पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे परवा राज्याच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या दौऱ्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला भाजपा नेते आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, "संजय राऊत हे रोज विविध शोध लावतात. गृहमंत्री अमित शाह रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त समाधीचे दर्शन घ्यायला आले. समाधीची पार्श्वभूमी अशी की समाधीचा जीर्णोद्धार केल्यानंतर शंभर वर्ष पूर्ण होणार होती. ३८४ वी पुण्यतिथी आणि समाधीच्या जीर्णोद्धाराला १०० वर्ष पूर्ण झाली, याचं स्वागत करायचं सोडून संजय राऊत गेल्या तीन दिवसांपासून बोलत आहेत. त्यांना कोणीच प्रतिसाद देत नाहीये. संजय राऊतजी राजकीय दुश्मनी असावी, पण अमित शाह यांनी स्वतः पाचशे पानांचे शिवाजी महाराजांवर केलेलं पुस्तक येत्या काही दिवसात पुण्यात की दिल्लीमध्ये प्रकाशित होणार आहे, हे पुस्तक वाचल्यानंतर राऊत तुम्हाला चक्कर येईल", असे म्हणत चंद्रकांत पाटील निशाणा साधला आहे.
संविधानावर देशाचा कारभार सुरू आहे : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीच्या निमित्ताने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, "आज आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानावर देशाचा कारभार सुरू आहे. ही घटना इतकी अचूक आहे की पुढचे हजारो वर्षे बदलावी लागणार नाही. ही घटना समतेच्या बंधुत्वाच्या आधारावर आहे. तर अनेक अर्थाने समानतेच्या आधारावर आहे. १९५१ सालापासून झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीला कोणीही उभा राहू शकतो. जसा माझ्यासारखा गिरणी कामगारांचा मुलगा किंवा माझे आई-वडील सरपंचही नव्हते. तो आज महाराष्ट्राच्या राज्य मंत्रिमंडळामध्ये २०१४ पासून सलग आहे", असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
कायद्याने दिलेलं आरक्षण : राज्यात गेल्या काही दिवसांपासून जातीय तेढ निर्माण झाला असून आरक्षणाच्याबाबत मोर्चे काढले जातायेत. याबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता, ते म्हणाले की "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दर दहा वर्षांनी जातीच्या आधारावर दिलेल्या आरक्षणाचा आढावा घ्यायला सांगितल होतं. ज्या वेळेस ही स्थिती तयार होईल की शेड्युल कास्ट आणि शेड्युल टाइप हे सक्षम झाले. तेव्हा आरक्षण रद्द करता येईल, पण अशी स्थिती देशात अजून नाही. त्यामुळे कुठलंही सरकार आलं की ते दर दहा वर्षांनी वाढवत असते. घटनेत फक्त शेड्युल कास्ट आणि शेड्युल टाइप आरक्षण असून बाकी कायद्याने दिलेलं आरक्षण आहे", असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.
राऊतांच्या मनामध्ये असलेला जातीवाद...: फुले चित्रपटासंदर्भात आज सामनामध्ये जो लेख आला आहे, त्याबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, "संजय राऊत जे बोलतील ते खरं न मानता ते खोटं आहे, असंच म्हणावं लागतं. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला १३७ जागा मिळाल्या सहयोगी पक्ष म्हणून महायुतीला २३५ जागा मिळाल्या आणि या आमदारांनी देवेंद्रजींना मुख्यमंत्री बनवले या देवेंद्रजींनी २०१४ ते २०१९ साली आरक्षण आणि सुविधा या एकमेकात अडकल्या होत्या, त्या वेगळ्या केल्या. आरक्षण नसतानाही सुविधा, आरक्षण नसतानाही हॉस्टेल, आरक्षण नसतानाही भत्ता दिला. त्यांच्याविरुद्ध दलित, मराठा, ओबीसी जाऊ शकत नाही. ओबीसींचे वेगळे मंत्रालय देवेंद्रजींनी सुरू केले. देवेंद्रजी विरुद्ध फुले आंबेडकर अशा प्रकारचा वाद संजय राऊत यांच्या मनात आहे. हा त्यांच्या मनामध्ये असलेला जातीवाद आहे. त्यांच्या मनामध्ये असलेला जातीवाद हा अस्तित्वात येऊ शकणार नाही. मराठा समाजाचे मुख्यमंत्री होते, तेव्हा आरक्षण दिलं नाही. मराठा समाजाला पहिला आरक्षण देवेंद्र फडणीस यांनी दिलं आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
हेही वाचा -