ETV Bharat / bharat

आग्रा बाथरूम हत्याकांड कसं घडलं? आरोपी पत्नीने पोलिसांना दिलेल्या जबाबात काय सांगितलं?

पोलिसांच्या चौकशीदरम्यान, आरोपी रुबीनं कबूल केलं की, तिचा पती स्वतःहूनच गायब होऊ इच्छित होता. यामुळे तिला बऱ्याच काळापासून अपेक्षित असलेली एक संधी मिळाली.

Agra Bathroom Murder Case
आग्रा बाथरूम हत्याकांड (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : July 5, 2026 at 11:18 AM IST

7 Min Read
Choose ETV Bharat

आग्रा (उत्तर प्रदेश) : येथील पतीची हत्या करून त्याचा मृतदेह घरातील बाथरूममध्ये पुरल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पत्नीला शनिवारी (4 जुलै) उशिरा न्यायालयात हजर करण्यात आलं. यानंतर न्यायालयानं तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलीस चौकशीत आरोपी पत्नी रूबीनं पतीची हत्या आपण एकटीनेच केल्याचा दावा कायम ठेवला. अनेक तासांच्या चौकशीनंतरही तिनं आपल्या जबाबात कोणताही बदल केला नाही. तसेच या प्रकरणात इतर कोणाचा सहभाग असल्याचे कोणतेही ठोस पुरावे किंवा धागेदोरे पोलिसांना अद्याप मिळालेले नाहीत.

'पती स्वतःहूनच गायब होऊ इच्छित होता' : पोलिसांच्या चौकशीदरम्यान, आरोपी रुबीनं कबूल केलं की, तिचा पती स्वतःहूनच गायब होऊ इच्छित होता. यामुळे तिला बऱ्याच काळापासून अपेक्षित असलेली एक संधी मिळाली आणि ती संधी तिला अजिबात गमावायची नव्हती. जेव्हा तिचा पती मद्यधुंद अवस्थेत घरी परतला, तेव्हा तिनं आपली योजना अंमलात आणली. हे करताना तिनं आपल्या दोन मुलींना किंवा वृद्ध सासूला याची पुसटशीही कल्पना येऊ दिली नाही. बाथरूममध्ये दडवून ठेवलेलं हे गुपित कधीच उघड होणार नाही, अशी तिची खात्री होती. त्यामुळे बाथरूममध्ये मृतदेह पुरण्यासाठी खड्डाही तिने स्वतःच खोदल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मृतदेह पुरल्यानंतर बाथरूमची फरशीचं बांधकाम : आरोपी पत्नी रूबीनं पोलीस चौकशीत आणखी धक्कादायक खुलासे केले आहेत. मृतदेह पुरल्यानंतर संशय येऊ नये म्हणून तिनं बाथरूमच्या फरशीचं नव्यानं पक्कं बांधकाम करून घेतल्याचं चौकशीत समोर आलं आहे. रूबीनं पोलिसांना सांगितलं की, बाथरूमच्या फरशीचं बांधकाम करण्यासाठी तिनं सुमारे 400 रुपयांचे बांधकाम साहित्य खरेदी केलं आणि 500 रुपये मजुरी देऊन फरशी तयार करून घेतली. मात्र, कालांतरानं हे गुपित उघडकीस येईल, या भीतीनं ती सतत अस्वस्थ होती. अखेर तिनेच संपूर्ण प्रकाराची माहिती पोलिसांना दिल्याचं समोर आलं आहे.

काय आहे आग्रा बाथरूम हत्याकांड? : काही दिवसांपूर्वी आग्रा शहरातील सिकंदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहतोरा येथील रेणुका धाम परिसरात राहणारे 44 वर्षीय सुरेंद्र कुमार शर्मा यांचा सांगाडा त्यांच्या घरातील बाथरूममध्ये पुरलेल्या अवस्थेत आढळला होता. या प्रकरणात त्यांची पत्नी रूबीने तब्बल 45 दिवस पती बेपत्ता असल्याचं सांगून दोन्ही मुली, वृद्ध सासू, नातेवाईक आणि परिचितांची दिशाभूल केली होती.

रूबीने 26 मे रोजी सिकंदरा पोलीस ठाण्यात पती बेपत्ता झाल्याची तक्रारही दाखल केली होती. मात्र, पोलीस तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, त्याआधीच 17 मेच्या रात्री तिनं पतीला झोपेच्या गोळ्या देऊन त्याची हत्या केली होती.

खिरीत झोपेच्या 20 गोळ्या मिसळल्याचा दावा : पोलीस चौकशीत रूबीनं सांगितलं की, 17 मेच्या रात्री सुरेंद्र शर्मा बाजारातून मटण घेऊन आले होते. त्यांच्या ब्राह्मण कुटुंबात मांसाहार केला जात नसतानाही पती त्याकडे दुर्लक्ष करत होता. त्या रात्री त्यानं मद्यपान करून मटण खाल्लं आणि त्यानंतर गोड खाण्याची इच्छा व्यक्त केली.

यावेळी आपण पतीसाठी खीर बनवली आणि त्यामध्ये झोपेच्या सुमारे 20 गोळ्या मिसळून दिल्याचा दावा रूबीनं पोलीस चौकशीत केल्याची माहिती समोर आली आहे.

'मुलींना सासूच्या खोलीत पाठवले' : पोलीस चौकशीत रुबीनं सांगितलं की, त्या रात्री पहाटे 3 च्या सुमारास तिला जाग आली आणि तिच्या पतीच्या शरीरात कोणतीही हालचाल होत नसल्याचं तिच्या लक्षात आलं. त्यानंतर, हृदयाचे ठोके ऐकण्याच्या उद्देशाने तिनं आपलं डोकं त्यांच्या छातीवर टेकवलं. शरीरात जीव असल्याचं कोणतंही लक्षण न आढळल्यानं, तिचा पती मरण पावला असावा असा निष्कर्ष तिनं काढला. पहाट होताच, तिनं सर्वप्रथम आपली सासू कमला यांना सांगितलं की, तिला भरतपूरहून तिच्या वडिलांच्या मामांचा फोन आला होता.

सुरेंद्रनं तिथं गोंधळ घातला आणि त्याच्याविरोधात भरतपूर पोलिसांमध्ये तक्रार दाखल झाली आहे. आता पोलीस त्याला पकडण्याच्या तयारीत आहेत. या प्रकारामुळे तिची वृद्ध सासू घाबरली. हे पाहून रुबीनं आपल्या प्राची आणि सिद्धी या दोन मुलींना उठवलं आणि सासूला सोबत घेऊन त्यांना शाहगंजमधील 'वायू विहार' इथं राहणाऱ्या आपला दीर अनिल कुमार शर्मा यांच्या घरी पाठवून दिलं. यानंतर पतीचा मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची? याचा तिनं विचार केला.

400 रुपयांमध्ये अर्ध्या ट्रॉलीभर माती मागवली : रूबीच्या म्हणण्यानुसार, तिने पतीचा मृतदेह ओढत बाथरूममध्ये नेला आणि फावड्यानं खड्डा खोदून त्यामध्ये मृतदेह पुरला. या संपूर्ण घटनेची शेजाऱ्यांनाही कल्पना आली नाही, असा दावा तिनं केला.

त्यानंतर तिने सुमारे 400 रुपये देऊन अर्धी ट्रॉली माती मागवली. दरवाज्याजवळ उतरवलेली माती बादलीत भरून बाथरूममध्ये टाकत मृतदेह पूर्णपणे झाकून टाकला. त्यानंतर बाथरूमचा पृष्ठभाग स्वतः सपाट केला. पुरावे लपवण्यासाठी तिनं एक पोतं सिमेंट आणि थोडी वाळू मागवली. 19 मे रोजी दोन मजुरांकडून अवघ्या एका तासात बाथरूमची फरशी नव्यानं बांधून घेतली. काम पूर्ण झाल्यानंतर तिनं घराला कुलूप लावून दीर अनिल कुमार शर्मा यांच्या घरी जाऊन पती कुठेतरी निघून गेले असून त्यांचा मोबाईलही घरीच राहिल्याचं सांगत सर्वांची दिशाभूल केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

बाथरूमची फरशी उंच झाल्याचा मुलीला संशय, यामुळे रूबी घाबरली : रूबीनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ती 19 मे रोजी दीर अनिल शर्मा यांच्या घरी गेली होती. तिथं ती 26 मेपर्यंत राहिली. या काळात ती एकदा स्वतःच्या घरी आली होती. त्यावेळी बाथरूमची पाहणी केली असता कोणतीही दुर्गंधी जाणवली नाही. त्यानंतर 26 मे रोजी तिनं सिकंदरा पोलीस ठाण्याच्या प्राक्षी टॉवर चौकीत पती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.

रूबीने पुढे सांगितलं की, सासू आणि मुली घरी आल्यानंतर त्यांनी बाथरूमचा फरशी उंच का केली? असा प्रश्न विचारला. त्यावर तिनं, बाथरूममध्ये पाणी साचत होतं आणि कमोडची सीट उंच असल्यानं अंधारात पडण्याची भीती वाटत होती, म्हणून फरशी उंच केल्याचं सांगितलं.

पोलीस जबाबात पुढे तिनं असंही सांगितलं की, ती जेव्हा जेव्हा आंघोळीसाठी बाथरूममध्ये जात असे, तेव्हा फरशीवर कुठे पाणी साचते का? याची तपासणी करत असे. मात्र, एका दिवशी तिच्या मुलीनं बाथरूममधील एका ठिकाणी फरशी उंच झाल्याचं आणि ती चिरा पडून तडकत असल्याचं सांगितलं. हे ऐकताच रूबी घाबरली. त्यानंतर घरात शिल्लक असलेलं सिमेंट कालवून तिनं त्या भागावर पुन्हा सिमेंटचा थर दिला. त्यामुळे एक दिवस आणि एक रात्र बाथरूमचा वापरही करण्यात आला नाही.

रात्री झोप उडाली; अन् अखेर सत्य सांगण्याचा निर्णय घेतला : पोलिसांनी रूबीला विचारलं की, पतीची हत्या करून मृतदेह बाथरूममध्ये पुरल्यानंतर अनेक दिवस घरात दुर्गंधी आली नाही, मृतदेहाचे सांगाड्यात रूपांतर झालं होतं. मग अचानक गुन्ह्याची कबुली देण्याचा निर्णय का घेतला? यावर रूबीने अनेक धक्कादायक खुलासे केले.

रूबीच्या म्हणण्यानुसार, तिच्या दोन्ही मुलींना वडील आपल्याला सातत्यानं मारहाण करत असल्याचं माहीत होतं. ते मुलींचाही वारंवार अपमान करत असत. तरीही वडील कसेही असले, तरी मुलांना त्यांची आठवण येतच असते. दोन्ही मुली सतत, "आई, बाबा कुठे गेले?" असा प्रश्न विचारत असत. या सर्वांमुळे तिलाही रात्री झोप येणं बंद झालं होतं. बाथरूममध्ये पुरलेला मृतदेह बाहेर येईल आणि सर्व भांडाफोड होईल, अशी भीती तिला सतावत होती.

याच काळात एक पोलीस शिपाई पतीच्या पडताळणीसाठी घरी आला होता. त्यावेळी रूबीनं पती बेपत्ता असल्याचं सांगितलं. शिपायानं तिचा फोटोही काढला. त्यामुळे ती आणखी घाबरली. एक ना एक दिवस सत्य बाहेर येणारच, हे लक्षात आल्यानं स्वतःहून सर्व काही सांगण्याचा निर्णय तिने घेतल्याचं रूबीने पोलिसांना सांगितलं.

रूबीने पुढे सांगितलं की, तिने सासू कमला यांना "तुमचा मुलगा आता कधीच परत येणार नाही," असं सांगितलं. कारण विचारल्यावर "त्याचा मृतदेह बाथरूममध्ये पुरला आहे," असं तिनं कबूल केलं. हे ऐकताच सासूनं तिला शिवीगाळ केली. त्यावेळी रूबी म्हणाली, "माझ्या आयुष्यात एकच खंत राहील, माझ्या नशिबी असा दारूच्या आहारी गेलेला नवरा का आला? आता माझ्या मुलींचं काय होईल?"

भरतपूरमधील वादानंतर घडली घटनांची मालिका : रूबीच्या म्हणण्यानुसार, तिचा पती सुरेंद्र स्वतःच काही काळासाठी बेपत्ता व्हायचा विचार करत होता. 16 मे रोजी तो भरतपूर येथे मामाच्या घरी गेला होता. तेथे त्यानं गोंधळ घातल्यानं नातेवाईकांनी पोलिसांना बोलावले. त्यानंतर तो तेथून पळून घरी आला.

दुसऱ्या दिवशी, 17 मे रोजी त्यानं रूबीला जबरदस्तीनं भरतपूरला नेलं. मात्र, स्वतः दूर उभा राहून तिला मामाच्या घरी पाठवलं. त्यानं सांगितल्याप्रमाणे रूबीनं नातेवाईकांना पती घरी परतला नसल्याचं सांगितलं आणि त्याची हत्या झाल्याची भीती वाटत असल्याचंही सांगितलं. मात्र, यामुळे मामाच्या कुटुंबीयांनी तिचा अपमान करून तिला घराबाहेर हाकलून दिलं.

रूबीने सांगितलं की, परत येताना पतीनं तिला प्रचंड शिवीगाळ केली. घरी आल्यानंतरही त्यानं तिला वारंवार मामाच्या घरी फोन करून स्वतःबद्दल चौकशी करण्यास भाग पाडलं. तिनं नकार दिल्यानंतर तो बाजारात गेला, दारू पिऊन परतला आणि मटण घेऊन आला. रूबीच्या दाव्यानुसार, पती स्वतःच बेपत्ता होण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याच परिस्थितीचा तिला पुढे गुन्हा करण्यासाठी संधी मिळाली.

मुलींच्या संगोपनाचे संकट : मृत सुरेंद्रचा मोठा भाऊ अनिल शर्मा यांनी सांगितलं की, सुरेंद्रची 14 वर्षांची मुलगी प्राची इयत्ता आठवीत, तर धाकटी मुलगी सिद्धी इयत्ता चौथीत शिकत आहे. सध्या दोन्ही मुली त्यांच्या घरी राहत असून त्यांच्या संगोपनाची जबाबदारी आता त्यांच्यावर आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, अनिल शर्मा हे ऑटोचालक असून त्यांचं उत्पन्न मर्यादित आहे. त्यामुळे दोन्ही मुलींचा सांभाळ कसा करायचा? हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. मुलींच्या आईच्या माहेरच्या बाजूनंही जबाबदारी घेणारं कोणी नसल्याचं सांगितलं जात आहे.

वडिलांच्या मृत्यूमुळे दोन्ही मुली मानसिक धक्क्यात असून त्यांनी आई रूबीला भेटण्यासही नकार दिला आहे. पोलीस कोठडीत असलेल्या रूबीनं अनेकदा मुलींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती, मात्र मुलींनी आईला भेटण्यास स्पष्ट नकार दिला.

लग्नाच्या 16व्या वाढदिवसाच्या काही दिवस आधी घडली घटना : रूबीने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं की, तिच्या लग्नाचा १६वा वाढदिवस १९ जुलै रोजी होता. तिच्या म्हणण्यानुसार, तिचं लग्न फसवणूक करून लावण्यात आलं होतं. विवाहानंतर काही दिवसांतच वैवाहिक आयुष्यात अडचणी आणि वाद सुरू झाले होते.

रूबीनं पुढे सांगितलं की, तिचे सासरे राधेश्याम शर्मा हे इंटर कॉलेजमधून व्याख्याता पदावरून निवृत्त झाले होते. त्यानंतर त्यांनी कमला नगर येथील ई-ब्लॉकमधील घर विकून आवास विकास कॉलनी सेक्टर-7 येथे नवीन घर घेतले आणि तेथे वास्तव्यास गेले.

रूबीचे माहेर रुनकता येथे आहे. तिचे वडील वीज विभागात कार्यरत होते. त्यांच्या कुटुंबात 4 बहिणी आणि 2 भाऊ आहेत. तिच्या एका बहिणीचे सासर आवास विकास कॉलनीत असून, त्याच बहिणीच्या दीरामार्फत हे लग्न जुळवण्यात आलं होतं.

लग्नाच्या तिसऱ्याच दिवसापासून वादाला सुरुवात : रूबीने पोलिसांना दिलेल्या जबाबात दावा केला की, लग्नानंतर अवघ्या तीन दिवसांतच तिला पतीबाबतचं वास्तव समजलं. तिच्या म्हणण्यानुसार, पती जयपूरमध्ये संगणकाचं काम करत नसून तो दारूच्या आहारी गेला होता. तसेच त्याचे एका तरुणीसोबत संबंध असल्याचंही तिला मोबाईलमधील मेसेजवरून समजलं.

या प्रकरणाला विरोध केल्यानंतर पतीनं मारहाण केल्याचा आरोपही रूबीनं केला आहे. त्यावेळी सासू-सासरे तसेच दीर-जाऊ यांनीही तिला कोणतीही साथ दिली नसल्याचे तिने सांगितलं.

रूबीच्या म्हणण्यानुसार, 2012 मध्ये सासरे राधेश्याम शर्मा यांचे निधन झाल्यानंतर आवास विकास कॉलनीतील घर विकण्यात आलं. त्या व्यवहारातून पती आणि दीर या दोघांच्या वाट्याला प्रत्येकी 13 लाख रुपये मिळाले. त्यानंतर पतीनं रेणुका धाम येथे 12 लाख रुपयांना घर खरेदी केलं. या घरात सासू कमला त्यांच्यासोबत राहत होत्या. तसेच सासऱ्यांच्या निवृत्तीवेतनातूनच घराचा खर्च चालत असल्याचंही रूबीनं जबाबात नमूद केलं.

'डीएनए चाचणीद्वारे सांगाड्याची ओळख निश्चित होणार' : शहर पोलीस उपायुक्त सैयद अली अब्बास यांनी सांगितलं की, पोलिसांनी बाथरूमचं खोदकाम केल्यानंतर तेथून मानवी सांगाडा सापडला. त्यासोबत एक कडा आणि रुद्राक्षाची माळही मिळाली. या वस्तूंवरून सुरेंद्रच्या कुटुंबीयांनी प्राथमिक ओळख पटवली.

मात्र, सांगाडा सुरेंद्रचाच असल्याची शास्त्रीयदृष्ट्या खात्री करण्यासाठी डीएनए नमुने सुरक्षित ठेवण्यात आले असून त्यांची डीएनए चाचणी केली जाणार आहे. या चाचणीद्वारे सांगाड्याची ओळख निश्चित केली जाईल.

पोलिसांनी पुढे सांगितलं की, या प्रकरणात रूबीविरुद्ध लवकरच आरोपपत्र (चार्जशीट) न्यायालयात दाखल केलं जाईल. आतापर्यंतच्या तपासात या गुन्ह्यात रूबी एकटीच सहभागी असल्याचं समोर आलं आहे. मात्र, तपासादरम्यान आणखी जे पुरावे समोर येतील, त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल.