ड्युटीवर असताना पोलीस कॉन्स्टेबलची आत्महत्या; सर्व्हिस रायफलनं स्वतःवरच झाडली गोळी
शिवकुमार नरिबोला असं या कॉन्स्टेबलचं नाव असून ते जेवर्गी तालुक्यातील मावनूर गावचे रहिवासी होते.

Published : July 8, 2026 at 8:56 PM IST
कलबुर्गी : कर्नाटकातील कलबुर्गी शहरातील जगत सर्कल इथं कर्तव्यावर तैनात असलेल्या सशस्त्र राखीव पोलीस दलाच्या एका कॉन्स्टेबलनं मंगळवारी रात्री आपल्या सर्व्हिस रायफलनं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली. शिवकुमार नरिबोला असं या कॉन्स्टेबलचं नाव असून ते जेवर्गी तालुक्यातील मावनूर गावचे रहिवासी होते.
ड्युटीवर असताना पोलीस कॉन्स्टेबलची आत्महत्या : जगत सर्कल इथं तैनात असलेल्या शिवकुमार यांनी मंगळवारी रात्री सुमारे 9 वाजता आपल्या पोलीस वाहनात बसून सर्व्हिस रायफलनं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. शिवकुमार यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं आहेत. दरम्यान, या घटनेनंतर शहर पोलीस आयुक्त शरणप्पा एस.डी, डीसीपी शालू, प्रवीण नायक, एसीपी शरणबसप्पा सुभेदार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला.
2026 मध्ये शहर पोलीस आयुक्तालयात बदली : याचबरोबर, फॉरेन्सिक आणि बॅलिस्टिक्स पथकांनी देखील घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा केले आहेत. दरम्यान, 2016 मध्ये पोलीस दलात दाखल झालेल्या शिवकुमार यांनी यापूर्वी बंगळूर ग्रामीण जिल्ह्यात सेवा बजावली होती. त्यानंतर फेब्रुवारी 2026 मध्ये जिल्हा बदलीद्वारे त्यांची कलबुर्गी शहर पोलीस आयुक्तालयात बदली झाली होती.
पोलीस आयुक्त काय म्हणाले? : या घटनेवर प्रतिक्रिया देताना शहर पोलीस आयुक्त शरणप्पा एस.डी. म्हणाले की, "कॉन्स्टेबल शिवकुमार यांनी आपल्या सर्व्हिस रायफलनं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. प्राथमिक माहितीनुसार, ते गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक कारणांमुळं मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होते. कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल."
हेही वाचा :

