पुणे : २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान वाडिया पार्क, अहिल्यानगर येथे ६७ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली होती. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र केसरी गादी विभागातील अंतिम फेरीच्या कुस्तीमध्ये पैलवान पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध पैलवान शिवराज राक्षे यांच्या चितपटीच्या निर्णयावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गदारोळ झाला होता. या गोष्टींचा विचार करुन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने आंतरराष्ट्रीय पंच विलास कथुरे यांच्या अध्यक्षतेखाली या कुस्तीच्या बाबतीत एक चौकशी समिती स्थापन केली होती. या चौकशी समितीने आता दिलेल्या अहवालात पंच नितेश काबलिए यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
पंच नितेश काबलिए यांच्यावर कारवाई : पुढील ३ वर्षांसाठी पंच नितेश काबलिए यांना राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत पंचकार्य करण्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. या अहवालाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने आंतरराष्ट्रीय पंच नितेश काबलिए यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस संदीप भोंडवे म्हणाले की, "२ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे अशी कुस्ती झाली होती. या सामन्यात पंचाच्या निर्णयाने वाद निर्माण झाला होता. त्यानंतर पंधरा दिवस सोशल मीडियावर मोठा गोंधळ उडाला. आम्ही हे सर्व लक्षात घेऊन पंच विलास कथुरे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती."
महाराष्ट्रातील कुस्तीच्या इतिहासातील पहिलीच कारवाई : "या कुस्ती सामन्याची चौकशी करण्याचे आदेश विलास कथुरे यांना दिले होते. या चौकशीत पंचांची चूक आहे, असे अहवालात निदर्शनास आले असून पंच नितेश काबलिए यांच्यावर तीन वर्षांची निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील कुस्तीच्या इतिहासातील ही पहिलीच कारवाई आहे. तसेच, उप केसरी महेंद्र गायकवाड याने निलंबनाची कारवाई मागे घेण्यासाठी पत्र दिलं होतं. त्याची कारवाई आम्ही मागे घेतली आहे. परंतु शिवराज राक्षे यांनी अशा प्रकारचे पत्र दिलं नाही. त्यामुळं त्याच्यावरील कारवाई मागे घेता येणार नाही. जर त्याने पत्र दिलं तर आम्ही निश्चितच सगळे सदस्य बसून कारवाई मागे घेण्याचा प्रयत्न करू", असे यावेळी संदीप भोंडवे यांनी सांगितले.
हेही वाचा :