भारतीय सीमेवर घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानच्या घुसखोराला ठोकल्या बेड्या
पाकिस्तानच्या घुसखोरानं भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्यानं मोठी खळबळ उडाली. या घुसखोराला सीमा सुरक्षा दलानं पकडलं असून त्याचा कसून तपास सुरू आहे.

Published : January 1, 2026 at 7:16 PM IST
जैसलमेर : नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सीमा ओलांडून घातपात घडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानच्या घुसखोराला सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पकडलं. या घुसखोराला पकडून भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी मोठा घातपाताचा प्रयत्न हाणून पाडला. ही घटना नाचना सेक्टरमध्ये घडली असून 72 व्या बटालियनचे जवान नियमित गस्त घालत होते. यावेळी धुक्यात जवानांना हा घुसखोराला आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतीय सीमेत घुसताना पाहिल्यानंतर त्याला पकडण्यात आलं. इशरत राणा मोहम्मद अस्लम असं त्या घुसखोराचं नाव आहे.
भारतीय सीमेत घुसखोरी करत होता पाकिस्तानचा घुसखोर : पाकिस्तानी घुसखोराला भारतीय सीमेकडं येताना पाहून सीमा सुरक्षा दलाचे सतर्क झाले. या जवानांनी तत्काळ परिसराला घेराव घातला. यावेळी घुसखोरानं काटेरी तार ओलांडून भारतीय सीमेत प्रवेश करताच त्याला जागीच ताब्यात घेण्यात आलं. प्रजासत्ताक दिनापूर्वी झालेली ही घुसखोरी गंभीर बाब मानून, बीएसएफ आणि गुप्तचर संस्था त्याची कसून चौकशी करत आहेत. हा घुसखोर हेरगिरीच्या कारवायांमध्ये सहभागी असल्याची शक्यता सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना आहे.
पाकिस्तानच्या सरगोधाचा राहणारा आहे घुसखोर : या घुसखोराला 'ऑपरेशन अलर्ट' अंतर्गत अटक करण्यात आलं आहे. या घुसखोराला जवळच्या सीमा सुरक्षा दलाच्या चौकीत नेण्यात आलं. प्राथमिक चौकशीदरम्यान, त्यानं स्वतःची ओळख इशरत राणा मोहम्मद अस्लम (35) अशी सांगितली आहे. तो पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सरगोधा जिल्ह्यातील रहिवासी आहे, असंही त्यानं सांगितलं. चौकशीदरम्यान तो घाबरलेला आणि अस्वस्थ दिसून आल्यानं सीमा सुरक्षा दलाच्या जवानांचा त्याच्यावरील संशय बळावला आहे. बीएसएफच्या सूत्रांनुसार, "शोधमोहिमेदरम्यान त्याच्याकडून कोणतीही शस्त्रं, कागदपत्रं किंवा संशयास्पद वस्तू सापडल्या नाहीत. मात्र चौकशीदरम्यान त्यानं वारंवार आपला जबाब बदलला. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांच्या संशयाला आणखी बळकटी मिळाली. त्याची मानसिक स्थिती तपासण्यासाठी वैद्यकीय तपासणी देखील केली जात आहे. सध्या, बीएसएफ आणि इतर सुरक्षा यंत्रणा संयुक्तपणे त्याची चौकशी करत आहेत. सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर त्याला नाचना पोलीस ठाण्यात सोपवलं जाईल."
हेही वाचा :
- गोपनीय माहिती पुरवली पाकिस्तानी हस्तकांना ; हवाई दलाच्या माजी अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- ऑपरेशन सिंदूर इफेक्ट; पाकिस्तानला भरली होती धडकी, राष्ट्राध्यक्ष झरदारी यांना दिला होता बंकरमध्ये आश्रय घेण्याचा सल्ला
- पाकिस्तानस्थित दहशतवादी नेटवर्कचा दिल्लीत पर्दाफाश; तीन दहशतवादी अटकेत, अनेक ठिकाणं हिटलिस्टवर

