मुंबई- काँग्रेसचे अमरावती पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे यांनी राज्याच्या आरोग्यमंत्री राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या विरोधात हक्कभंग दाखल केलाय. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील लोकांना टक्कल पडत असल्याच्या घटनेवरील प्रश्नावर आरोग्य राज्यमंत्र्यांनी विधान परिषदेत चुकीची माहिती दिल्याचा आरोप लिंगाडे यांनी केला असून, त्या विरोधात हक्कभंग दाखल करण्यात आला आहे.
गव्हातील सेलेनियममुळे केस गळती होत नसल्याची चुकीची माहिती : या परिसरात रेशनवर मिळत असलेल्या गव्हामध्ये असलेल्या सेलेनियममुळे लोकांचे केस गळत असल्याची बाब पद्मश्री डॉ. हिंमतराव बाविस्कर यांच्या संशोधनात समोर आली होती. आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी मात्र सभागृहात उत्तर देताना गव्हातील सेलेनियममुळे केस गळती होत नसल्याची माहिती दिली होती. या उत्तरामुळे चुकीची माहिती दिल्याचे सांगत काँग्रेस आमदार धीरज लिंगाडे यांनी मेघना बोर्डीकरांविरोधात हक्कभंग दाखल केलाय. विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्याकडे त्यांनी हक्कभंग दाखल केलाय.
पाण्याचे नमुने देखील तपासण्यात आले : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील लोकांना अचानकपणे टक्कल पडू लागल्याने त्याबाबत गंभीर चर्चा सुरू झाली होती. आरोग्य अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेटी दिल्या आणि येथील पाण्याचे नमुने देखील तपासण्यात आले होते. यावरील प्रश्नाच्या उत्तरात सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी हा प्रकार पाण्यामुळे किंवा रेशनवर मिळणाऱ्या गव्हामुळेच झाल्याचे स्पष्ट नसल्याची माहिती विधान परिषदेत दिली होती.
गावातील घराघरात जाऊन सर्वेक्षण : बुलढाण्यात केस गळतीचा प्रकार समोर आल्यानंतर प्रत्येक गावातील घराघरात जाऊन सर्वेक्षण करण्यात आलंय. त्या ठिकाणची माती, पाणी, रक्ताचे नमुने तसेच गहू यांचे नमुनेदेखील गोळा करण्यात आलेत आणि हे सगळे नमुने तपासणीसाठी आयसीएमआरकडे पाठवण्यात आले आहेत. आयसीएमआरचा अहवाल आल्यानंतर हे केस गळतीचे प्रकार नेमके कुठल्या कारणामुळे होत आहेत हे स्पष्ट होणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्र्यांनी सभागृहात दिली होती. गावातील लहान मुले आणि महिलांच्या आरोग्याची तपासणीदेखील करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली होती.
हेही वाचा :