नागपूर- काँग्रेस पक्षाच्या वतीनं काढण्यात येत असलेल्या तिरंगा यात्रेवर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी टीका केल्यानंतर आता त्यास काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उत्तर दिलंय. रेल्वेच्या तिकिटांवर ऑपरेशन सिंदूर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो टाकून राजकारण कोण करत आहेत हे आपण सगळे जण पाहत आल्याचं ते म्हणाले आहेत. 1962 ,1965, 1971 युद्धात भारताला प्रचंड मोठा विजय मिळवला आहे. चीन विरोधावरून जवाहरलाल नेहरूंवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्यावेळी विशेष अधिवेशन बोलावून लोकांची उत्तरे दिली. मात्र, आता उत्तर मिळत नाही. या देशात लोकतंत्र, लोकशाही आहे, जनतेला आणि विरोधकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. राहुल गांधींनी प्रश्न विचारले तर सैन्याचा अपमान म्हणून सांगता. पुलवामात अडीचशे किलो आरडीएस कुठून आला, कोणी आणला, आणणारे कोण होते, या बाबींचा शोध अद्याप घेतला का जात नाही, असा सवालही वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय.
प्रश्न विचारले तर देशद्रोह- पहलगाममध्ये 4 अतिरेक्यांचे स्केच दाखवले गेले, ते कुठे लपले आहेत. सीमेपार लढाई केली. मात्र, भारतात लपलेले अतिरेकी का हातात लागत नाहीत? त्यांचा शोध का घेतला जात नाही, असं विचारलं तर सैनिकाचा अपमान, देशद्रोही असे आरोप आमच्यावर केला जातो. सर्वाधिक देशाचा अपमान करणारे कोण आहेत हे सर्वांना माहिती आहे. देशाचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी पहलगामच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानला भारत कारवाई करेल हे कळवलं होतं. काय अर्थ आहे, पाकिस्तानला सांगून अतिरेकी तिथून काढून टाका. सैन्य काढून टाका, मग भारत हल्ला करणार, असा प्रश्न आम्ही काँग्रेसच्या वतीने विचारला यात चूक काय? सांगून हल्ला करणे योग्य आहे का? हे देश प्रेमाचे लक्षण आहे का या सर्व गोष्टी जनतेपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी रॅली काढत आहे. नेत्यांकडून हिंदू मुसलमानाचे भांडण लावण्याचं काम केलं जातंय तर आम्ही देशात सद्भावना निर्माण व्हावी, यासाठी प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणालेत.
केंद्र सरकारचं परराष्ट्र धोरण- मागील 10 वर्षांपासून केंद्रात मोदी सरकार आहे, पाकिस्तान विरोधात भारताचे युद्ध सुरू झाल्यानंतर भारताच्या पाठीशी उभं राहण्याची हिम्मत कुणी दाखवली नाही. आता मात्र, खासदारांचे डेलिगेशन पाठवत आहेत. काय फायदा होईल हे वेळ सांगेल, असंही ते म्हणालेत.
किती खर्च झाला, नुकसान किती झाले- युद्ध लहान झालं, मोठं झालं, आता युद्ध थांबलं आहे. यात भारतचं किती नुकसान झाले, किती शस्त्रं वापरली. पाकिस्तानने डागलेले चायन मेड 15 हजारांचे ड्रोन नष्ट करण्यासाठी भारताने 15 लाख रुपयांची मिसाईल वापरली. चीनची पॉलिसी आहे, अशा पद्धतीची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. सत्यता काय आहे अशा अनेक चर्चा आहेत. सरकारने यावर स्पष्टीकरण दिलं पाहिजे. काय नुकसान झालं हे सांगण्यात काही चूक नाही. युद्धविराम झाल्यावर विजयाची रॅली काढली जात आहे, असंही विजय वडेट्टीवार म्हणालेत.
हेही वाचाः
राजकीय पुढाऱ्याच्या सुनेची आत्महत्या: सासरच्यांनी हुंड्यासाठी छळ केल्याचा कुटुंबीयांचा आरोप