महागाईचा धक्का! गॅस सिलिंडरच्या किमतीत 993 रुपयांपर्यंतची वाढ; जाणून घ्या ताजे दर
सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक (कमर्शियल) गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये मोठी वाढ केलीय. कंपन्यांनी प्रति सिलिंडर सुमारे 993 ने किमती वाढवल्या आहेत.


Published : May 1, 2026 at 10:29 AM IST
हैदराबाद: 2026 मधील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या होत्या, तोच देशातील नागरिकांना एक मोठा धक्का बसलाय. देशातील तेल कंपन्यांनी आज शुक्रवारी 1 मे 2026 रोजी गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये वाढ केलीय. ताज्या माहितीनुसार, हे नवीन दर आजपासूनच लागू झाले आहेत. सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक (कमर्शियल) गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये मोठी वाढ केलीय. कंपन्यांनी प्रति सिलिंडर सुमारे 993 ने किमती वाढवल्या आहेत. दरम्यान, घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती मात्र स्थिर ठेवण्यात आल्यात.
Prices of 19 KG Commercial cylinder has been increased by Rs 993 from today. A 19 Kg cylinder will cost Rs 3071.50 in Delhi from today. No change in domestic cylinder prices: Sources
— ANI (@ANI) May 1, 2026
आजपासून या सिलिंडरची किंमत 3071 असेल : देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत आजपासून 993 ने वाढवण्यात आलीय. आजपासून या सिलिंडरची किंमत 3071 असेल; यापूर्वी त्याची किंमत 2078 होती. त्याचप्रमाणे मुंबई या महानगरातही व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत; येथे या सिलिंडरची किंमत वाढून 3024 झाली आहे. यापूर्वी त्याची किंमत 2031 होती.
व्यावसायिक सिलिंडरची किंमत 994 ने वाढवली : कोलकातामध्ये तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत 994 ने वाढवली आहे. आता तो 3202 ला उपलब्ध होईल, तर यापूर्वी त्याची किंमत 2208 होती. चेन्नईचा विचार करता व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 3237 पर्यंत पोहोचली आहे; यापूर्वी तो 2246.50 ला विकला जात असे.
सिलिंडरच्या काळ्या बाजाराला आळा घालण्यासाठी महत्त्वाचं पाऊल : आज 1 मेपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या वितरणासंदर्भात (डिलिव्हरीबाबत) नवीन नियम लागू करण्यात आलेत. विशेष म्हणजे 'डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड' (वितरण प्रमाणीकरण कोड) ही प्रणाली अंमलात आणण्यात आली आहे. या प्रणालीनुसार, जेव्हा कधी गॅस सिलिंडर तुमच्या घरी पोहोचवला जाईल, तेव्हा तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक 'वन-टाइम पासवर्ड' (OTP) पाठवला जाईल. हा OTP सादर केल्याशिवाय सिलिंडरची डिलिव्हरी पूर्ण होणार नाही. गॅस सिलिंडरच्या काळ्या बाजाराला आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
5 किलोचा सिलिंडरही झाला महाग : मिळालेल्या माहितीनुसार, तेल कंपन्यांनी 5 किलोच्या एलपीजी (LPG) सिलिंडरच्या किमतीत वाढ केली असून, ही दरवाढ आज शुक्रवारी 1 मे 2026 पासून लागू झाली आहे. सिलिंडरमागे सुमारे 261 ने किमतीत वाढ करण्यात आली आहे. परिणामी, 5 किलोचा सिलिंडर आता बाजारात पूर्वीच्या 549 या किमतीऐवजी 810 रुपयांना उपलब्ध होईल.
हेही वाचाः
पर्यटकांनी भरलेली क्रूझ बोट धरणात उलटली; 4 जणांचा मृत्यू
'एक्झिट पोलकरता भाजपानं पैसे दिले'- निवडणूक निकालापूर्वी ममता बॅनर्जींचे भाजपावर गंभीर आरोप

