पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आज 26 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्तानं आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीनं वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पदाच्या राजीनाम्याचे संकेत दिले. यानंतर राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. आता याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्या आणि शरद पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (शरदचंद्र पवार) वर्धापन दिनाचा कार्यक्रम पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात पार पडला. या कार्यक्रमात बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्याला गेल्या काही वर्षात बरीच संधी मिळाली आता दुसऱ्यांना संधी देण्यात यावी, असं वक्तव्य केलं. यानंतर राजकीय वर्तुळात नवी चर्चा रंगात आली.
जयंतराव ज्येष्ठ नेते, त्यांच्या सूचनांचा विचार केला जाईल- याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या, "जयंत पाटलांचं भाषण झालं त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत. दिल्लीवरून परत आल्यावर पवारसाहेबांशी याबाबत त्यावर चर्चा करेल. जयंतराव हे पक्षाचे अतिशय महत्त्वाचे नेते आहेत. एवढी वर्ष प्रचंड मेहनत करून त्यांनी पक्ष वाढवण्याची चांगली कामगिरी केली आहे. त्यांच्या भाषणाचा तुम्ही काय अर्थ काढताय हे मला माहिती नाही. त्यांनी पक्षाला काही सूचना दिल्या असतील तर ते पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यावर विचार केला जाईल."
दोन्ही गट एकत्र येणार का?- यानंतर पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत प्रश्न विचारला. यावर त्या म्हणाल्या, "दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं किंवा कोणीतरी कोणाबरोबर जाणं हा अधिकार संविधानानं प्रत्येकाला दिलेला आहे. खरं तर या अशा चर्चा ऑन कॅमेरा होत नाही. माझं आणि अजित पवारांचं प्रेमाचं पवित्र नातं हे जन्मापासून आहे. त्यामुळे त्यात अंतर यायचा विषयच येत नाही आणि कुटुंब म्हणून आम्ही एकत्रच आहोत, मात्र राजकीय निर्णय घेताना तो काही भातुकलीचा खेळ नाही", असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
'ऑपरेशन सिंदूर'बाबत सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? - राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात एका विशेषांकाचं प्रकाशन करण्यात आलं. यात 'ऑपरेश सिंदूर'वरून केंद्र सरकारवर टीका करण्यात आली आहे. याबाबत सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारण्या आला. यावर बोलताना सुप्रिया म्हणाल्या, "ऑपरेशन सिंदूर सुरू असताना आम्ही कोणतंही भाष्य केलेलं नाही. आम्ही इंडिया अलायन्समध्ये आहोत, आम्ही स्पेशल सेशनची मागणी केली होती. हा प्रश्न राष्ट्रीय सुरक्षेचा होता ती अधिक महत्त्वाची असते. असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
हेही वाचा...