दिवे घाट चढून माऊलींचा पालखी सोहळा पुरंदरमध्ये दाखल, पाहा व्हिडिओ - ASHADHI EKADASHI 2025

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : June 22, 2025 at 8:40 PM IST

1 Min Read

सासवड (पुणे) : “माऊली माऊली...” च्या गजरात आणि विठुनामाच्या अभंगात न्हालेल्या लाखो वारकऱ्यांच्या साक्षीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज सायंकाळी पुरंदर तालुक्यात दाखल झाला. दिवे घाटावरच्या डोंगर रंगात घनदाट वनराई, डोंगररांगांमधून चढणाऱ्या या भक्तीमय मेळ्याने निसर्गही भारावून गेला. ढोल-ताशांचा निनाद, आणि रंगीत पताका घेत चाललेली वैष्णवांची मांदियाळी हे दृश्य डोळ्यांत साठवण्यासाठी दिवे घाटाच्या घाटमाथ्यावर हजारो माऊली भक्तांनी गर्दी केली होती. घाटाच्या वळणांमधून मार्गक्रमण करणारी फुलांनी सजलेली माऊलींची पालखी आणि तिच्यामागे अखंड हरिनामात न्हालेली वारकऱ्यांची रांग हे दृश्य डोंगरदऱ्यांनाही थांबून पाहावंसं वाटावं असंच होतं.



माऊलींचा पालखी सोहळा पुरंदरच्या हद्दीत पोहोचला : दिवे घाट हा पालखी सोहळ्याचा सर्वात महत्त्वाचा आणि आव्हानात्मक टप्पा आहे. तीव्र चढ, अरुंद वळणं आणि पावसाळी हवामानातही, विठुरायाच्या दर्शनासाठी उत्सुक वारकऱ्यांनी या साऱ्या अडथळ्यांवर मात करत उत्साहाने घाट पार केला. कुठे दमावं, थबकावं असं न वाटता, "ज्ञानोबा-तुकाराम" च्या गजरात ही चढण लिलया पार झाली. दिवे घाटाच्या शेवटच्या टप्प्यावर आल्यानंतर माऊलींच्या रथावर पुरंदरकरांच्यावतीनं फुलांची उधळण करत आणि टाळ्यांच्या कडकडाटात भव्य स्वागत करण्यात आलं. आज दुपारी पाचच्या सुमारास माऊलींचा पालखी सोहळा पुरंदरच्या हद्दीत पोहोचला. यावेळी माऊलींच्या रथाला पारंपरिक मानाच्या बैलजोडीबरोबरच स्थानिक शेतकऱ्यांच्या पाच बैलजोड्या लावण्यात आल्या होत्या. रथ ओढण्याच्या या पवित्र सेवेत त्यांनीही आपला सहभाग दिला. घाटमाथ्यावरील भाविकांनी या नयनरम्य दृश्याला डोळ्यांत साठवले, तर एकमुखी हरिनामाच्या घोषात संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.