अमरावती : वर्षाला 1700 ते 1800 मिलिमीटर इतका पाऊस चिखलदरा येथे होतो. इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असला तरी सातपुडा पर्वत रांगेत टोकावर वसलेल्या चिखलदरा येथील पावसाचं पाणी पहाडावरून खाली वाहून जातं. त्यामुळं चिखलदरा शहरात पाण्याची मोठी टंचाई भासते. दरम्यान, या टंचाईवर मात करण्यासाठी पावसाळ्यात शाळेची इमारत, हॉटेलची इमारत, खानावळ यासह शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या घरांवर कोसळणारं पावसाचं एकूण 18 लाख लिटर पाणी साठवण्याची व्यवस्था दीपशिखा निवासी गुरुकुल सैनिकी शाळा प्रशासनानं केलीय. महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक सूर्यकांत जोग यांनी 1991 मध्ये सुरू केलेल्या या सैनिकी शाळेच्या परिसरात असणाऱ्या प्रत्येक इमारतीवर असणारं पावसाचं पाणी वाया जाणार नाही, याची काळजी घेतली. त्यांच्या या दूरदृष्टीमुळं या शाळेत आज 18 लाख लिटर पाणी साठा पावसाळ्यात होतो आणि वर्षभर हे पाणी पुरतं. पावसाच्या पाण्याचं या शाळेत करण्यात आलेल्या व्यवस्थापनासंदर्भात "ईटीव्ही भारत" चा हा स्पेशल रिपोर्ट...

1991 मध्ये सैनिकी शाळा सुरु : "राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून 1987 मध्ये सेवानिवृत्त झालेले सूर्यकांत जोग यांनी दीपशिखा शिक्षण संस्था 1988 मध्ये स्थापन केली. या संस्थेअंतर्गत चिखलदरा येथे 1991 मध्ये दीपशिखा गुरुकुल सैनिकी शाळा सुरू केली. त्यावेळी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी या सैनिकी शाळेला भेट दिली आणि राज्यात प्रत्येक जिल्ह्यात अशी निवासी सैनिकी शाळा सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता, " अशी माहिती महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण विभागाचे माजी संचालक आणि दीपशिखा निवासी सैनिकी शाळेचे संचालक डॉ. के. एम. कुळकर्णी यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना सांगितलं.

सुरुवातीला पाण्याची अडचण : "चिखलदरा येथे सर्वात मोठी समस्या ही पाण्याची आहे. शाळेच्या सुरुवातीच्या काळात पाण्यामुळं बऱ्याच अडचणी उद्भवल्या. त्यावेळी सूर्यकांत जोग यांनी चिखलदरा परिसरात जी काही पाण्याची ठिकाणं आहेत. त्यांचा शोध घेतला. त्यानंतर चिखलदरा पंचायत समितीसह ट्रेझरी कार्यालय परिसरात इंग्रजकालीन पाणीसाठ्याच्या व्यवस्थेची दुरुस्ती सूर्यकांत जोग यांनी करून घेतली. त्यांच्या या प्रयत्नांना चिखलदरा शहराला थोडाफार पाणी पुरवठा होण्यास मदत झाली. शाळेच्या परिसरात देखील जलप्राधिकरणाचं पाणी यायला लागलं. मात्र ते पुरेसं नव्हतं, " असं डॉ. के. एम. कुळकर्णी यांनी सांगितलं.

अशाप्रकारे केलं पाण्याचं व्यवस्थापन : चिखलदरा येथे पाण्याची भीषण टंचाई भासते. ही अडचण समजून घेऊन चिखलदरा पंचायत समिती आणि ट्रेझरी कार्यालयाच्या आवारात इंग्रजांनी केलेली पाण्याची व्यवस्था बंद पडली असताना स्वतः सूर्यकांत जोग यांनी पुढाकार घेऊन दोन्ही पाणीसाठा केंद्र दुरुस्त करून सुरू केले. यावेळी ट्रेझरी कार्यालय परिसरातील इंग्रजकालीन पाणीसाठ्याचा अभ्यास करून दीपशिखा सैनिकी शाळेत पाणीसाठा करण्यासाठी साडेपाच लाख रुपये खर्च करून अडीच लाख लिटर पाणीसाठ्याच्या टाक्या बांधल्या. दीपशिखा सैनिकी गुरुकुल शाळेत पावसाचं पाणी अडवून या टाक्यांमध्ये साठा करण्याचा पहिला प्रयोग सुरू करण्यात आला. त्यानंतर शाळेच्या इमारतीवर पाडणारं पावसाचं पाणी एकत्रितरित्या पाईपद्वारे खाली टाक्यांमध्ये सोडण्याची व्यवस्था करण्यात आली. अशाप्रकारे साडेतीन लाख लिटर पाणी या टाक्यांमध्ये साठवलं गेलं. शाळेला लागणारं पाणी, परिसरातील झाडांसाठी लागणारं पाणी, शौचालयाच्या वापरासाठी हे पाणी उपयोगी पडतं.

शाळेत 16 लाख लिटर पाण्याचा वापर : आज शाळेच्या आवारात मुख्य इमारत, खानावळ, हॉस्टेल अशा सर्व इमारतींवर पाडणारं पावसाचं पाणी साठवून ठेवण्यासाठी प्रत्येक इमारतीखाली पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या आहेत. या सर्व टाक्यांमध्ये एकूण 16 लाख लिटरच्यावर पाणी साठवलं जातं. शाळेत असणाऱ्या एकूण 300 विद्यार्थ्यांना हे पाणी मुबलक आहे. आता शाळा सुरू होण्यापूर्वी जून महिन्यात पाऊस पडायच्या आधी सर्व टाक्या धुवून स्वच्छ करण्यात आल्या आहेत, " असं शाळेतील शिपाई नादाला गवई यांनी सांगितलं.

कर्मचाऱ्यांचा निवासासाठी पाणीसाठा : दीपशिखा गुरुकुल निवासी सैनिकी शाळा परिसरात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची तीस घरं आहेत. या सर्व घरांवर पडणारं पावसाचं पाणी घरच्या आवारात तयार केलेल्या टाक्यांमध्ये साठवून ठेवलं जातं. कर्मचाऱ्यांना देखील वर्षभर पाण्याची टंचाई भासत नाही, अशी व्यवस्था याठिकाणी करण्यात आलीय.
दूरदृष्टीमुळं मुबलक पाणी : "पाण्याचं दुर्भिक्ष लक्षात घेत याची झळ शाळेतील विद्यार्थी, शिक्षकांना बसू नये, यासाठी सूर्यकांत जोग यांनी शासनाच्या बऱ्याच योजना घेतल्या. मोर्शी आणि वरूड तालुक्यात छोटे बंधारे बांधून पाणी अडवलं आणि त्याचा वापर शेतीसाठी झाला. अगदी तसाच प्रयोग या शाळेच्या परिसरात करण्यात आला. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य अनंत मराठे यांनी तांत्रिक पाठबळ दिल्यानं वाहून जाणारं पावसाचं पाणी साठवण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी ठरला, " असं देखील डॉ. के. एम. कुळकर्णी म्हणाले. दरम्यान, 2016 मध्ये सूर्यकांत जोग यांचं निधन झालं. त्यानंतर शाळेचा संचालक म्हणून माझ्याकडे जबाबरी आहे, असंही डॉ. के. एम. कुळकर्णी यांनी सांगितलं.
हेही वाचा :