अकोला : जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील कवठा गावात नागरिक नदी पात्रात खड्डे खोदून त्यामधील पाणी पित आहेत. हे पाणी दूषित असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कवठा गावातच 'धरण' असताना देखील गावकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी दीड किलोमीटरची पायपीट करत गावकऱ्यांना नदीच्या पात्रात खड्डे करून खड्ड्यातून पिण्यासाठी पाणी काढण्याची कसरत करावी लागत आहे.
अकोला जिल्ह्यात तापमानाच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली आहे. हंडाभर पाण्यासाठी दीड किलोमीटरची पायपीट करत नदीच्या पात्रात खड्डे करून खड्ड्यातून पिण्यासाठी पाणी काढणारे हे भीषण चित्र आहे.

जिल्ह्यातील कवठा या गावात सकाळ झाली की येथील गावकऱ्यांना एकच चिंता सतावते ती म्हणजे पिण्याच्या पाण्याची. जिल्ह्यात तापमानाच्या पाऱ्याने ४४ शी ओलांडली आहे. पण या वाढत्या तापमानातही हे गावकरी दैनंदिन लागणाऱ्या पिण्याच्या पाण्यासाठी गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या मन नदीच्या पात्रात करण्यात आलेल्या झऱ्यातून पाणी काढतात. या पाण्यावरच गावकऱ्यांना आपली तहान भागवावी लागत आहे. आपली सर्व कामे बाजूला टाकत दोन घोट पाण्यासाठी हे गावकरी रोज पायपीट करतात. गेल्या पंचवीस वर्षांपेक्षाहून अधिक काळ घशाची कोरड कशी मिटणार असा प्रश्न गावकरी विचारत आहेत.

कवठा येथे विदर्भ पाटबंधारे विभागाच्या वतीने बॅरेजचे रखडलेले काम सन २०१५ पासून सुरू करण्यात आले होते व सध्या काम अंतीम टप्प्यात आहे. तर डिसेंबर २०१७ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पाचे उद्घाटन देखील केले होते. या धरणामध्ये जुलै २०१८ मध्ये २ मीटर पाणी अडवण्यात आले होते व सध्याही या धरणात पाणी आहे.

या धरणाकरता कवठा येथील शेकडो एकर जमीन भूसंपादित करण्यात आली. अनेक शेतकरी भूमीहीन झाले मात्र पिण्याच्या पाण्याची गावकऱ्यांची धडपड कायम आहे. त्यामुळे गावात धरण असताना देखील गावकऱ्यांच्या घशाला कोरड आहे. धरणातील पाणी गावाला मिळावे व पाणीसमस्या कायमस्वरूपी मिटावी अशी आस लावून गावकरी या धरणाकडे पाहत आहेत.

पिण्याच्या पाण्यासाठी जनतेला रणरणत्या उन्हात वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे. झऱ्यातून पाणी काढून दूषित पाण्याने गावकरी आपली तहान भागवत आहेत. 'धरण उशाला अन् कोरड घशाला’ अशीच परिस्थिती कवठा वासीयांची झालीय.

हेही वाचा....