अमरावती : विदर्भाचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा विकास व्हावा, यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख यांनी मोठं स्वप्न पाहिलं. त्यासाठी विदर्भात शिक्षण आणि संपूर्ण महाराष्ट्रात कृषी क्रांती घडवण्याचा प्रयत्न केला. आता अमरावती शहरातून १६ एप्रिलला विमान सेवा सुरू होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विमान सेवेच्या माध्यमातून पश्चिमी विदर्भ विकासाकडे झेप घेणार आहे. यामाध्यमातून डॉ. पंजाबराव देशमुख यांनी विदर्भाच्या विकासाचं पाहिलेलं स्वप्न साकार होणार आहे, असं राज्याच्या महसूल मंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.
विमानसेवा १६ एप्रिलला सुरू होणार : शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या ६० व्या पुण्यतिथीनिमित्त डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांना आदरांजली वाहिली. "अमरावती विमानतळावरून विमानसेवा १६ एप्रिलला सुरू होणार असून मुंबईवरून पाहिलं विमान हे मुख्यमंत्र्यांना घेऊन येईल. मुख्यमंत्र्यांसोबत मी देखील असेन", असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. तसंच, "सुरुवातीला अमरावती ते मुंबई विमानसेवा सुरू होणार असून लवकरच अमरावतीवरून दिल्लीसाठी आणि पुढे विविध शहरांसाठी अमरावती विमानतळावरून विमानसेवा सुरू होईल", असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.
कर्जाची परतफेड करण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करू : याचबरोबर, "मी स्वतः डॉ. पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या शिवाजी शिक्षण संस्थेच्या कोरडी येथील शाळेतला विद्यार्थी आहे. यामुळं ही संस्था माझी संस्था आहे. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या उपक्रमाची परतफेड समाजातील प्रत्येकाला करावी लागेल. शिक्षणासोबतच कृषी क्षेत्रात हरित क्रांती घडवून आणण्यासाठी भाऊसाहेबांनी केलेल्या प्रयत्नांची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली. डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न मिळावं, यासाठी अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके, आमदार प्रवीण तायडे, राज्यमंत्री पंकज भोयर आपण सगळे मिळून डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न मिळावं, यासाठी जो काही प्रस्ताव राज्यांकडून पाठवायचा आहे, तो तयार करू. या संस्थेचं कर्ज आमच्यावर आहे. त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करू आहे", असं देखील चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
अनेक मान्यवरांची उपस्थिती : दरम्यान, शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या ६० व्या पुण्यतिथीनिमित्त पंचवटी चौक येथील भाऊसाहेबांच्या पुतळ्याला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हारार्पण करून अभिवादन केलं. यावेळी राज्य शिक्षणमंत्री पंकज भोयर, अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे, राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे, आमदार सुलभा खोडके, आमदार प्रवीण तायडे, माजी मंत्री प्रवीण पोटे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख प्रामुख्यानं उपस्थित होते.
हेही वाचा :