अकोला : मूर्तिजापूर तालुक्यातील राजुरा घाटे इथं दुर्मीळ अशी पांढऱ्या रंगाची चिमणी आढळली आहे. यामुळं पक्षी मित्रांमध्ये याबाबत कुतूहल निर्माण झालं आहे. ही चिमणी सहसा दिसत नाही. इथले पक्षी मित्र मनोज लेखणार यांना ही चिमणी दिसली असून त्यांनी याबाबत पक्षी मित्रांना माहिती दिली आहे.
निसर्गकट्टाच्या माध्यमातून चिमणी संवर्धनाचे कार्य : जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील राजुरा घाटे इथल्या जि.प. उच्च प्राथमिक शाळेतील पक्षीमित्र शिक्षक मनोज लेखणार हे गेल्या ४ वर्षापासून त्यांच्या शाळेत निसर्गकट्टाच्या माध्यमातून चिमणी संवर्धनाचे कार्य करत आहेत. दरवर्षी ते ऑनलाईन चिमणी गणना आणि चिमणी घरटे कार्यशाळा घेत असतात. यामुळं मुलांना पक्षी निरीक्षणाची आवड निर्माण झाली आहे. मनोज लेखनार स्वतः मुलांसोबत राजुरा घाटे परिसरात नियमित पक्षी निरीक्षण करतात. याच निरीक्षणातून त्यांना शाळा परिसरात पांढरी चिमणी दिसली. त्याची नोंद घेऊन त्यांनी महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे कार्यकारी सदस्य अमोल सावंत यांना दिली. तेव्हा त्यांनी ही नोंद अत्यंत दुर्मीळ असल्याचं सांगितलं, अशी माहिती मनोज लेखनार यांनी दिली
पक्षांचा रंग ठरतो 'या' घटकावर : मानवाच्या त्वचेमध्ये मुख्यतः मेलॅनिन हे रंगद्रव्य असते. या द्रव्याच्या कमी जास्त प्रमाणामुळं माणसाच्या त्वचेच्या रंगामध्ये काळी, गोरी, सावळी किंवा पांढरी त्वचा असणारे लोकं असतात. प्राणी आणि पक्षांमध्येही जवळपास असंच असतं. पांढरे पक्षी आणि प्राण्यांच्या बाबतीत मेलॅनिन रंगद्रव्याचा पूर्णतः अभाव असतो. त्यामुळं कातडी किंवा पंख पूर्णतः पांढरे होतात. त्याला इंग्रजीमध्ये अल्बिनिझम म्हणतात. पूर्ण अल्बनिझम क्वचितच आढळतो. संपूर्ण अल्बिनीझम प्रकरणात पिसे, चोच आणि पाय पांढरे असतात आणि डोळे गुलाबी किंवा लाल रंगाचे असतात. आतापर्यंत भारतामध्ये हाऊस क्रो, कॉमन किंगफिशर, रेड वेंटेड बुलबुल, मुकुट असलेला स्पॅरो लार्क, ब्लू रॉक पिजन, जंगल बॅचलर्स या पक्ष्यांच्या जातींमध्ये अल्बनिझम आढळून आला आहे.
विद्यार्थ्यांच्या पक्षीनिरीक्षण व चिमणी संवर्धानाचे यश : शाळेच्या परिसरात पांढरी चिमणी दिसल्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. या पांढऱ्या चिमणीचे दर्शन हे विद्यार्थ्यांच्या पक्षीनिरीक्षण व चिमणी संवर्धानाचे यश आहे. शाळेच्या विविध पर्यावरणपूरक उपक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना येवले, स्वप्नील दुतोंडे, सुनील गाडेकर, प्रसाद कुलकर्णी या शिक्षकांचे तसेच गावचे सरपंच बंडू घाटे व शा. व्य. स. अध्यक्ष संदीप बरडे यांचे सहकार्य लाभले.
हेही वाचा :