मुंबई : 'न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक' घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी अरुणाचलम उल्लाहनाथन मारुथुवर याला अटक केली. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत फरार आरोपी मारुथुवरनं रविवारी (दि.१६) आत्मसमर्पण केलं. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. या घोटाळ्यातील मुख्य आरोपी हितेश मेहताकडून 30 कोटी रुपये घेतल्याचा आरोप त्याच्यावर आहे. आरोपी मारुथुवरला 18 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घोटाळ्यातील पाच जणांना अटक : आरोपी अरुणाचलम उल्लाहनाथन मारुथुवरला शोधण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेतर्फे देशभरात तपास सुरु होता. विविध ठिकाणी तपास पथके त्यांचा शोध घेत होती. आरोपीच्या मुलाला वडिलांना फरार होण्यासाठी मदत केल्या प्रकरणी आणि घोटाळ्यातील सहभागाप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. यापूर्वी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं 122 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी कपिल देधियाला वडोदरा इथून अटक केली. यानंतर त्याला शनिवारी मुंबईत आणून न्यायालयासमोर हजर केलं. न्यायालयानं त्याला 19 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली आहे.
काय आहे 'न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक' घोटाळा? : 'न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक' घोटाळ्यात 122 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. बँकेच्या प्रभादेवी आणि गोरेगाव इथल्या शाखेतून 122 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप होता. या घोटाळ्यातील दोन आरोपी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू भोयान आणि अपहारातील 15 कोटी रुपये स्वीकारणारा मनोहर उन्ननाथन यासह इतरांना यापूर्वीच मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली. बँकेचे माजी अध्यक्ष हिरेन भानू, त्यांची पत्नी आणि माजी उपाध्यक्ष गौरी भानू हे दोन आरोपी घोटाळा उघडकीस येण्यापूर्वीच विदेशात गेले आहेत. पोलिसांनी त्यांना फरार घोषित केलं आहे. याबाबतची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा :