मुंबई : मुंबई दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्याचा आरोप असलेल्या तहव्वूर राणाला आज अमेरिकेतून भारतात आणलं. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि मुंबईचे माजी पोलीस सहआयुक्त पी.के. जैन यांनी या हल्ल्याशी संबंधित त्यांचे विचार मांडले आहेत. ते म्हणाले की, "तहव्वूर राणासारख्या आरोपींना भारतीय तुरुंगात ठेवणं हे आव्हानात्मक आहे. अशा विदेशी आरोपींना भारतातील तुरुंगात पुरेशी सुरक्षा मिळणार नाही, त्यांच्या जीवाला धोका पोहचेल, भारतातील तुरुंगांची अवस्था योग्य नाही. याकडं आरोपीकडून लक्ष वेधलं जातं. विदेशी आरोपी असल्यानं त्यांच्या या आक्षेपांना उत्तर देण्यासाठी आणि त्यांच्याकडून तक्रारी होऊ नयेत यासाठी विशेष सुरक्षा असलेल्या तुरुंगात त्यांना हलवलं जातं. तसेच, अंडा सेल नावाने प्रचलित असलेल्या विशेष आणि सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत कडेकोट व्यवस्था असलेल्या ठिकाणी त्यांना ठेवलं जातं. मुंबई हल्ल्यातील आरोपी अजमल कसाबसाठी देखील अंडा सेलची निर्मिती करण्यात आली होती. अशा आरोपींसाठी विशेष व्यवस्था करावी लागते. अन्यथा काहीही गोंधळ झाला तर भारतातील तुरुंग सुरक्षित नसल्याचा संदेश जगभरात जावू शकतो. त्यामुळं अशा प्रकरणात आरोपींची जास्त काळजी घ्यावी लागते."
जगात कुठेही लपलेल्या आरोपीला भारतात आणता येतं : तहव्वूर राणाला भारतात आणणं म्हणजे, भारतात गुन्हा करुन जगात कुठेही लपलेल्या आरोपीला देशात फरफटत आणता येतं, हे जगाला दाखवून देण्यासारखं असल्याचं मत जैन यांनी व्यक्त केलं. राणाला दिल्लीतील तिहार किंवा मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात येईल, अशी चर्चा आहे. तर 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यामध्ये वृत्तांकन करण्यासाठी गेलेले व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल निर्मळ यांनी या हल्ल्याच्या भीषणतेबाबत 'ई टीव्ही भारत'शी संवाद साधला.
"तो दिवस अत्यंत धक्कादायक होता आणि तो अनुभव अविस्मरणीय होता. 26/11 चा दिवस आयुष्यात कधीही विसरु शकत नाही. मेट्रो चौकात व्हिडिओ चित्रीकरण करताना पोलिसांची गाडी आली, आम्हाला वाटलं पोलीस आहेत. मात्र, त्यात दहशतवादी होते. त्यांनी आमच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. त्यामध्ये माझ्या हाताला गोळी चाटून गेली होती. केवळ नशीब बलवत्तर म्हणून मी खाली झुकलो आणि बचावलो." - अनिल निर्मळ, व्हिडिओ जर्नलिस्ट, ई टीव्ही भारत
तहव्वूर राणाला फाशीची शिक्षा द्या : "26/11 हल्ल्याला इतकी वर्षे उलटली आणि आता तहव्वूर राणाला भारतात आणण्यात यश आलं. त्याच्याकडून सर्व माहिती पोलिसांनी काढावी आणि त्याला फाशीची शिक्षा सुनावली जावी," अशी अपेक्षा आणि मागणी अनिल निर्मळ यांनी व्यक्त केली. आता या आरोपीला कोणत्याही परिस्थितीत केवळ फाशीचीच शिक्षा दिली जावी, जेणेकरुन त्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या निष्पाप नागरिकांना न्याय मिळेल, अशी अपेक्ष मुंबईकरांनी व्यक्त केली.
हेही वाचा -
- मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वुर राणाला आज विशेष विमानानं भारतात आणणार; अमित शाह म्हणाले, "मोदी सरकारचं..."
- तहव्वुर राणाला आजच भारतात आणलं जाणार? एनआयएकडं राहणार मुंबई हल्ल्यातील मास्टरमाईंडचा ताबा
- मुंबईवरील हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणासमोरचे मार्ग संपले, प्रत्यार्पणाची शेवटची याचिका अमेरिकेत फेटाळली!