महायुतीमध्ये मोठा भाऊ कोण? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
आता प्रत्येक पक्ष आपापली ताकद, संघटना वाढवण्याचं काम करीत आहे आणि तो त्याला अधिकार असल्याचं यावेळी अजित पवारांनी सांगितलंय.


Published : June 6, 2025 at 3:01 PM IST
|Updated : June 6, 2025 at 4:43 PM IST
पुणे: राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत आणि या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात आलीय. असं असताना आता महायुतीमध्ये मोठा भाऊ आणि छोटा भाऊ, असा वाद सुरू झालाय. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, सर्व पक्षांना सर्व जागा लढण्याचा अधिकार आहे, ज्या वेळेस निवडणुकांमध्ये अर्ज भरण्याची वेळ येईल, तेव्हा महायुती म्हणून आम्ही तिन्ही पक्षाचे नेते आणि महायुतीमधील इतर पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊ, परंतु आता प्रत्येक पक्ष आपापली ताकद, संघटना वाढवण्याचं काम करीत आहे आणि तो त्याला अधिकार असल्याचं यावेळी अजित पवारांनी सांगितलंय.
सगळ्यांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर असून, जिल्हा परिषद येथे शिवस्वराज्य दिन आणि कोविड योद्धा स्मारकाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलंय, यावेळी त्यांना याबाबत विचारला असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय. अजित पवार म्हणाले की, सगळ्यांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिलेल्या असून, जिल्हा परिषदेमधल्या विविध विभागातील माहिती आता व्हॉट्सअॅप चॅटबॉटवर पाहता येणार आहे. तसेच अंगणवाडीसाठीदेखील एक ॲप तयार करण्यात आलंय, त्याचा फायदादेखील लाडक्या बहिणींना होणार आहे. सरकारच्या विविध योजनांचा आढावा मी आज घेतलाय, असं यावेळी अजित पवार म्हणाले.
मुख्यमंत्री जे बोलतात ते अंतिम असतं : लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा निधी वळवला गेलाय. याबाबत अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. ते तुम्ही ऐकलं नाही का? मुख्यमंत्री जे बोलतात ते अंतिम असतं, आज कारण नसताना काहीजण चुकीची चर्चा करीत आहेत. आम्हीही प्रचंड बहुमताने निवडून आलेलो आहोत. कुठल्याच घटकांवर आम्ही अन्याय करणार नाही, सगळ्यांना न्याय दिला जाणार आहे. अर्थसंकल्पामध्ये सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाला आपण यंदा 39 ते 41 टक्के वाढ करून अधिक निधी दिलाय. माझं मंत्र्यांना सांगणं आहे की, कॅबिनेट बैठक असते, इतर ठिकाणी बोलण्यापेक्षा त्या व्यासपीठावर येऊन आपलं मत मांडलं पाहिजे. तर समज गैरसमज होणार नाहीत. काही जण चुकून बोलून जातात. जर कोणाची तक्रार करायची असेल तर आम्हा सगळ्यांसमोर करा म्हणजे आम्हाला पण कळेल काय चाललं आहे. पण आम्ही एकोप्यानं कारभार करीत आहोत. कधी भांड्याला भांड लागत असेल तर आपण त्यातून मार्ग काढू, पण कारण नसताना गैरसमज निर्माण करून समाजामध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये, नागरिकांमध्ये, पत्रकारांमध्ये याही गोष्टीला वाव देऊ नये, असं यावेळी अजित पवार म्हणाले.
बोलताना प्रत्येकानं तारतम्य पाळलं पाहिजे : सध्या राज्यात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अमोल मिटकरी यांच्यात वाद पाहायला मिळत आहे. याबाबत अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, लक्ष्मण हाके आणि अमोल मिटकरी यांच्यात जे काही संभाषण झालं ते मला अजिबात आवडलेलं नाही. सुसंस्कृत महाराष्ट्राचं राजकारण कसं असलं पाहिजे, याचा विचार केला पाहिजे. बोलताना प्रत्येकानं तारतम्य पाळलं पाहिजे. काही जणांमध्ये विकृती असते, त्याला जास्त महत्त्व द्यायचं कारण नाही, असंही यावेळी अजित पवार म्हणालेत.
इंजिन आणि मशाल यांच्या प्रमुखांनी काय तो निर्णय घ्यावा : येत्या 10 तारखेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन असून, पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मेळावे आयोजित करण्यात आलेत, याबाबत अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, दोघांचादेखील वर्धापन दिन 26 लाच असणार आहे. कोणीही कुठलेही वाद काढू नका, असं यावेळी अजित पवार म्हणाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. याबाबत अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे दोघेही एकमेकांच्या पक्षांचे प्रमुख आहेत. इंजिन आणि मशाल यांच्या प्रमुखांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार आहे, तुम्ही आणि मी विचार करून काय उपयोग होणार आहे. त्या त्या संदर्भातला निर्णय त्यांच्या त्यांच्या पक्षाचे प्रमुख घेतील, असंही यावेळी अजित पवार म्हणालेत.
हेही वाचा :

