ETV Bharat / bharat

बिहारच्या भागलपूर येथे भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू; अनेकजण गंभीर जखमी

बिहारच्या भागलपूर इथं मोठा रस्ता अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. खारिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बागडी पुलाजवळ एनएच-31 वर हा अपघात घडला.

Bhagalpur Bihar Road Accident
भागलपूर येथे भीषण अपघात (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 24, 2026 at 7:21 PM IST

|

Updated : February 24, 2026 at 8:52 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

भागलपूर (बिहार) : इथं मोठा रस्ता अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. खरं तर दोन वाहनांची जोरदार धडक झाली. या धडकेत जवळ उभ्या असलेल्या इतर वाहनांतील लोकही या अपघाताच्या तडाख्यात सापडले. प्रशासनाने आतापर्यंत 4 जणांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी केली असून 8 ते 9 जण गंभीर जखमी आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे.

अपघात कुठे आणि कसा घडला? : हा अपघात खारिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बागडी पुलाजवळ, एनएच-31 महामार्गावर घडला. भरधाव वेगानं येणाऱ्या ट्रकनं पिकअप व्हॅनला जोरदार धडक दिली. धडकेनंतर पिकअप अनियंत्रित होऊन समोरून येणाऱ्या ई-रिक्शाला धडकली. तसेच जवळ उभी असलेली बसही या अपघातात सापडली.

या भीषण अपघातात 10 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असली तरी प्रशासनानं अद्याप 6 मृत्यूंचीच पुष्टी केली आहे, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सर्व जखमींना प्रथमोपचारासाठी बिहपूर रुग्णालयात दाखल केलं, त्यानंतर त्यांना जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल इथं रेफर करण्यात आलं आहे. ई-रिक्षातील चारही प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे, तर इतर दोघांचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला.

मृतांमध्ये एक महिला आणि एका मुलाचा समावेश : मृतदेह शवविच्छेदनासाठी भागलपूरमधील मायागंज रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मृतांपैकी तीन जण कटिहारमधील समेली आणि एक खगारियामधील मानसी येथील असल्याचे समजते. इतर दोघांची ओळख पटवण्याचं काम सुरू असून पुढील तपास सुरू आहे. मृतांमध्ये एक महिला, एक मूल आणि 4 कामगारांचा समावेश आहे. ते वीटभट्टीवरील कामावरून परतत असताना त्यांचा अपघात झाला.

एसपी काय म्हणाले?: नवगछियाच्या पोलीस अधीक्षक प्रेरणा कुमार यांनी सांगितलं की, झंडापूर पोलीस स्टेशन परिसरातील बागडी पुलाजवळ हा अपघात झाला. यात 4 जणांचा जागेवर मृत्यू झाला, तर 12 ते 15 जण जखमी झाले. त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असून त्यांना मायागंज रुग्णालयात नेण्यात आलं आहे.

'सर्वांना वेळेवर रुग्णालयात नेण्यात आलं' : जखमींना पुढील उपचारांसाठी भागलपूर इथं रेफर करण्यात आले आहे. डॉक्टरांनी आतापर्यंत चार जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. 12 ते 15 जण जखमी आहेत. किरकोळ जखमींवर उपविभागीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.' - प्रेरणा कुमार, पोलीस अधीक्षक, नवगछिया


Last Updated : February 24, 2026 at 8:52 PM IST