ETV Bharat / bharat

पतीच्या हत्येप्रकरणी पत्नी आणि तिच्या प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा, खोटे दावे फेटाळले

बंगळुरूमधील 67 व्या शहर दिवाणी न्यायालयानं पती सतीशची हत्या केल्याप्रकरणी त्याची पत्नी कल्पना आणि तिचा प्रियकर जावेद पाशा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Bengaluru Court sentences wife, lover to life imprisonment for killing husband
कल्पना आणि तिचा प्रियकर जावेद पाशा (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : July 8, 2026 at 4:41 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

बंगळुरू : कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये पतीच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळून, नंतर त्याची हत्या केल्याप्रकरणी पत्नी आणि तिच्या प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बंगळुरूमधील 67 व्या शहर दिवाणी न्यायालयानं पती सतीशची हत्या केल्याप्रकरणी त्याची पत्नी कल्पना आणि तिचा प्रियकर जावेद पाशा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसंच, त्यांना प्रत्येकी 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असून, दंड न भरल्यास त्यांना आणखी एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागेल, असा आदेश देण्यात आला आहे.

जन्मठेपेची सुनावली शिक्षा : 2017 मध्ये सतीशची हत्या झाली होती. याप्रकरणी बंगळुरूमधील यशवंतपूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक वाय. मुद्दूराज यांनी गुन्हा दाखल करून आरोपी कल्पना आणि तिचा प्रियकर जावेद पाशा यांना अटक केली होती. तसंच न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. दरम्यान, खटल्याच्या सुनावणीदरम्यान, आरोपी कल्पना आणि तिचा प्रियकर जावेद पाशा यांनीच सतीशचा खून केल्याचं सिद्ध झाल्यामुळं न्यायमूर्ती ए. जयप्रकाश यांनी त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

प्रियकरासोबत केलं होतं पलायन : सतीश आणि त्याची पत्नी कल्पना शहरातील यशवंतपूर भागातील एका घरात राहत होते. सतीशला माहीत नव्हतं की, त्याच्या पत्नीचं जावेद पाशासोबत प्रेमसंबंध होते. 18 एप्रिल 2017 रोजी तिनं आपल्या पतीला सोडून आपल्या प्रियकरासोबत पलायन केलं होतं. याबाबत काहीच माहिती नसल्यामुळं सतीशनं पोलिसांत आपली पत्नी हरवल्याची तक्रार दाखल केली होती. दरम्यान, आपला नवरा आपल्या नात्यात अडथळा आणत आहे, असं वाटल्यामुळं पत्नी कल्पना आणि जावेद पाशा यांनी सतीशला ठार मारण्याचा कट रचला.

विषबाधेनं मृत्यू झाल्याचा खोटा दावा : काही दिवसांनी घरी परतल्यावर 22 मे 2017 च्या रात्री कल्पनानं झोपेच्या गोळ्या बारीक करून सतीशच्या जेवणात मिसळल्या. जेव्हा सतीश झोपला, तेव्हा तिनं आपल्या प्रियकराला घरी बोलावलं. यानंतर कल्पनानं सतीशची मान एका कापडानं घट्ट पकडली, तर जावेदनं त्याला ओरडण्यापासून रोखण्यासाठी त्याच्या तोंडात कापड कोंबले. त्यानंतर त्यांनी घरात सापडलेल्या एका लहान दगडानं सतीशची हत्या केली. आपल्या पतीची हत्या केल्यानंतर कल्पनानं त्याचा मृत्यू विषबाधेनं झाल्याचा खोटा दावा केला. तसंच कल्पनानं पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि गुन्ह्यात वापरलेलं सिम कार्डही नष्ट केलं. मात्र, न्यायालयीन सुनावणीदरम्यान साक्षीदारांचे जबाब, तांत्रिक पुरावे आणि वैद्यकीय अहवालांनी गुन्हा सिद्ध केला.

हेही वाचा :

  1. दुबईहून परतलेल्या पतीची हत्या; आधी छतावरून खाली ढकललं, नंतर इंजेक्शन देऊन मारलं
  2. जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळल्या, उशीने नाक-तोंड दाबून हत्या; पत्नीने प्रियकरासोबत मिळून नवऱ्याला संपवलं
  3. शोपियान चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी ठार; शस्त्रे आणि दारुगोळा जप्त, शोधमोहीम सुरू