मुंबई– सोमवारी रात्री सिक्कीमचे राज्यपाल ओमप्रकाश माथूर यांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजपाने 2014 मध्ये 127 जागांवर निवडणूक लढवण्याची योजना आखली होती. त्यावेळी शिवसेनेला 147 जागा द्यायला आम्ही तयार होतो. पण शिवसेनेने त्यावेळी 147 जागांऐवजी 151 जागांवर निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला होता. भाजपा आणि जुन्या शिवसेनेची युती 2014 मध्ये केवळ चार जागांसाठी तुटली. देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानाचे आता राजकीय पडसाद उमटत असून, विविध नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्यात.
तेव्हा मी विरोधी पक्षनेता होतो : पूर्वाश्रमीचे भाजपाचे पहिल्या फळीतील नेते आणि सध्याचे शरद पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी 2014 मध्ये युती तुटल्याची घोषणा केली होती, तेव्हा खडसे विरोधी पक्षनेते होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केलेल्या वक्तव्याबाबत खडसेंना विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितले की, त्यावेळी शिवसेनेसोबत झालेल्या बैठकीत ज्याच्या जास्त जागा, त्याचा मुख्यमंत्री होणार हे ठरलं होतं. जागावाटप जवळपास पूर्ण झालं होतं. मात्र, 4-5 जागांवर चर्चा अडली होती. कोणीही एकमेकांना जागा सोडायला तयार नव्हतं, त्यामुळे युती तुटली. तेव्हा मी विरोधी पक्षनेता होतो. म्हणून मी जाहीर केलं. दिल्लीतून युती तुटली असं नाही. तो राज्यपातळीवर निर्णय झाला होता. तो निर्णय कोणीतरी जाहीर करणं अपेक्षित होतं. देवेंद्र फडणवीस अध्यक्ष होते. मी विरोधी पक्षनेता होतो. त्यामुळे मी पुढे येऊन तो निर्णय जाहीर केला. देवेंद्र फडणवीस याला जबाबदार आहेत असं नाही. तो निर्णय राज्यपातळीवर झाला होता."
2014 मध्ये युती का तुटली हा फार जुना विषय : यासंदर्भात ठाकरे गटाचे आमदार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, 2014 मध्ये युती का तुटली हा फार जुना विषय आहे. त्यामुळे या जुन्या विषयाबाबत आता बोलण्याला काही अर्थ नाही. 2014 मध्ये त्यांना युतीच करायची नव्हती," अशी प्रतिक्रिया आमदार अंबादास दानवे यांनी दिली आहे. या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनीदेखील प्रतिक्रिया दिली असून, 2014 ते 2025 या दहा वर्षांच्या कार्यकाळात आतापर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलंय. त्यावेळी भाजपाचे दिल्लीतील नेते युती तोडण्याचा निर्णय करूनच मुंबईत आले होते. तुम्ही जर 2014 बद्दल बोलत असाल तर 2019 बद्दलदेखील बोलायला हवं. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा फायदा घेऊन भाजपा मोठी झाली आणि शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न झाला. हिंदुत्ववादी असल्याचे दाखवत असले तरी दिल्लीतून शिवसेनेला संपवण्याचे फर्मान घेऊनच काही नेते आले होते. त्यावेळी पोस्टर लावायलादेखील त्यांना माणसे मिळत नव्हती, आम्ही हिंदुत्ववादी नेते म्हणून त्यांना गावोगावी फिरवले," अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
हेही वाचा :