचा राजीनामा स्वीकारल्याबाबत अधिसूचना जारी केली.
'सिंघम' म्हणून ओळख असलेल्या लांडे यांना जनतेनं नाकारलं- शिवदीप लांडे यांनी गुन्हेगारांवर कडक कारवाई करून बिहारचे सिंघम म्हणून ओळख निर्माण केली. त्यांना जनतेला मोठा पाठिंबा मिळाला. प्रत्यक्षात निवडणुकीच्या रिंगणात त्यांना जनतेकडून प्रतिसाद मिळाला नाही. ओळखले जाणारे शिवदीप लांडे यांनी पहिल्यांदाच स्वतंत्र उमेदवार म्हणून येथे निवडणूक लढवली. परंतु त्यांना जनतेचा पाठिंबा मिळविण्यात यश आलं नाही.
बिहार विधानसभा निवडणुकीत काय आहे चित्र? २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीचे काही निकाल हाती आले आहेत. सकाळपासूनच्या मतमोजणीत एनडीए पूर्ण बहुमतानं सरकार स्थापन करत असल्याचं चित्र आहे. भाजपा बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला येत आहे. तर संयुक्त जनता दल (जेडीयू) दुसऱ्या स्थानावर आहे. तर राष्ट्रीय जनता दल तिसऱ्या स्थानावर घसरत असल्याचं दिसून आलं आहे. २०२० च्या विधानसभा निवडणुकीत राजद हा सर्वात मोठा पक्ष होता. संयुक्त जनता दलाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संजय कुमार झा म्हणाले, २० वर्षे सरकारचं नेतृत्व केल्यानंतरही, बिहारमधील लोकांमध्ये नितीश कुमार यांची लोकप्रियता वाढतच आहे. त्याचा अर्थ लोकांचा त्यांनी केलेल्या कामावर विश्वास आहे. त्यांना बिहारच्या जनेतनं पाठिंबा दिला आहे.
हेही वाचा-

