नवी दिल्ली : भारतानं आपली पहिली स्वदेशी एमआरआय (Magnetic Resonance Imaging) मशीन विकसित केली असून, ही मशीन ऑक्टोबर 2025 पासून नवी दिल्लीतील AIIMS (अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था) येथे चाचणीसाठी स्थापित केली जाणार आहे. या स्वदेशी मशीनमुळं उपचार खर्च कमी होण्यास मदत होईल तसंच आयात केल्या जाणाऱ्या वैद्यकीय उपकरणांवरील अवलंबित्व 80-85 टक्क्यांवरून कमी होईल.
भारत वैद्यकीय तंत्रज्ञानात आत्मनिर्भर
भारताला वैद्यकीय तंत्रज्ञानात आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेनं हे एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. यासोबतच, SAMEER (सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग अँड रिसर्च) आणि AIIMS यांच्यात 1.5 टेस्ला एमआरआय स्कॅनरच्या स्थापनेसाठी सामंजस्य करार (MoU) देखील झाला आहे.
"भारतातील गंभीर उपचार, शस्त्रक्रियेनंतरची काळजी, ICU, रोबोटिक्स आणि एमआरआय यांसारख्या क्षेत्रातील बहुतेक उपकरणे आयात केली जातात. 80 ते 90 टक्के उच्च दर्जाची उपकरणे आयात होतात. आपल्या देशात सर्वोत्तम बुद्धिमत्ता आहे आणि आपल्याला जगातील सर्वोत्तम उपकरणेही हवी आहेत. AIIMS याच ध्येयानं कार्य करतंय. पण आता आम्हाला वाटतं की, ही उपकरणे भारतात का बनवू शकत नाही?" त्यांनी हे आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं एक पाऊल असल्याचंही नमूद केलं. - डॉ. एम. श्रीनिवास ,संचालक AIIMS दिल्ली.
दोन महत्त्वाच्या वैद्यकीय तंत्रज्ञानांचा विकास
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं (MeitY) SAMEER च्या माध्यमातून दोन महत्त्वाच्या वैद्यकीय तंत्रज्ञानांचा विकास केला आहे. 1.5 टेस्ला एमआरआय स्कॅनर आणि 6 MEV लिनियर एक्सलरेटर (LINAC). यात C-DAC (ट्रिवेंद्रम आणि कोलकाता), इंटर युनिव्हर्सिटी एक्सलरेटर सेंटर (IUAC) आणि दयानंद सागर इन्स्टिट्यूट (DSI) यांच्या सहकार्य आहे. एमआरआय स्कॅनर हे मऊ ऊतींचे निरीक्षण करण्यासाठी वापरलं जाणारे मशीन आहे, तर LINAC हे कर्करोगाच्या उपचारासाठी उच्च-ऊर्जा क्ष-किरण किंवा इलेक्ट्रॉन्सद्वारे वापरलं जातं. या दोन्ही प्रकल्पांना MeitY कडून आर्थिक पाठबळ मिळालं असून, आयात पर्याय कमी करण्याच्या दिशेनं भारत पुढं जात आहे.
हे वाचलंत का :