नागपूर : गेल्या पंधरा दिवसांपासून नागपूरसह विदर्भाला तीव्र उन्हाचा प्रकोप सहन करावा लागत आहे. आज आणि उद्या विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं व्यक्त केला आहे. यासह काही भागांना उष्णतेचा ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. त्यामुळं पुढील दोन दिवस तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढं राहण्याचा अंदाज आहे. उत्तर आणि पश्चिम दिशेनं उष्ण वारं वाहत असल्यानं विदर्भात तीव्र उष्णतेची लाट असल्याचं हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलं आहे.
विदर्भाला उष्णतेचा ऑरेंज अलर्ट : आकाश पूर्णपणं स्वच्छ असल्यामुळं वातावरण शुष्क झालं आहे. वातावरणात आर्द्रता नसल्यामुळं तापमान ४५ अंशच्या पुढं गेलं आहे. सोमवारपासून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यातील तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या वर नोंदवलं जात आहे. यंदाच्या उन्हाळ्यात विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तापमान ४ ते ६ अंश सेल्सिअसनं अधिक आहे. त्यामुळं आज आणि उद्या विदर्भाला उष्णतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
शनिवारनंतर मिळणार दिलासा : "मागील १५ दिवसांपासून विदर्भावर सूर्य कोपल्यासारखं चित्र निर्माण झालं आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्याचं तापमान ४५ अंशाच्या पुढं वाटचाल करत आहे. पुढील तीन दिवस उन्हाचा तडाखा कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र, शनिवारनंतर वातावरणात काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता आहे. शनिवारी रात्री उशिरा पूर्व विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज आहे. त्यामुळं तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता आहे," अशी माहिती नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी दिली.
'या' परिस्थितीत देण्यात येतो हीट-वेव्ह अलर्ट : "हवामान विभागाकडून हीट-वेव्ह अलर्ट दोन परिस्थितीमध्ये देण्यात येतो. त्यात पहिली शक्यता म्हणजे, सलग दोन ते तीन दिवस तापमान हे ४५ डिग्री पेक्षा जास्त नोंदवले जाते. अशा परिस्थितीत उष्णतेची लाट येणाच्या इशारा दिला जातो. दुसरी शक्यता म्हणजे सामान्य तापमान आणि प्रत्यक्ष तापमान हे ४.६ ते ६.४ डिग्री अधिक नोंदवलं जातं अशा वेळी हीट-वेव्ह अलर्ट दिला जातो. या दोन्ही शक्यतेपेक्षा तापमान अधिक वाढते त्यावेळी अति-उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा दिला जातो," अशी माहिती नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी दिली.
हेही वाचा :