काश्मीरमध्ये पर्यटनासाठी आलेल्या अमेरिकन नागरिकाचा मृत्यू, पोलिसांकडून तपास सुरू
अँडरसन जॉन डेव्हिड असं या मृत अमेरिकन नागरिकाचे नाव आहे. ते अमेरिकेतील वॉशिंग्टन डी.सी. येथील रहिवासी होते.

Published : May 6, 2026 at 2:00 PM IST
श्रीनगर : काश्मीरमध्ये पर्यटनासाठी आलेल्या एका 83 वर्षीय अमेरिकन नागरिकाचे बुधवारी (6 मे) निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी श्रीनगरमधील दाल सरोवरातील एका हाऊसबोटवर ते अचानक खाली कोसळले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
अमेरिकेतील वॉशिंग्टन डी.सी. येथील रहिवासी : अँडरसन जॉन डेव्हिड असं या मृत अमेरिकन नागरिकाचे नाव आहे. ते अमेरिकेतील वॉशिंग्टन डी.सी. येथील रहिवासी होते. श्रीनगरमधील एका पोलीस अधिकाऱ्यानं 'ईटीव्ही भारत'ला सांगितलं की, जेव्हा अँडरसन जॉन डेव्हिड यांची प्रकृती बिघडली, तेव्हा हाऊसबोटच्या मालकांनी आणि इतरांनी त्यांना तातडीनं जवळच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना दाखल करताच मृत घोषित केलं.
मृतदेह कायदेशीर व वैद्यकीय कार्यवाहीसाठी शहर पोलीस नियंत्रण कक्षात : ज्यावेळी अँडरसन जॉन डेव्हिड यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी त्यांच्यासोबत त्याची पत्नी आणि आणखी एक परिचित व्यक्ती उपस्थित होते, अशी माहिती देखील पोलीस अधिकाऱ्यानं दिली. त्यांनी पुढं सांगितलं की, अँडरसन जॉन डेव्हिड यांचा मृतदेह आधी एसएमएचएस रुग्णालयात आणि नंतर पुढील कायदेशीर व वैद्यकीय कार्यवाहीसाठी शहर पोलीस नियंत्रण कक्षात हलवण्यात आला.
पोलिसांकडून तपास सुरू : दरम्यान, याप्रकरणी बीएनएसएसच्या कलम 194 अन्वये या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे, असं नेहरू पार्क पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं. तसंच परदेशी नागरिकाच्या काश्मीर प्रवासाचा इतिहास आणि त्याच्या मृत्यूच्या कारणाचा तपास सुरू आहे, असंही पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं.

