ETV Bharat / bharat

दिल्ली एम्समध्ये 15 वर्षीय तन्वीचा मृत्यू, कुटुंबीयांचा रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप

तन्वीचे वडील मुकेश परियानी यांनी रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहेत.

15-year-old girl dies at AIIMS, dies after waiting 13 years for heart surgery
दिल्ली एम्स (File Photo - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : September 2, 2026 at 6:18 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

नवी दिल्ली : देशातील सर्वात प्रतिष्ठित वैद्यकीय संस्था असलेल्या एम्स दिल्लीमध्ये उपचारातील कथित निष्काळजीपणा आणि प्रदीर्घ विलंबाचं एक अत्यंत दुःखद प्रकरण समोर आलं आहे. राजस्थानमधील कोटा येथील 15 वर्षीय तन्वीचा मंगळवारी एम्समध्ये मृत्यू झाला. दरम्यान, तन्वीचे वडील मुकेश परियानी यांनी रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, हृदयाच्या गुंतागुंतीच्या आजारानं तन्वी त्रस्त होती. तिच्या शस्त्रक्रियेच्या तारखांसाठी गेल्या 13 वर्षांपासून ते एम्सच्या फेऱ्या मारत होते, परंतु रुग्णालयाच्या दिरंगाईच्या धोरणामुळं तन्वीवर शस्त्रक्रिया वेळेवर झाली नाही. या विलंब आणि निष्काळजीपणामुळं अखेरीस तिला आपला जीव गमवावा लागला.

कोटा इथं राहणाऱ्या तन्वीला जन्मतःच हृदयाचा आजार (व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट (VSD) आणि पल्मोनरी अॅट्रेसिया) होता. ती अवघ्या दोन वर्षांची असताना, तिच्या आई-वडिलांनी आशेनं तिला पहिल्यांदा दिल्लीतील एम्स रुग्णालयात आणलं. कुटुंबाचा आरोप आहे की, 2014 मध्ये रुग्णालयाच्या कागदपत्रांमध्ये शस्त्रक्रियेची शिफारस करण्यात आली होती आणि 2015 मध्ये शस्त्रक्रियेची तारीख निश्चित करण्यात आली होती. असं असूनही, विविध कारणांमुळं शस्त्रक्रिया पुढं ढकलण्यात आली.

तन्वीचे वडील मुकेश परियानी (ETV Bharat)

वडील मुकेश परियानी यांनी सांगितलं की, "जर डॉक्टरांनी वेळेवर शस्त्रक्रिया केली असती, तर आमची मुलगी आज जिवंत असती." त्यांचा आरोप आहे की, 24 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या काळात डॉक्टरांनी तन्वीची तपासणीसुद्धा केली नाही. दरम्यान, रुग्णालयाच्या रेकॉर्डनुसार, तन्वीला 24 ऑगस्ट रोजी एम्समध्ये पुन्हा दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, तिच्यावर हृदय आणि फुफ्फुसांच्या एकत्रित प्रत्यारोपणासाठी तपासणी सुरू होती. सोमवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास एंडोस्कोपी प्रक्रिया करण्यात आली, त्यानंतर तिची प्रकृती खालावू लागली.

सीटीव्हीएस केंद्राचे प्रमुख डॉ. व्ही. देवागौरू यांनी सांगितलं की, "मंगळवारी पहाटे 2:50 वाजण्याच्या सुमारास त्या किशोरवयीन मुलीला खूप अशक्तपणा आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तिच्या ऑक्सिजनची पातळी 48 टक्क्यांपर्यंत खाली आली होती. दरम्यान, डॉक्टरांनी तिला ऑक्सिजनवर ठेवून वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु तिला वाचवता आलं नाही आणि पहाटे 5:06 वाजण्याच्या सुमारास तिला मृत घोषित करण्यात आलं."

कुटुंबीयांचा रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप (ETV Bharat)

मुलीच्या मृत्यूमुळं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दुःखी वडिलांनी एम्स प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला असून, त्यांना मृत्यूबाबत समाधानकारक स्पष्टीकरण देण्यात आलं नसल्याचं म्हटलं आहे. त्यांनी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांवर कागदपत्रांच्या कामातून वारंवार त्रास दिल्याचा आणि अनेक वेळा डिस्चार्जसाठी दबाव आणल्याचा गंभीर आरोपही केला आहे. या संपूर्ण घटनेत कट असल्याचा संशय व्यक्त करत तन्वीच्या वडिलांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. तसंच रुग्णालय प्रशासन अनेक वर्षांच्या विलंबावर स्पष्ट उत्तर देत नाही, तोपर्यंत कुटुंबानं आपल्या मुलीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे.

एम्स प्रशासनाचे स्पष्टीकरण : दुसरीकडं, एम्समधील वरिष्ठ डॉक्टरांचे म्हणणं आहे की, "2018 सालच्या तपासणीत असं आढळून आलं होतं की, "त्या मुलीच्या फुफ्फुसांना रक्तपुरवठा करणाऱ्या मुख्य रक्तवाहिन्या (पल्मोनरी आर्टरी) विकसित झाल्या नव्हत्या. यानंतर, नेहमीची दुरुस्ती शस्त्रक्रिया जोखमीची मानली गेली आणि तिला वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं." दरम्यान, उपचाराच्या शोधात 13 वर्षे भटकणाऱ्या आणि अखेरीस देशातील सर्वात मोठ्या सरकारी संस्थेतच आपल्या जखमांमुळे मृत्यू पावलेल्या रुग्णाच्या या घटनेने सरकारी वैद्यकीय व्यवस्थेच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

हेही वाचा :

  1. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांकडून आपत्ती निवारणासाठी 'अर्जुन वाहिनी'ची सुरुवात; 200 माजी सैनिक मोहिमेचे नेतृत्व करणार
  2. जपानमध्ये आयआयटी खरगपूरच्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू; हिरोशिमा विद्यापीठात करत होता इंटर्नशिप
  3. "डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांना जामीन मिळण्याचा अधिकार नाही", रमेश म्हात्रेंना सर्वोच्च न्यायालयानं फटकारले