ETV Bharat / bharat

हैदराबादमध्ये 21 वर्षीय नर्सवर बलात्कार करुन हत्या, आरोपीला अटक

एका खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या 21 वर्षीय नर्सवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Accused held in alleged rape-murder of 21-year-old nurse, Telangana
हैदराबादमध्ये 21 वर्षीय नर्सवर बलात्कार करुन हत्या, आरोपीला अटक (File Photo - IANS)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : August 31, 2026 at 2:19 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

हैदराबाद : हैदराबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या 21 वर्षीय नर्सवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणी नर्सच्या घराशेजारी राहणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आलं असून सध्या त्याची चौकशी सुरू आहे.

रंगारेड्डी जिल्ह्यातील घटना : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोठागुडेम जिल्ह्यातील रहिवासी असलेली ही तरुणी गेल्या सात महिन्यांपासून रंगारेड्डी जिल्ह्यातील तुक्कुगुडा येथील एका रुग्णालयात नर्स म्हणून काम करत होती. ती रुग्णालयाजवळील स्टाफ रूममध्ये राहत होती. तर मूळचा बिहारचा असलेला आरोपी सना उल्लाह खान नोकरीच्या शोधात शहरात आला होता. सुरुवातीला तो उप्पलमध्ये बाईक मेकॅनिक म्हणून काम करत होता. काही काळ बिहारला परतल्यानंतर, तो दोन महिन्यांपूर्वी पुन्हा शहरात आला आणि तुक्कुगुडा इथं भाड्याच्या खोलीत राहून बाईक मेकॅनिकचं काम करत होता. त्याला पत्नी आणि एक मुलगा आहे.

बलात्कार करुन हत्या : सना उल्लाह खान हा आपला बहुतेक वेळ अश्लील व्हिडिओ पाहण्यात घालवत असे आणि त्याची नजर जवळच राहणाऱ्या या नर्सवर होती. त्यानं तिच्या खोलीत अनेक वेळा शिरण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, गेल्या शुक्रवारी रात्री नर्स रुग्णालयातून आपल्या खोलीत आली. त्यावेळी त्याच्या लक्षात आलं की, ती एकटीच आहे. यानंतर तो मध्यरात्रीनंतर तिच्या खोलीजवळ गेला. जेव्हा दरवाजा बंद होता, तेव्हा तो खिडकीतून आत शिरला. यावेळी आवाज ऐकून झोपलेली नर्स जागी झाली आणि ती आरोपीला पाहून ती किंचाळली. यानंतर त्यांनं तिला बेशुद्ध केलं आणि तिच्यावर बलात्कार केला. तसंच तिचा गळा आवळून खून केला आणि घटनास्थळावरून आरोपीनं पळ काढला.

पहारीशरीफ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : दरम्यान, शनिवारी सकाळी 9.30 वाजता नर्स रुग्णालयात ड्युटीवर आली नाही. त्यामुळं रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तिला कॉल केला. मात्र, त्यांच्या फोनला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळं त्यांनी महेश्वरममध्ये राहणाऱ्या तिच्या मावशीला कळवले. तसंच दुपारी रुग्णालयातील कर्मचारी तिच्या खोलीकडे गेले. यावेळी दरवाजा बंद असल्याचं पाहून ते खिडकीतून आत शिरले. त्यावेळी नर्स मृत अवस्थेत असल्याचं पाहून त्यांनी पोलिसांना कळवलं. यानंतर शमशाबादचे डीसीपी राजेश, पहारीशरीफचे इन्स्पेक्टर लक्ष्मीनारायण रेड्डी आणि 'क्लूज' टीमनं घटनास्थळाची पाहणी केली. मृतदेह उस्मानिया रुग्णालयात नेण्यात आला. पहारीशरीफ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी : रविवारी संध्याकाळी मृत नर्सचे कुटुंबीय आणि भाजपा नेत्यांनी उस्मानिया रुग्णालयाच्या शवगृहाबाहेर आंदोलन केलं. महेश्वरम मतदारसंघाचे भाजपा प्रभारी अंडेला श्रीरामुलू यांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. या आंदोलनामुळं काही काळासाठी तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान, पोलीस संरक्षणाखाली शवविच्छेदन केल्यानंतर, पहारीशरीफ पोलिसांनी नर्सचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. दुसरीकडे, या घटनेमुळं आपण खूप व्यथित झालो आहोत, असं मंत्री सीताक्का यांनी म्हटलं आहे. तसंच स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची चौकशी केली आणि डीजीपी सी. व्ही. आनंद यांना फोन करून सखोल चौकशी सुनिश्चित करण्याचे निर्देश दिल्याचं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा :

  1. अमेरिकेत तिरंग्याचा अपमान केल्याप्रकरणी रिजिजूंचा खलिस्तान्यांना कडक इशारा; "हे तुम्हाला महागात पडणार"
  2. यमुना एक्सप्रेसवेवर भीषण अपघात! अनियंत्रित ट्रकची कारला धडक; 4 जणांचा मृत्यू
  3. 16 वर्षीय मुलाच्या पोटात 23 नाणी, नेलकटर अन् हेअरपिन; 43 धातूच्या वस्तू बाहेर काढल्या