मेळघाटातील मगरीचं झाड पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य; जाणून घ्या खास वैशिष्ट्ये!
या झाडाला मेळघाटात "क्रोकोडाइल बार्क ट्री" अर्थात मगरीचं झाड म्हणून ओळखलं जातं.

Published : June 18, 2025 at 3:29 PM IST
|Updated : June 18, 2025 at 5:33 PM IST
अमरावती : मेळघाट हे महाराष्ट्र राज्याचं जैवविविधतेचं भांडार आहे. मेळघाटच्या घनदाट जंगलात फिरताना नजरेत भरणारं एक झाड पाहून सर्वांना आश्चर्य वाटू शकतं. कारण, जवळपास शंभर फूट उंच अशा या झाडाचं खोड जणू मगरीचं कातडंच असल्याचा भास होतो. या खोडाला स्पर्श केला तर अतिशय खरखरीत अशी या झाडाची साल असल्याचं लक्षात येतं. या झाडाला मेळघाटात "क्रोकोडाइल बार्क ट्री" अर्थात मगरीचं झाड म्हणून ओळखलं जातं.
असं आहे मगरीचं झाडं...: मेळघाटात या मगरीच्या झाडाला क्रोकोडाइल बार्क ट्री यासह एन, साझ, आसना, आईन अशी विविध नावं आहेत. या झाडाची उंची 100 फुटापर्यंत वाढते. जवळपास 70 फुटापर्यंत हे झाड अगदी सरळ वाढतं. त्यानंतर त्याला फांद्या येतात. या झाडाचा आकार एक मीटर इतका रुंद असतो. तसंच या झाडाचं लाकूड अग्निरोधक आहे. या झाडाचा गाभा कथ्थ्या किंवा काळसर कथ्थ्या रंगाचा असतो. मेळघाटात सागाच्या झाडांमध्ये हे झाड मध्येच असल्यामुळं एखादी मगर झाडावर चढतेय की काय? असाच भास होतो.

झाडाचं वैशिष्ट्य काय? : "उन्हाळ्यात या झाडाची पानगळ होते. या झाडाच्या टोकावर पांढरी फुलं लागतात. या फुलांचा गुच्छच असतो. या झाडाचं फूल देखील वैशिष्ट्यपूर्ण आहे. हिरव्या रंगाचं फळ या झाडाला लागतं. या फळाला तीन सेंटीमीटरचे पाच पंख असतात. अंडाकृती असणारं हे फळ सुरूवातीला हिरव्या रंगाचं असतं तर उन्हाळ्यात हे फळ सुकून तपकिरी रंगाचं होतं. या झाडापासून लाख आणि पिंगट रंगाचा डिंक मिळतो. या झाडावर टसर जातीचे रेशीम किडे मोठ्या प्रमाणात असतात. या झाडाच्या पानावर राहणारे हे किडे रेशीम तयार करतात. मगरीच्या झाडाप्रमाणेच हे रेशीम किडे अर्जुनाच्या झाडावर देखील असतात, " अशी माहिती वनस्पती शास्त्राचे अभ्यासक श्रीनाथ वानखडे यांनी "ईटीव्ही भारत" शी बोलताना दिली.

झाडाच्या खोडात पाणी साठा : "या झाडाचं खास वैशिष्ट्य म्हणजे हे झाड आपल्या खोडात पाणी साठवून ठेवतं. देशात काही ठिकाणी या झाडाच्या खोडातील पाणी बाहेर काढून पिलं जातं. जवळपास एक लिटर पाणी या झाडाच्या खोडात राहतं. मेळघाटातील आदिवासी बांधवांना मात्र या झाडाबाबत फारसं महत्व कधी जाणवलेलं दिसत नाही, " असं श्रीनाथ वानखडे म्हणाले.
लाकडी साहित्यासाठी झाडाचा उपयोग : "या झाडाचं लाकूड अतिशय कठीण, मजबूत आणि टिकाऊ आहे. शेतीची अवजारं या झाडाच्या लाकडापासून बनवतात. या झाडांची संख्या कोकण आणि दक्षिण भारतातही भरपूर आहे. जहाज बांधणीसाठी देखील या झाडाचं लाकूड वापरलं जातं. तसंच या झाडाच्या सालीचा वापर चर्मोद्योगासाठी होतो. वैद्यकीय क्षेत्रात त्वचेच्या रंगावर उपचार करण्यासाठी देखील या झाडाची साल वापरतात. मेळघाटात मात्र अतिशय मजबूत लाकूड असणाऱ्या सागवान झाडांची संख्या भरपूर असल्यानं या मगरीच्या झाडाला फारसं महत्व दिलं जात नाही. आमच्या मेळघाटात आदिवासी बांधव जाळण्यासाठी या झाडाचं लाकूड वापरतात," असं मेळघाटात शिक्षक असणारे गणेश जामुनकर यांनी "ईटीव्ही भारत"ला सांगितलं.
हेही वाचा :

