बारामती (पुणे)- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुणे जिल्हा हा बालेकिल्ला मानला जातो. विशेषत: बारामती आणि इंदापूरमध्ये अजित पवारांचं मोठं वर्चस्व आहे. या वर्चस्वाला धक्का लावण्याचा प्रयत्न विरोधकांच्या वतीने करण्यात आला होता. त्याला निमित्त होतं इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक. मात्र अजित पवार यांनी विरोधकांना मात देत बारामती आणि इंदापूरमध्ये आपणच 'किंगमेकर' असल्याचे सिद्ध केलंय. छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अजित पवार यांच्या पॅनलने 21 विरुद्ध 0 अशा फरकाने जिंकली आहे. छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र हे इंदापूर आणि बारामती तालुक्यांमध्ये पसरले आहे, त्यामुळे या दोन्ही तालुक्यांतील छत्रपतींच्या सभासदांनी अजित पवार यांच्या पॅनेलला भरघोस मतदान केलंय.
जय भवानी माता पॅनेलचे 21 पैकी 21 उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी : इंदापूर तालुक्यातील श्रीछत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकडे संपूर्ण पूणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. अखेर पुन्हा एकदा या निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक हाती सत्ता राखत निर्विवाद वर्चस्व मिळवलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे आणि राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वातील श्री जय भवानी माता पॅनेलचे 21 पैकी 21 उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झालेत. संघर्षमय झालेल्या या लढतीमध्ये श्री जय भवानी माता पॅनलने श्री छत्रपती बचाव पॅनलचा सुपडा साफ केला आहे. त्यामुळे सहकारी क्षेत्रातदेखील आपणच बिग बॉस असल्याचे अजित पवार यांनी सिद्ध केलंय.
कोणाला किती मते ? : गट क्रमांक एक लासुर्णेमधून श्री जय भवानी माता पॅनेलचे पृथ्वीराज जाचक यांना 11694 मते मिळाली आहेत. तर शरद जामदार 10529 मते मिळाली आहेत. तसेच श्री छत्रपती बचाव पॅनलचे संजय निंबाळकर यांना 4850 तर प्रताप पवार यांना 4197 मते मिळाली आहेत. गट क्रमांक दोन सणसरमध्ये श्री जय भवानी माता पॅनेलचे रामचंद्र निंबाळकर यांना 10929 मते मिळाली, तर शिवाजी निंबाळकर यांना 10431 मते मिळाली. विरोधी संग्राम निंबाळकर यांना 5165 मते मिळाली तर महादेव शिरसाट यांना 3957 मते मिळाली. तर श्री जय भवानी माता पॅनलचे उमेदवार पृथ्वीराज श्रीनिवास घोलप यांना 9672 मते मिळाली तर गणपत सोपान कदम यांना 9297 मते मिळाली. तर या गटात मात्र घोलप यांना मोठा फटका बसला आहे. इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती करणसिंह घोलप हे श्री छत्रपती बचाव पॅनलमधून मैदानात होते, त्यांना 6961 मते मिळाली आहेत. तर भाजपाचे नेते तानाजीराव थोरात यांना 4721 मते मिळाली आहेत.
संतोष मासाळ यांना 10307 मते : यात सोबत अंथुर्णे गटामधून श्री जय भवानी माता पॅनलचे उमेदवार प्रशांत दासा दराडे यांना 11180 मते मिळाली आहेत, तर अजित नरुटे यांना 11 हजार 90 मते मिळाली आहेत. विरोधी पॅनलचे श्री छत्रपती बचाव मधून मैदानात असलेले बाबासाहेब झगडे यांना 4940 मते तर राजेंद्र पाटील यांना 4860 मते मिळाली आहेत. गट क्रमांक पाच सोनगावमधून श्रीजय भवानी माता पॅनलचे उमेदवार अनिल सीताराम काटे यांना 11 हजार 789 मते मिळाली आहेत, तर बाळासाहेब कोळेकर यांना 11,768 मते मिळाली आहेत. तर संतोष मासाळ यांना 10 हजार तीनशे सात मते मिळाली आहेत. याच गटात विरोधी असलेले श्री छत्रपती बचाव पॅनलचे उमेदवार रवींद्र टकले यांना 5482 मते मिळाली आहेत. तर गुणवडी गटामध्ये श्री जय भवानी माता पॅनलचे उमेदवार कैलास गावडे यांना 11832 मते मिळाली. तर निलेश टिळेकर यांना 11,563 मते आणि सतीश देवकाते यांना 11,261 मते मिळाले आहेत तर विरोधी असणारे नितीन काटे यांना 5434 मते मिळाले आहेत.
मंथन कांबळे यांना 11,511 मते मिळाली : इतर मागास प्रवर्गामधून उभे असलेले श्री जय भवानी माता पॅनलचे उमेदवार तानाजी शिंदे यांना 11358 मते मिळाली तर विरोधी असलेले संदीप बनकर यांना 5166 मते मिळाली. भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघातून श्री जय भवानी माता पॅनलचे उमेदवार योगेश पाटील यांना 11843 मते मिळाली. तर योगेश पाटील यांना पाठिंबा दिलेले उमेदवार तुकाराम काळे यांना 4172 मते मिळाली. अनुसूचित जाती जमातीमधून श्री जय भवानी माता पॅनलचे उमेदवार मंथन कांबळे यांना 11,511 मते मिळाली तर विरोधी असणारे बाळासाहेब कांबळे यांना 4961 मते मिळाली.
हेही वाचाः
छत्रपती कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार की मतदान होणार ? याकडे सर्वांचे लक्ष