हैदराबाद : चीननं हेबेई प्रांतातील सुन्नान काउंटी, बीजिंगजवळ, जगातील पहिलं व्यावसायिक 10G ब्रॉडबँड नेटवर्क लॉंच केलं आहे. या नेटवर्कची डाउनलोड स्पीड 9,834 Mbps, आणि अपलोड स्पीड 1,008 Mbps आहे. लेटन्सी केवळ 3 मिलिसेकंद इतकी आहे. हे अत्याधुनिक इंटरनेट शिक्षण, मनोरंजन आणि इतर क्षेत्रांमध्ये क्रांतीकारी बदल घडवेल, अशी अपेक्षा आहे.
जगातील सर्वात वेगवान इंटनेट
भारतात वापरकर्ते ऑप्टिकल फायबर-आधारित व्यावसायिक ब्रॉडबँड प्लॅन्सद्वारे 1 Gbps (1000 Mbps) पर्यंत डाउनलोड स्पीड मिळवू शकतात. युनायटेड अरब अमिरात (543 Mbps) आणि कतार (521 Mbps) यांसारख्या देशांमध्ये सर्वाधिक व्यावसायिक ब्रॉडबँड स्पीड आहे, परंतु चीनचं 10G नेटवर्क यापेक्षा कितीतरी पुढं आहे.
उच्च डाउनलोड स्पीड
10G नेटवर्कमधील "10G" म्हणजे 10 Gbps पर्यंतची उच्च डाउनलोड स्पीड आहे. ही प्रचंड वेगवान इंटरनेट क्षमता आहे. हुवावे आणि चायना युनिकॉम यांच्या सहकार्यानं, 50G पॅसिव्ह ऑप्टिकल नेटवर्क (PON) तंत्रज्ञानाद्वारे हे नेटवर्क साकार झालं आहे, असं चीनी माध्यम MyDrivers नं स्पष्ट केलंय.
हाय-स्पीड इंटरनेट सेवा
यापूर्वी 10 Gbps स्पीड मर्यादित चाचण्यांमध्ये किंवा खास डिप्लॉयमेंटमध्ये उपलब्ध होती, परंतु चीनचं हे नेटवर्क प्रथमच व्यावसायिक नेटवर्क म्हणून मान्यता प्राप्त करत आहे. हे 10 Gbps ब्रॉडबँड नेटवर्क पारंपरिक गिगाबिट (1 Gbps) ब्रॉडबँडच्या तुलनेत लक्षणीयरीत्या जलद डेटा ट्रान्सफर करतं. 8K स्ट्रीमिंग, व्हीआर/एआर आणि क्लाउड कम्प्युटिंग यांसारख्या ॲप्लिकेशन्सना यामुळं चालना मिळेल. याशिवाय, आरोग्यसेवा, शिक्षण आणि शेती यासारख्या क्षेत्रांमध्ये स्मार्ट, कनेक्टेड डिव्हाइसेसच्या वापराद्वारे क्रांती घडू शकते. या हाय-स्पीड, कमी लेटन्सी नेटवर्कमुळं स्मार्ट होम डिव्हाइसेसमधील कनेक्टिव्हिटी कमी होईल आणि एकाच वेळी अनेक वापरकर्ते इंटरनेटचा वापर करू शकतील, तरीही याची स्पीड कमी होणार नाही.
8K चित्रपट 72 सेकंदात डाउनलोड
उदाहरणार्थ, 1 Gbps नेटवर्कवर 90 GB फाइल किंवा 8K चित्रपट डाउनलोड करण्यासाठी सुमारे 12 मिनिटं लागतात, तर नवीन 10G नेटवर्कवर हीच फाइल केवळ 72 सेकंदात डाउनलोड होऊ शकते. चीनचं हे 10G ब्रॉडबँड नेटवर्क डिजिटल पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे.
हे वाचलंत का :