नाशिक Heavy Rain In Nashik : गेल्या दोन दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. कुणीही गोदावरी नदीच्या पाण्यात उतरू नये, तसेच गोदावरी नदी काठच्या नागरिकांना प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात होत असलेल्या संततधार पावसामुळे धरणांची पाणी पातळी वाढली आहे.
नाशिक जिल्ह्यात संतधार पाऊस : नाशिक शहर आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या संतधार पावसामुळे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरण 84 टक्के भरलं आहे. या पाठोपाठ दारणा धरण 88 टक्के, मुकणे धरण 50 टक्के, वालदेवी धरण 97 टक्के, काशीपी धरण 46 टक्के, गौतमी गोदावरी धरण 80 टक्के, पालखेड धरण 78 टक्के, वाघाड धरण 60 टक्के भरले आहे. नाशिक शहर परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत पाणी आलं आहे. लहान मंदिरं देखील पाण्याखाली गेली आहेत. नाशिकला आज ऑरेंज अलर्ट असल्यामुळे मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीनं गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गोदावरी नदी काठावर सुरक्षेचा अभाव : संततधार पावसामुळे गोदावरी नदीची पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे पंचवटी रामकुंड परिसरात धार्मिक विधींसाठी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. अशात इतर राज्यातून येणारे भाविक स्नान करण्यासाठी जीव धोक्यात घालून पाण्यात उतरत आहेत. काही हौशी युवक या वाहत्या पाण्यात पोहताना दिसत आहेत.या ठिकाणी नाशिक महानगरपालिका तसेच प्रशासनाचे कोणीही कर्मचारी उपस्थित नाही. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास या जबाबदार कोण, असा प्रश्नही आता नाशिककरांना पडलाय.
सखल भागात साचलं पाणी : संततधार पावसामुळे शहरातील सखल भागात पाण्याचे तळे साचले. मुंबई नाका चौकात रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं वाहन चालताना कसरत करत पाण्यातून वाट काढावी लागत आहे. तसेच वडाळा, मखमलाबाद, द्वारका उंटवाडी या भागातील रस्त्यांवर देखील पाणी साचलं आहे.
हेही वाचा :