पुणे : शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर हक्कभंग आणावा, असा प्रस्ताव भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी अधिवेशनात मांडला. यावर आता शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात सभागृहाला खोटी माहिती देणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग आणणार आहेत का? असा सवाल करत सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केलीय.
कोणाचा एकेरी उल्लेख केलाय? : सुषमा अंधारे म्हणाल्या की, "विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात प्रवीण दरेकर यांनी जो काही माझ्यावर हक्कभंग आणलाय. त्याबाबत मी असं कोणतं कृत्य केलंय. मी कोणाला ५६ जण पायाला बांधून फिरण्याची भाषा केलीय का? किंवा कोणाचाही एकेरी उल्लेख केलाय का? किंवा कुठल्याही सभागृहाच्या सदस्याला शिवीगाळ केलीय का?" असा सवाल सुषमा अंधारे यांनी यावेळी उपस्थित केलाय.
मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग आणणार का? : पुढं सुषमा अंधारे यांनी सांगितलं की, "जर माझ्यावर आपण हक्कभंग आणत असाल तर सभागृहात विवस्त्र हातवारे करणाऱ्यांवर हक्कभंग कधी आणणार? तसंच, सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात सभागृहाला खोटी माहिती देणाऱ्या आणि वारंवार खोटी माहिती देणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग आणणार का? " असं म्हणत सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केलीय.
प्रवीण दरेकरांनी मांडला हक्कभंगाचा प्रस्ताव : दरम्यान, सुषमा अंधारे यांनी रविंद्र धंगेकर यांना बोलण्याची संधी उपसभापती निलम गोऱ्हे यांनी दिली नसल्याचा आरोप करत व्हिडिओ व्हायरल केला होता. यावरूनच प्रवीण दरेकर यांनी आक्रमक भूमिका घेत रविंद्र धंगेकर विधान परिषदेचे सदस्य नसतांना त्यांना बोलू न देण्याचा विषयच येत नसल्याचं मत मांडलं. तसंच, माहिती न घेता आरोप करणं चुकीचं असून, सुषमा अंधारे यांच्यावर हक्कभंग आणण्याचा प्रस्ताव प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत मांडला.
हेही वाचा :
- 'कुणाल कामरानं गाणं लिहिलं तर शिंदे गँगला मिरची लागली'; संजय राऊतांचा हल्लाबोल
- "हे कसलं मोदींचं हिंदुत्व? एकिकडं औरंगजेबाची कबर अन्...", हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून संजय राऊतांची पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका
- अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड; विरोधी पक्षनेतेपदाबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं...