शंख, डमरूच्या नादात भीमाशंकरचं वातावरण झालं भक्तिमय, श्रावण सोमवारी दर्शनासाठी भाविकांची रीघ - Shravan Somawar Special
Published : Aug 12, 2024, 8:09 PM IST
भीमाशंकर (पुणे) Shravan Somawar Special : आज (12 ऑगस्ट) दुसरा श्रावणी सोमवार असल्यानं सहावे ज्योतिर्लिंग असणाऱ्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे रात्रीपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. भाविक शिवलिंगाचं दर्शन घेत आहेत. यावेळी शिवलिंगावर आकर्षक रंगीबेरंगी फुलांची तसेच बेलाच्या पानांची सजावट करण्यात आली आहे. पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान शिवलिंगावरती दूग्ध आणि महाजलाभिषेक पूजा करण्यात आली. यानंतर शंखनाद करत महाआरती करण्यात आली. पहाटे पाच वाजल्यापासून पूर्ण गाभाऱ्यात शिवभक्तांची मांदियाळी रांगेत दर्शन घेण्यासाठी आतूर होती. सकाळपर्यंत संपूर्ण परिसरात शंख, डमरू, नगाड्याच्या मृदुंग आवाजात वातावरण भक्तिमय झालं होतं. लागोलाग चालून आलेल्या सुट्ट्यांमुळे नागरिकांनी भीमाशंकर परिसरात जास्त गर्दी केल्याचं दिसून आलं. गाभाऱ्यातील भस्मआरतीनंतर पुजाऱ्यानं क्षेत्र भीमाशंकर मंदिराची पुरातन आख्यायिका सांगितली. भाविकांना गर्दीचा त्रास होऊ नये, यासाठी मंदिरापासून दीड किलोमीटर अंतरावर 'नो पार्किंग व्यवस्था' करण्यात आली होती. भाविकांना भीमाशंकरला पोहोचता यावं यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ९ मिनी बस आणि २६ मोठ्या बस ठेवण्यात आल्या आहेत. या वाहनांमधून भाविकांना मंदिरापर्यंत जाणं शक्य होत आहे.