हैदराबाद : बजाज ऑटोनं आपल्या लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर रेंजमध्ये नवीन चेतक 3001 भारतीय बाजारात लाँच केलं आहे. हे मॉडेल चेतक 2903 ची जागा घेईल. याची एक्स-शोरूम किंमत 99,990 हजार रुपये (Bajaj Chetak 3001 Price) ठेवण्यात आली आहे, ज्यामुळं हे स्कूटर आपल्या सेगमेंटमध्ये परवडणारे आणि वैशिष्ट्यपूर्ण पर्याय बनलं आहे.
नवीन प्लॅटफॉर्म आणि बॅटरी लेआउट
चेतक 3001 एका नवीन इलेक्ट्रिक वाहन आर्किटेक्चरवर तयार करण्यात आलं आहे. याची खासियत म्हणजे फ्लोअरबोर्डमध्ये बसवलेली 3.0 kWh बॅटरी, जी स्कूटरचं संतुलन सुधारते. तसंच, या डिझाइनमुळं फ्लोअर अधिक रुंद झाला आहे. सीटखाली 35 लिटर स्टोरेज स्पेस यात मिळतोय, जे या सेगमेंटमध्ये सर्वाधिक आहे.
रेंज आणि चार्जिंग गती
एका पूर्ण चार्जवर चेतक 3001 सुमारे 127 किमी अंतर कापू शकते. ही रेंज दैनंदिन गरजांसाठी पुरेसे असून लहान सहलींसाठीही विश्वासार्ह आहे. याला चार्ज करण्यासाठी कंपनीनं 750 वॅटचा चार्जर दिला आहे, जो बॅटरी 0 ते 80% पर्यंत फक्त 3 तास 50 मिनिटांत चार्ज करतो. या सेगमेंटमध्ये ही चार्जिंग गती जलद मानली जाते.
टेकपॅक वैशिष्ट्यांसह प्रगत तंत्रज्ञान
या स्कूटरसोबत पर्यायी “टेकपॅक” तंत्रज्ञान पॅकेज उपलब्ध आहे. यामध्ये कॉल स्वीकारणे किंवा नाकारणे, म्युझिक कंट्रोल, गाइड-मी-होम लाइट्स, हिल होल्ड असिस्ट, रिव्हर्स मोडसह लाइट आणि ब्रेकिंगदरम्यान स्वयंचलित फ्लॅश लाइट यांसारखी स्मार्ट वैशिष्ट्ये आहेत. ही वैशिष्ट्ये स्कूटरला प्रीमियम टच देतात आणि रायडरचा अनुभव सुधारतात.
मजबूत बॉडी आणि वॉटरप्रूफ डिझाइन
चेतक 3001 ही एकमेव इलेक्ट्रिक स्कूटर आहे, जी पूर्ण मेटल बॉडीसह येते. याशिवाय, याला IP67 रेटिंग आहे, जे धूळ आणि पाण्यापासून संरक्षण करतं. हे विशेषतः सर्व ऋतूंमध्ये स्कूटर चालवण्यास प्राधान्य देणाऱ्यांसाठी उपयुक्त आहे.
आता Amazon वरही बुकिंग
चेतक 3001 ची खरेदी अधिक सुलभ करण्यासाठी बजाजनं नवीन पाऊल उचललं आहे. आता ग्राहक Amazon वरूनही ही स्कूटर बुक करू शकतील. ही सुविधा लवकरच सुरू होईल, ज्यामुळं घरबसल्या स्कूटर खरेदीचा अनुभव मिळेल.
FY25 मध्ये सर्वाधिक विक्री
बजाज चेतकने FY25 च्या चौथ्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च) सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक स्कूटर बनून सर्वांना आश्चर्यचकित केले. चेतक 35 मालिकेतील (3501 आणि 3502) यशामुळं हे यश मिळालंय.
हे वाचलंत का :