मुंबई : सध्या उन्हाळा सुरु आहे. दिवसभर कडाक्याचे ऊन असल्यामुळे राज्यात कमालीचा उकाडा आहे. वातावरणातील तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढता पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक भागात ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान आहे. दरम्यान, राज्यात मान्सून दाखल होण्यास अडीच-तीन महिन्याचा अवधी आहे. मात्र, वाढत्या तापमानामुळे आतापासून पाण्याची समस्या जाणवू लागली आहे. अशातच आता पावसाबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार : राज्यात पुढील काही दिवसात पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात पावसाच्या हजेरीने गारेगार होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील काही भागात आगामी काळात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पुढील काही दिवसात मुंबईसह राज्यातील काही भागात पावसाळी वातावरण निर्माण होऊन पुढील तीन-चार दिवसात पाऊस कोसळणार आहे. मेघगर्जनेसह तुरळक आणि काही ठिकाणी हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचे भारतीय हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे.
बाष्पीभवनाच्या प्रभावामुळे पावसाची स्थिती : दरम्यान, "जिथे हलक्या स्वरुपाची हवा निर्माण होईल आणि प्रभावित क्षेत्र तयार होते. त्या ठिकाणी पाऊस पडतो. समुद्रातील तापमान वाढले आहे. समुद्रातील तापमान हे साधारण २८ अंश सेल्सिअस असते. पण, सध्या हिंदी महासागरातील तापमान ३० अंश सेल्सिअस आहे. तर अरबी समुद्रातील तापमान ३१ अंश सेल्सिअस आहे. परिणामी, तापमान वाढल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. या बाष्पीभवनाच्या प्रभावामुळे पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यात पुढील काळात पाऊस पडणार आहे", अशी माहिती हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना दिली आहे.
विदर्भातील काही भागात उष्णतेची लाट कायम : याचबरोबर, "एकीकडे जरी हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला असला तरी दुसरीकडे राज्यात उन्हाचा चटका कायम आहे. दिवसभर उन्हाचा प्रचंड कडाका लोकांना जाणवत आहे. विदर्भातील काही भागात उष्णतेची लाट कायम आहे. उष्णतेच्या लाटेमुळे लोकांना दिवसभर बाहेर पडणे अवघड झाले आहे. तसेच राज्यातील काही भागात ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान आहे. त्यामुळे गर्मी आणि उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असून, कधी एकदा पाऊस पडून गारवा मिळतो, अशी अवस्था लोकांची झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवनाच्या प्रक्रियेलाही वेग आल्यामुळं पावसाची स्थिती निर्माण झाला आहे", असे रामचंद्र साबळे यांनी म्हटले आहे.
राज्यात पावसाचा इशारा कुठे? : पावसाच्या आधी झाडांना मोहर यायचा किंवा २८ मे रोजी पावसाला सुरुवात व्हायची. तसेच, पावसापूर्वी कोकिळा ओरडली म्हणजे पाऊस पडतो, अशी एक लोकांची धारणा, समज होती. किंवा पाऊस पडण्याचे संकेत होते का? असा प्रश्न रामचंद्र साबळे यांना विचारला असता, ते म्हणाले, "पावसाबाबत पूर्वी संकेत असे होते. पण हे जुने शास्त्र होते. आता सायन्सप्रमाणे चालले पाहिजे. जग हे विज्ञानावर चालत आहे. पण, यावर आपण अधिक बोलणे उचित ठरणार नाही", अशी प्रतिक्रिया रामचंद्र साबळे यांनी दिली. दरम्यान, राज्यातील अनेक भागात ऐन उन्हाळ्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नंदुरबार, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली लातूर, धाराशिव, आणि यवतमाळ भागात पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
हेही वाचा -