हैदराबाद : भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला ॲक्सिओम 4 मिशनचे पायलट म्हणून 11 जून 2025 रोजी म्हणजे आज अंतराळात जाणार होते. मात्र, तांत्रिक कारणामुळे हे मिशन पुढं ढकललं आहे. हे मिशन आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) जाणार आहे. शुभांशु शुक्ला हे राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात जाणारे दुसरे आणि ISS वर जाणारे पहिले भारतीय असतील. त्यांच्यासोबत अमेरिका, पोलंड आणि हंगेरीचे अंतराळवीर असतील.
लॉंच तपशील
ॲक्सिओम 4 मिशन 11 जून 2025 रोजी सकाळी 8:22 वाजता (EDT) फ्लोरिडातील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळयानानं उड्डाण करणार होते. अंतराळवीर 11 जूनला रात्री 10 वाजता (IST) ISS वर पोहोच्याची अपेक्षा होती. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे या मोहिमेच्या नियोजनात बदल झाला आहे.
मिशनचे प्रयोग
या मिशनमध्ये 60 प्रयोग होतील, त्यापैकी इस्रोचे 7 आणि नासाचे 5 प्रयोग शुभांशु शुक्ला करतील. यात मूग-मेथीच्या बियांचं अंकुरण, मांसपेशींचे आरोग्य, शैवालांची वाढ आणि टार्डिग्रेड्स (सूक्ष्म प्राणी) यांचा अभ्यास असेल.
मिशनचा कालावधी
हे मिशन 14 दिवसांचं असेल. अंतराळवीर ISS वर वैज्ञानिक प्रयोग, शिक्षण आणि व्यावसायिक कामे करतील.
ॲक्सिओम 4 अंतराळवीर
- पेगी व्हिटसन (अमेरिका): मिशन कमांडर, अनुभवी अंतराळवीर, ISS वर दोनदा कमांडर होत्या.
- शुभांशू शुक्ला (भारत): मिशन पायलट, भारतीय हवाई दलाचे अधिकारी, गगनयान मोहिमेसाठी निवडलेले अंतराळवीर.
- स्लावोश उझनांस्की-विश्निव्हस्की (पोलंड) : वैज्ञानिक आणि अभियंता, मिशन विशेषज्ञ.
- टिबोर कापू (हंगेरी): यांत्रिक अभियंता, मिशन विशेषज्ञ.
या मिशनमुळं भारत, पोलंड आणि हंगेरी 40 वर्षांनंतर पुन्हा अंतराळात मानव पाठवत आहेत.
शुभांशू शुक्ला यांच्याबद्दल
शुभांशू हे भारतीय हवाई दलाचे पायलट आहेत आणि त्यांना 2,000 तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव आहे. ते इस्रोच्या गगनयान मोहिमेचेही अंतराळवीर आहेत. ते म्हणाले, “मी अंतराळातील माझा अनुभव फोटो आणि व्हिडिओंद्वारे 1.4 अब्ज भारतीयांशी शेअर करेन. हे मिशन भारताच्या स्वप्नांचं प्रतीक आहे.”
राकेश शर्मा प्रेरणास्थान
शुभांशू यांचे प्रेरणास्थान भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा आहेत. 1984 मध्ये राकेश शर्मा यांनी रशियन सोयुझ अंतराळयानातून अंतराळ प्रवास केला होता. शुभांशू त्यांना गुरू मानतात आणि त्यांच्यासाठी एक खास भेट (मेमेन्टो) अंतराळात नेणार आहेत, जी ते परतल्यानंतर उघड करतील.
अंतराळात योगा प्रयोग
राकेश शर्मा यांनी 1984 मध्ये अंतराळात योगा केला होता. आता शुभांशू देखील ISS वर योगा करणार आहेत. हा प्रयोग अंतराळविरांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा परिणाम तपासेल.
महत्त्व
हे मिशन भारताच्या अंतराळ कार्यक्रमासाठी महत्त्वाचं आहे. शुभांशू यांचा ISS वरील अनुभव गगनयान मोहिमेला (2027) आणि भविष्यातील भारतीय अंतराळ स्थानक (2035) आणि चंद्र मोहिमेला (2040) मदत करेल.
हे वाचलंत का :