जगभरातील शंभरहून अधिक देशांच्या 16 हजार टपाल तिकिटांचा संग्रह, कोल्हापूरच्या विजयकुमार जोशींनी जपलाय अनोखा छंद
कोल्हापूरचे विजयकुमार जोशी यांनी 60 वर्षांत 100 हून अधिक देशांतील 16 हजार टपाल तिकिटांचा संग्रह केला असून त्यासाठी घरात 70 कपाटं राखीव ठेवली आहेत.

Published : October 9, 2025 at 5:53 PM IST
कोल्हापूर : भारतीय स्वातंत्र्यानंतर एकमेकांशी संवाद साधण्याचं महत्त्वाचं साधन म्हणजे पोस्टकार्ड होतं. या पोस्ट कार्डांचं कमालीचं आकर्षण असलेल्या कोल्हापूरच्या विजयकुमार जोशी (Vijayakumar Joshi) यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेताना घरात येणाऱ्या पोस्टाच्या टपालावरील तिकीटं जमा करण्याचा छंद सुरू केला, बघता-बघता छोट्या घरातून सुरू झालेला हा प्रवास विदेशी टपालाच्या तिकिटापर्यंत पोहोचला. गेल्या 60 वर्षात जोशी यांनी जगातील शंभरहून अधिक देशाच्या 16 हजार टपाल तिकिटांचा संग्रह केलाय. हा संग्रह जपण्यासाठी राहत्या घरात 70 हून अधिक कपाटं यासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. पाहूयात कोल्हापूरच्या या अवलियाने जपलेला अनोखा छंद जागतिक टपाल दिनाच्या निमित्ताने.
शंभरहून अधिक देशांच्या टपाल तिकिटांचा केला संग्रह : कोल्हापुरातील शिवाजी पेठेत राहणारे विजयकुमार जोशी बँकेचे व्यवस्थापक म्हणून निवृत्त झाले आहेत. जोशी यांना देशी-विदेशी चलनी नोटा, आगपेटी, वेगवेगळ्या व्हरायटीच्या काचेच्या बाटल्या, देशभरातील ब्रिटिश कालीन रेल्वे स्टेशनची छायाचित्रे, वेगवेगळ्या प्रकारचे बॉलपेन जमा करण्याचा अनोखा छंद आहे. नोकरीनिमित्त त्यांची विविध ठिकाणी बदली झाली. यामुळं विजयकुमार जोशी यांचं बाहेरील राज्यात राहणं व्हायचं, यातून त्यांनी गेल्या 50 वर्षात जगभरातील शंभरहून अधिक देशांच्या टपाल तिकिटांचा संग्रह केला. यामध्ये श्रीलंका, मालदीव, मलेशिया, पोर्तुगाल, आफ्रिकन देश, बांगलादेश, भूतान, कतार युगांडा, नायजेरिया, इराण, पाकिस्तान, मलेशिया, ऑस्ट्रेलिया अमेरिका उझबेकिस्तान या देशांचा समावेश आहे. या देशात मिळणाऱ्या टपाल तिकिटांच्या खर्चाच्या तिप्पट रक्कम केंद्र सरकारकडे स्टॅम्प ड्युटी म्हणून भरावी लागते, जोशी यांनी स्वतःच्या पगारातून वेळोवेळी रक्कम भरून या देशाकडून टपाल तिकीटं संग्रहित केली आहेत.
या प्रकारांच्या टपाल तिकीटांचा आहे संग्रह : भारत सरकारकडून वेळोवेळी काढल्या गेलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत प्रत्येक टपाल तिकिटांचा संग्रह जोशी यांच्याकडं पाहायला मिळतो. तर गॉगल, रेकॉर्ड, लाकूड आणि बियांपासून बनवलेली टपाल तिकीटं, बॉटलच्या आकाराचे टपाल तिकीट ही जोशी यांच्याकडे उपलब्ध आहे. तर थायलंड देशाने काढलेले जगातील सर्वात लांब 6 इंच लांबीचे टपाल तिकीट विजयकुमार जोशी यांच्या संग्रही आहे.

खर्च आणि व्यवस्थापनासाठी होतेय पदरमोड : जगभरातील 16 हजारहून अधिक टपाल तिकिटांचा संग्रह ठेवण्यासाठी विजयकुमार जोशी यांनी राहत्या घरातच 70 कपाटांची व्यवस्था केली आहे. तर यासाठी घरातील एक खोलीचा वापर या छंदासाठी केलाय. भारत सरकारच्या डाक विभागानेही जोशी यांच्या संग्रहाचं कौतुक करत त्यांचा हा संग्रह नागरिकांना पाहण्याठी एक दिवसीय प्रदर्शन भरवण्यात आले होते. प्राणपणाने जपलेल्या छंदासाठी पदरमोड करणाऱ्या या अवलियाचं कोल्हापुरात मात्र कौतुक होत आहे.

हेही वाचा -

