लाल किल्ला स्फोट प्रकरण : आरोपी यासिर अहमद दारची कोठडी वाढवली
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी यासिर अहमद दार याची कोठडी 16 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात आज याबाबतची सुनावणी पार पडली.

Published : January 5, 2026 at 10:04 PM IST
नवी दिल्ली : लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी यासिर अहमद दार याची कोठडी 16 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयातील प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांनी त्याला 26 डिसेंबरला आजपर्यंत एनआयए कोठडी सुनावली होती. या प्रकरणात नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सध्या सर्वजण कोठडीत आहेत.
आत्मघाती बॉम्बर बनण्यासाठी केलं ब्रेनवॉश : 18 नोव्हेंबरला पटियाला हाऊस कोर्टानं लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि आत्मघाती बॉम्बर डॉ. उमर नबीचा सहकारी जसीर बिलाल वाणी उर्फ दानिश याला एनआयए कोठडी सुनावली. एनआयएनं दानिशला श्रीनगर इथून अटक केली. एनआयएच्या म्हणण्यानुसार, कार बॉम्बस्फोटापूर्वी दानिशनं ड्रोनमध्ये तांत्रिक बदल केले. त्यानंतर रॉकेट असेंबल करण्याचा प्रयत्न केला. दानिशनं उमर नबीसह संपूर्ण कट रचण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. एनआयएच्या म्हणण्यानुसार, राज्यशास्त्रात पदवीधर असलेल्या दानिशला उमरनं आत्मघाती बॉम्बर बनण्यासाठी ब्रेनवॉश केलं. ऑक्टोबर 2024 मध्ये तो कुलगाम येथील एका मशिदीत डॉक्टर मॉड्यूलला भेटण्यास तयार झाला. तिथूनच त्याला हरियाणातील फरीदाबाद येथील अल फलाह विद्यापीठात राहण्यासाठी नेण्यात आलं.
लाल किल्ल्याजवळ एका चालत्या कारमध्ये बॉम्बस्फोट : 10 नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याजवळ एका चालत्या कारमध्ये बॉम्बस्फोट झाला. यामध्ये 13 जण ठार झाले असून अनेक जण जखमी झाले. ही कार कथित आत्मघाती बॉम्बर उमर उन नबीनं चालवली. एनआयएच्या फॉरेन्सिक तपासणीत मृत ड्रायव्हर उमर उन नबी असल्याचं आढळून आले आहे. तो पुलवामा जिल्ह्यातील रहिवासी होता. फरीदाबादमधील अल फलाह विद्यापीठात जनरल मेडिसिन विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून तो कार्यरत होता.
हेही वाचा :

