मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयावरून विरोधकांवर हल्लाबोल चढवला. यावेळी त्यांनी एका गंभीर विषयाला हात घालत, मंत्री जयकुमार गोरे हे निर्दोष असतानाही त्यांच्याविरोधात कट-कारस्थान आणि षड्यंत्र रचलं गेल्याचं म्हटलं. तसंच, यात मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केलेत. या आरोपानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा होतेय. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या आरोपावर रोहित पवार यांनी प्रतिउत्तर देताना आम्ही याप्रकरणी न्यायालयीन लढाई लढणार असल्याचं म्हटलंय.
आम्ही कायदेशीर लढाई लढू : " मुख्यमंत्र्यांनी अंतिम आठवडा प्रस्तावाच्या चर्चेला उत्तर दिल्यानंतर आम्हाला आमचं म्हणणं मांडू दिलं नाही... आम्हाला बोलू दिलं नाही. जयकुमार गोरे अश्लील फोटो प्रकरणात सुप्रिया सुळे आणि माझं नाव घ्यायची गरज काय होती", असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलाय. तसंच "या प्रकरणाचा पुरावा आणि अश्लील फोटो काय असतात, ते कोर्टाच्या ऑर्डरमध्ये आहे. हे सर्वांनी पाहावं. पण मुख्यमंत्र्यांना केवळ रेकॉर्डवर आणायचं होतं. म्हणून त्यांनी आमच्या दोघांची नावं घेतली. एका महिलेचा विषय सोडविण्यासाठी बोललो. आम्हाला आशेनं समाजातील लोकं फोन करतात. जर त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही यावर बोललो. पण आता आमच्याविरोधात हक्कभंग आणला जाणार आहे. जरी हक्कभंग आणला तरी आम्ही कायदेशीर लढाई लढू आणि हे सगळं महाराष्ट्रातील जनता बघतेय. ती कदापी सहन करणार नाही", असं रोहित पवार यांनी म्हटलंय.
सभागृहाचं पवित्र राखलं जात नाही : दुसरीकडं, विधानसभेत आमदार रोहित पवार यांच्यावर हक्कभंग आणला जाणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आरोप केल्यानंतर संविधानाच्या चर्चेवर बोलण्यास रोहित पवार उभे राहिले. मात्र त्यांनी जयकुमार गोरे प्रकरणातील आपल्यावर झालेल्या आरोपाचा खुलासा करण्यास सुरूवात केली. मात्र, यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आक्षेप घेत रोहित पवारांनी फक्त संविधानावर चर्चा करावी असं म्हटलं. मात्र "आपण जे आरोप झाले. त्याचा फक्त खुलासा करत होतो. माझे म्हणणे मांडत होतो. पण जर संविधानावर चर्चा होत असताना, बोलू दिलं जात नसेल तर या सभागृहाचं पावित्र्य राखलं जात नाही", असं म्हणत रोहित पवारांनी नाराजीचा सूर आळवला.
हेही वाचा :