सिद्धगड किल्ल्यावरुन 1100 फूट खोल दरीत पडला गिर्यारोहक: तब्बल 48 तासानं सापडला मृतदेह
सिद्धगड किल्ल्यावर गिर्यारोहणासाठी आलेला गिर्यारोहक तब्बल 1100 फूट खोल दरीत कोसळला. या गिर्यारोहकाचा मृतदेह शोधायला 48 तासाचा कालावधी लागला.

Published : June 17, 2025 at 11:23 PM IST
|Updated : June 18, 2025 at 3:00 PM IST
ठाणे : गिर्यारोहकाच्या पथकातील नवीमुंबई तळोजा भागात राहणाऱ्या एका गिर्यारोहकाचा 1100 फूट खोल दरीत पडून मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली. या गिर्यारोहकाचा मृतदेह तब्बल 48 तासाच्या अथक प्रयत्नानंतर दरीतून बाहेर काढण्यात स्थानिक गिर्यारोहकांना यश आलं. ही घटना मुरबाड तालुक्यातील सिद्धगड परिसरात घडली आहे. साईराज चव्हाण (वय 22) असं मृत गिर्यारोहकाचं नाव आहे. याप्रकरणी मुरबाड ग्रामीण तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान गीते यांनी दिली आहे.
सिद्धगडावर ट्रेकिंगसाठी आले होते गिर्यारोहक : पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृतक साईराज हा नवी मुंबईतील तळोजा भागात कुटुंबासह राहत होता. तो रविवारी सुट्टी असल्यानं आपल्या गिर्यारोहक असलेल्या 13 मित्रांच्या सोबत मुरबाड तालुक्यातील सिद्धगडावर ट्रेकिंगसाठी आला होता. मुरबाड पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या गिर्यारोहक पथकाकडं व्यावसायिक मार्गदर्शक नव्हता. त्यांच्याकडं योग्य ट्रेकिंग उपकरणं नव्हती. त्यातच घटनेच्या दिवशी किल्ल्यावर तेरा गिर्यारोहक (ट्रेकर्स) मार्ग चुकले होते. मात्र काही तासांनी ते सुरक्षितपणे गडावरून खाली उतरण्यात यशस्वी झाले. मात्र दुर्दैवानं, चव्हाण एका उंच कड्यावरून घसरला आणि 1100 फूट खोल दरीत असलेल्या खडकावर पडला. घटनेची माहिती मिळताच 20 मिनिटांत शोध आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं.
मुसळधार पाऊस अन् घनदाट जंगलात शोधमोहीम : ठाणे जिल्हा अधिकारी कार्यालयातून महाराष्ट्र माउंटेनियरिंग रेस्क्यू टीमशी त्वरित संपर्क साधण्यात आला. या पथकातील मुख्य समन्वयक राहुल मेश्राम यांनी स्थानिक बचाव पथकांना सक्रिय केलं. यात मुरबाड तालुक्यातील सह्यागिरी ट्रेकर्सचे दीपक विशे आणि डेला अॅडव्हेंचर्सचे गणेश गीते यांच्या नेतृत्वाखालील पथक समाविष्ट होती. त्यांनी तातडीनं घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केलं. मात्र घाट माथ्यांवर मुसळधार पाऊस, धुकं आणि घनदाट जंगल असल्यानं रात्री बचावकार्य थांबवावं लागलं. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी ते पुन्हा सुरू झालं. मुसळधार पावसामुळं शोध मोहिमेत अळथळा येत होता, तरी देखील अथक प्रयत्न पथकानं सुरू ठेवले. अखेर आज मंगळवारी दुपारच्या सुमारास साईराजचा मृतदेह पथकानं दरीतून बाहेर काढला. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुरबाडच्या शासकीय उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला.

जोरदार वारा, मुसळधार पावसात केलं बचावकार्य : आमच्या पथकासह इतर 20 जणांच्या पथकानं शोध मोहीम सुरू केली. “आम्ही केलेल्या बचावकार्यांपैकी हे सर्वात कठीण काम होतं. आम्ही अत्यंत कठीण परिस्थितीत आमचे जीव धोक्यात घालून त्याचा शोध घेतला. आम्हाला चार ते पाच वेळा दरीत खाली उतरावं लागलं. सर्वात कठीण म्हणजे जोरदार वारा, मुसळधार पाऊस आणि जवळजवळ शून्य दृश्यमानता यांचा सामना करावा लागला. हे नवीन ट्रेकर्स ज्या भागात पोहोचले ते सिद्धगडजवळील राजमाचीजवळ आहे. एक अत्यंत आव्हानात्मक आणि धोकादायक क्षेत्र आहे. आमच्यासारखे अनुभवी ट्रेकर्स देखील उन्हाळ्यात हा मार्ग टाळतात. हे हृदयद्रावक आहे की या तरुणांनी त्यांच्या पहिल्याच ट्रेकमध्ये हा मार्ग वापरून पाहिला आहे. अखेर आम्हाला दरीत खडकांमध्ये अडकलेल्या साईराजला शोधण्यात यश आलं आहे. बचाव पथकाला चव्हाण याचा मृतदेह सापडला. तहसीलदार कार्यालय, मुरबाड पोलीस आणि प्रशिक्षित गिर्यारोहक कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न केले आहेत," असं सह्यागिरी ट्रेकर्स ग्रुपमधील गिर्यारोहक दीपक विशे यांनी सांगितलं.

हेही वाचा :

