मुंबई : पहलगाम हल्ला प्रकरणात ज्यांनी नातेवाईक कुटुंब गमावले, त्यांना केवळ नोकरी, आर्थिक मदत न देता पुढील काही कालावधी त्यांच्यासोबत भावनात्मक असण्याची गरज आहे. पहलगाम हल्ल्यानंतर दिल्लीतील सर्वपक्षीय बैठकीसाठी राष्ट्रवादी पक्षातर्फे मी उपस्थित होते. दोन्ही बाजूनं यावेळी अतिशय समजूतदारपणा दाखवून ती बैठक झाली. सत्ताधारी विरोधक म्हणून एकमेकांच्या चुका काढण्याची, टीका करण्याची ही वेळ नाही, तर एक होऊन हा देशाविरुद्ध झालेला हल्ला आहे. त्यामुळं त्याच्याविरोधात देश म्हणून एक होऊन उभं राहण्याची गरज होती. आम्ही देश म्हणून एक आहोत व केंद्र सरकारच्याविरोधात या प्रकरणात काही टीका करणार नाही, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं. त्या मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
ही तू तू मैं मैं करण्याची वेळ नाही : केंद्र सरकारनं बैठकीत अनेक गोष्टी सांगितल्या. केंद्र सरकार या हल्ला प्रकरणात योग्य ती पावलं उचलेल, असा मला विश्वास आहे. राज्य सरकारनं माणुसकीच्या नात्यानं या कुटुंबासाठी जे काही करता येणं शक्य आहे, ते करण्याची गरज आहे. भाजपाचे खासदार निशिकांत दुबे त्यांच्या वक्तव्यातून त्यांच्याच पक्षाच्या केंद्र सरकारला व गृहमंत्र्यांना आव्हान देत आहेत. त्यामुळं त्यांचे प्रश्न त्यांनी केंद्र सरकारला विचारण्याची गरज आहे. मोठ्या संख्येनं परदेशी नागरिक भारतात राहत असतील तर त्याबाबत त्यांनी केंद्र सरकारला प्रश्न विचारावेत. आम्ही सध्या यावर टीका कपणार नाही, मात्र भाजपाचे स्वतःचे खासदार टीका करत असतील तर ती वेगळी गोष्ट आहे, ही तू तू मैं मैं करण्याची वेळ नाही. आम्ही पक्षातर्फे केंद्र सरकारला शब्द दिला आहे. त्यामुळं पुढील काही दिवस आम्ही टीका करणार नाही, असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं.
दहशतवाद्यांचे प्रयत्न हाणून पडण्याची गरज : याचबरोबर, काश्मीरमधील परिस्थिती बदलण्यासाठी व पूर्वपदावर आणण्यासाठी मदत करण्याची गरज आहे. दहशतवादाला न घाबरता काम करण्याची गरज आहे, असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं. तसंच, मुंबईत शुक्रवारी बॉम्बस्फोट झाले होते, मात्र सोमवारी मुंबई परत रुळावर आली होती. त्यामुळं जम्मू काश्मीरमधील परिस्थिती पूर्व पदावर आणण्यासाठी व दहशतवादापासून दूर करण्यासाठी आपण सर्वांनी मदत करण्याची, प्रयत्न करण्याची गरज आहे. दहशतवाद्यांचे प्रयत्न हाणून पडण्याची गरज आहे, ती आपली सर्वांची जबाबदारी आहे, असंही मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं.
राज्य सरकारमध्ये मोठे मतभेद आहेत : राज्य सरकारकडं पाशवी बहुमत असताना देखील त्यांच्यामध्ये मोठे मतभेद आहेत, अनेक बाबतीत अंतर्गत संघर्ष आहे, याकडे सुप्रिया सुळेंनी लक्ष वेधलं. मंत्री नरहरी झिरवळ यांचं वक्तव्य आपण ऐकलेले नाही. मात्र, भाजपाच्या जाहीरनामामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी २१०० रुपये देण्याचं आश्वासन दिलेले आहे, त्याची प्रत मी झिरवळ यांना पाठवून देईन, मग त्यांच्या लक्षात येईल, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसंच, पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीच्या वक्तव्याकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही, असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं.
आग विझवण्यासाठी वेळ का लागला? : दरम्यान, मुंबईत काल ईडी कार्यालयात लागलेल्या आगीवर सुप्रिया सुळे यांनी संशय व्यक्त केला. ईडीच्या कार्यालयात लागलेल्या आगीवर पहिल्या पंधरा मिनिटात नियंत्रण मिळवण्यात का अपयश आलं? त्या इमारतीमध्ये फायर सुरक्षा नव्हती का?, या परिसरात वर्दळ नसल्यानं ओपन स्पेस आहे, असं असताना आग विझवण्यासाठी वेळ का लागला?, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. तसंच जी कागदपत्रं जळाली असा दावा केला जात आहे, त्याचा बॅकअप आहे का? असा प्रश्न त्यांनी विचारला. ज्या फाईल जळाल्या असतील, त्याचा बॅकअप असणे आवश्यक आहे, बॅकअप नसेल तर ते धक्कादायक ठरेल, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा-