अमरावती- 24 ऑक्टोबर 1929 या दिवशी असणारा शुक्रवार जगात ब्लॅक फ्रायडे नावानं ओळखला जातोय. तेव्हा पहिली जागतिक मंदी आली होती. 19 ऑक्टोबर 1986 या दिवशी असणारा सोमवार ब्लॅक मंडे म्हणून ओळखला जातो. या दिवशी जगावर दुसरी मंदी आली. 2008 ला देखील जागतिक मंदी आली. या तिन्ही जागतिक मंदीचे भारतावर परिणाम झालेले नाहीत. आता मात्र अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 60 देशांवर टॅरिफ अर्थात आयात शुल्क आकारलेत. यामुळं जागतिक व्यापार कोसळला. जगात आर्थिक संकट कोसळलंय. पहिल्या तिन्ही आर्थिक संकटांचा परिणाम भारतावर जाणवला नाही, आता मात्र भारतावर 26 टक्के टॅरिफ अमेरिकेनं लावला असल्यानं भारतावरसुद्धा जागतिक मंदीचे दुष्परिणाम निश्चितच जाणवतील, अशी भीती अर्थशास्त्राचे अभ्यासक प्रा. डॉ. वैभव मस्के यांनी "ईटीव्ही भारत" शी बोलताना व्यक्त केलीय.
9 एप्रिलपासून टॅरिफची अंमलबजावणी : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे सल्लागार एलन मस्क यांच्याभोवती जागतिक राजकारण फिरत आहे. अमेरिकेच्या राज्यघटनेनुसार एक व्यक्ती केवळ दोन वेळा राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो. जो बायडन यांच्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची संधी मिळाली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणामुळं खुद्द अमेरिकेत अनेकांच्या नोकऱ्या गेल्यामुळं तिथं 50 घटकराज्यांत हजारो लोक रस्त्यावर उतरलीत. मला अमेरिकेचा फायदा करायचा हे माहीत असल्याचं सांगत ट्रम्प यांनी एकाधिकारशाही सुरू केलीय. यातूनच त्यांनी टॅरिफ ही संकल्पना समोर आणली. जगभरातून अमेरिकेत जाणाऱ्या वस्तूंवर हा टॅरिफ लागणार असून, सुरुवातीला हा टॅरिफ 100 टक्के लागेल, अशी घोषणा केली होती. मात्र याबाबत नव्यानं निर्णय घेत वेगवेगळ्या देशांवर वेगवेगळा टॅरिफ लावण्यात आला. भारतावर 26 टक्के टॅरिफ लावला. अमेरिकेच्या या धोरणामुळं सोमवारी शेअर बाजार कोसळला. 9 एप्रिलपासून या टॅरिफची अंमलबजावणी सुरू होईल. त्यानंतर याचे दुष्परिणाम संपूर्ण जगाला दिसतील.
शेअर बाजार कोसळला : सोमवारी अमेरिकेतील शेअर बाजार कोसळला. तसा संपूर्ण जगतातील बाजार कोसळला. भारतात सोमवारी सुरुवातीलाच निफ्टी आणि बीएसई यांचे निर्देशांक साडेचार ते पाच अंशांंनी पडलेत. हे जागतिक आर्थिक मंदीचं संकट आहे. शेअर बाजार कोसळले की, आर्थिक संकट निर्माण होण्याची भीती असते. सध्याची परिस्थिती ही मोठ्या आर्थिक मंदीकडे नेणारी आहे. आता गॅस सिलिंडरचे दर 50 रुपयांनी वाढलेत. पेट्रोलच्या किमती स्थिर राहतील, असं सरकार म्हणत असलं तरी अशा परिस्थितीत पेट्रोलच्या किमती स्थिर राहणं शक्य नाही, असंदेखील प्रा. डॉ. वैभव मस्के म्हणालेत.
मुक्त अर्थव्यवस्थेमुळे भारत सावरला : दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि रशिया यांच्यात 1945 ते 1990 यांच्यात जी काही स्पर्धा सुरू झाली, त्या स्पर्धेला वॉल्टर लीपमन या व्यक्तीनं पहिल्यांदा कोल्ड वॉर अर्थात शीतयुद्ध हे नाव दिलं. 1990 मध्ये रशियाचे तत्कालीन राष्ट्रपती मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी जागतिकीकरणाची संकल्पना अस्तित्वात आणली. यानंतर मुक्त अर्थव्यवस्था आणि जागतिकीकरणाकडं जग वळायला लागलं. याच काळात रशिया महाशक्ती होऊन संपला होता, याचा परिणाम भारतावर होणं अपेक्षित होतंच. 1991 ज्या जुलै महिन्यात तत्कालीन भारताचे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव आणि अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी भारताच्या आर्थिक उदारीकरणाला सुरुवात केली आणि जगातला व्यापार भारतात होऊ लागला. भारताचा व्यापार जगात वाढू लागला. अनेक कंपन्या भारतात आल्या आणि जागतिकीकरणाकडं आपली वाटचाल सुरू झाली.
आता जागतिक व्यापार धोक्यात : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफबाबतच्या धोरणामुळं जागतिक व्यापार धोक्यात आलाय. हा धोका कसा असेल तो किती दिवस राहील हे सध्यातरी सांगता येत नाही. मात्र अमेरिकेच्या धोरणामुळं जागतिक व्यापार हा धोक्यात येईल, अशीच शक्यता अधिक असल्याचं प्रा. डॉ. वैभव मस्के यांनी स्पष्ट केलंय. अमेरिकन नागरिकांच्या आंदोलनामुळं जर ट्रम्प यांनी काही विचार केला तरच जागतिक मंदी टाकण्याची शक्यता प्रा. डॉ. वैभव मस्के यांनी व्यक्त केलीय.
हेही वाचाः
पहिल्यांदा शेअर्समध्ये तुफान तेजी अन् अचानक शेअर बाजार गडगडत पुन्हा सावरला, टाटाच्या शेअर्समध्ये तेजी सुरूच
ज्याची भीती होती तेच घडले! सेन्सेक्स उघडताच 3000 अंकांनी कोसळला, टाटा-रिलायन्सच्या शेअर्समध्ये घसरण