बारामती- वारीचे वेध म्हणजेच पंढरपुरातील विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांच्या मनात लागलेली भेटीची आस. पुण्यातून अनेक पालख्या पंढरीच्या भेटीसाठी निघतात. त्याच पार्श्वभूमीवर पुरंदर तालुक्यातील सासवड येथून आषाढी वारीसाठी जाणारा संत सोपानकाका यांचा पालखी सोहळा यावर्षी 23 जून रोजी मार्गस्थ होणार आहे, अशी माहिती सोहळा प्रमुख त्रिगुण गोसावी यांनी दिलीय. गोसावी हे पालखी सोहळ्याच्या मार्गाचा आढावा घेण्यासाठी आणि मार्गावरील व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी पंढरपूरकडे मार्गस्थ झालेत. यावेळी त्यांनी ही माहिती माध्यमांना दिलीय.
कोण आहेत संत सोपानकाका? : संत सोपानकाका हे संत ज्ञानेश्वर माऊलींचे धाकटे बंधू आहेत. पुरंदर तालुक्यातील सासवड येथे सोपानकाकांची समाधी आहे. वारी सोहळ्यात ज्या प्रमुख संताचा समावेश असतो त्यामध्ये संत सोपनकाकांच्या पालखी सोहळ्याचा समावेश असतो. संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा जेव्हा सासवडमध्ये दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होत असतो. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचा सासवड येथे दोन दिवस मुक्काम असतो. यावेळी लाखोंच्या संख्येने वारकरी संत सोपानकाकांच्या समाधीचे दर्शन घेत असतात, यानंतर लाखो वारकऱ्यांसह संत सोपानकाकांचा पालखी सोहळादेखील आषाढीवारी सोहळ्यासाठी मार्गस्थ होत असतो.
वारी सोहळा प्रमुखांनी केली वारी मार्गाची पाहणी : सासवडमधून लाखो वारकरी दरवर्षी आषाढीवारी सोहळ्यासाठी पंढरपूरकडे जात असतात. या सोहळ्यातील वारकऱ्यांच्या सोयी सुविधा करण्यासाठी त्यांच्या मार्गात कोणत्याही प्रकारे अडचण राहू नये, यासाठी पालखी सोहळा कमिटीने या मार्गाची पाहणी केली आहे, यासाठी त्रिगुण गोसावी आणि त्यांचे सहकारी यांनी सासवड ते पंढरपूर मार्गाची पाहणी केली. यावेळी नीरा येथे आले आले असता त्यांनी माध्यमांना या वारी सोहळ्याची माहिती दिली.
पालखी सोहळा चांगल्या पद्धतीने पार पडणार : ते म्हणाले की, दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पालखी सोहळा चांगल्या पद्धतीने पार पाडला जाईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. 23 जून रोजी हा पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे, त्यासाठी आम्ही वारी सोहळ्यापूर्वीच मार्गाची पाहणी करीत आहोत. मार्गावर येणाऱ्या अडचणी समजून घेत असतो आणि त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. सध्या रस्त्याचे रुंदीकरण झालेले आहे. जमिनीच अधिग्रहण झालेलं आहे. वारकऱ्यांसाठी अनेक ठिकाणच्या मुक्कामाच्या जागांमध्ये बदल झालेले आहेत. त्यांच्यावरील पर्याय काढून वारकऱ्यांना चांगल्या पद्धतीची सोय कशी होईल ते पाहण्याकडे आमचा कल आहे. विशेष करून वाखरीमध्ये हा सोहळा चांगला कसा होईल, यासाठी पाहणी दौरा आयोजित केलाय. त्या ठिकाणी चांगली सुव्यवस्था कशी होईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचंही सोहळा प्रमुख त्रिगुण गोसावी म्हणालेत.
हेही वाचा -