पुणे - ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच आज पुण्यातील राहत्या घरी निधन झालं. २०२१ मधे नाशिकमध्ये झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. खगोल शास्त्रासारख्या गहन विषयात त्यांनी केलेल्या संशोधनाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. केंब्रिज विद्यापीठातून भारतात आल्यानंतर 'आयुका' संस्थेची पुण्यात उभारणी केली. जयंत नारळीकर यांनी लिहिलेल्या मराठी विज्ञानकथांमुळे लहान मुलांमध्ये विज्ञानाची रुची निर्माण झाली. त्यांच्या सहजसोप्या आणि अभ्यासपूर्ण विज्ञानकथांचं गारुड वाचकांच्या तीन पिढ्यांवर कायम आहे.
ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ, साहित्यिक जयंत नारळीकर यांचे वडील, 'रँग्लर' विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ होते. ते वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचं शालेय शिक्षण वाराणसी तर उच्च शिक्षण ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात झालं. त्यांनी पीएचडीबरोबरच पित्याप्रमाणं 'रँग्लर' ही पदवी मिळवली. खगोलशास्त्रामधील प्रतिष्ठित असलेले टायसन मेडलवर नाव कोरलं. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात प्रमुख आणि पुणे येथील 'आयुका' संस्थेचे संचालक म्हणून महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोक संदेशात भारतीय खगोलशास्त्राचा अध्वर्यू निमाल्याची भावना व्यक्त केली. नारळीकर यांना श्रद्धांजली वाहताना मुख्यमंत्री म्हणाले,''भारतीय खगोलशास्त्राचा भक्कम पाया घालण्यात डॉ. नारळीकर यांनी अमूल्य योगदान दिले. गणितज्ज्ञ वडीलांकडून मिळालेला वारसा घेऊन डॉ. नारळीकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर खगोलीय शास्त्रातील संशोधनात मोलाची भर घातली. त्यांच्या संशोधनात्मक कार्याला जगभरातील विद्यापीठांनी, संशोधनात्मक संस्थांनी मान्यता दिली. भारतात परतल्यावर त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाने 'इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अस्ट्रोनॉमी अँड अस्ट्रोफिजिक्स (IUCAA)' "आयुका" या संस्थेच्या उभारणीची जबाबदारी सोपवली. तीही त्यांनी समर्थपणे सांभाळली. या संस्थेलाही त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात उत्कृष्टता केंद्र अशी ख्याती मिळवून दिली. ‘बिग-बँग थिअरी’ पर्यायी संकल्पनाही मांडली. त्यांनी आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघाच्या कॉस्मोलॉजी कमिशनचे अध्यक्षपदही भूषवले. डॉ. जयंत नारळीकर, पुणे या इतक्या पत्त्यावर त्यांच्याकडे लहानथोरांची शेकडो पत्र येत. या पत्रातील विज्ञान विषयक शंका-प्रश्नांचे ते आवर्जून समाधान करत. निखळ वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या प्रसारासाठी ते अखेरपर्यंत निरलसपणे कार्यरत राहीले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील वैज्ञानिक - भारतीय खगोलशास्त्राचे अध्वर्यू ते शाळा-महाविद्यालये-विद्यापीठांमध्ये पोहचून विज्ञान आणि त्यातील गणिती सिद्धांताच्या प्रसारासाठी झटणारा प्रसारक अशी त्यांच्या व्यक्तिमत्वाची व्यापकता होती. डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनामुळे भारतीय वैज्ञानिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. डॉ. नारळीकर यांच्या परिवारावरही आघात झाला आहे. या सर्वांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना महाराष्ट्राच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो," नारळीकर यांच्या कन्या गिरीजा यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधत मुख्यमंत्र्यांनी त्यांचं सांत्वन केलं. तसंच जयंत नारळीकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
नारळीकर यांच्यामुळे राज्याला वैज्ञानिक क्षेत्रात आघाडीचे स्थान: "प्रा. नारळीकर हे जागतिक पातळीवर खगोल शास्त्रात आपल्या संशोधनामुळे ओळखले गेले. त्यांचे कार्य भारतासाठी महत्त्वाचे होते. मराठी मातीच्या या सुपुत्राने खगोल शास्त्रात मारलेली झेप निश्चितच महाराष्ट्रासाठी अभिमानाची होती. राज्य शासनाला देखील त्यांनी वेळोवेळी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन केलं होतं. पुण्यात 'आंतरविश्व विद्यापीठ' स्थापना करून राज्यात विज्ञान संशोधनाची भक्कम पायाभरणी त्यांनी केली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे महाराष्ट्राला वैज्ञानिक क्षेत्रात आघाडीचे स्थान प्राप्त झाले. त्यांचे निधन हे राज्यासाठी आणि देशासाठी मोठी हानी आहे. नव्या पिढीतील वैज्ञानिक आणि खगोलशास्त्रज्ञ हे निश्चितच डॉ नारळीकर यांची प्रेरणा घेत राहतील असा मला विश्वास आहे" अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
वैज्ञानिक नभांगणातील तेजस्वी तारा निखळला- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील नारळीकर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ज्ञान-विज्ञानाच्या क्षेत्रात देशाला नव्या उंचीवर नेलं. विज्ञानाची सूत्रे, विज्ञानवादी विचार, वैज्ञानिक दृष्टीकोन नव्या पिढीमध्ये रुजवण्यासाठी जीवनभर कार्य केलं. विज्ञानाची रहस्ये सहज-सोप्या भाषेत मुलांना समजावून सांगितली. त्यांच्या निधनाने ज्ञान-विज्ञानाच्या प्रसारासाठी वाहून घेतलेला देशाच्या वैज्ञानिक नभांगणातील तेजस्वी तारा निखळल्याचं उपमुख्यमंत्री पवार यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे.
संशोधन मैलाचं दगड ठरलं- भौतिकविज्ञान, खगोलविज्ञानाच्या प्रसारासाठी त्यांनी स्थापन केलेली ‘आयुका’ संस्था ही देशाचं ज्ञानवैभव ठरली आहे. वैज्ञानिक क्षेत्रात स्थूलविश्वाचा उगम व बदलत्या स्वरूपावरच्या संशोधनामुळे जागतिक वैज्ञानिकांमध्ये ते आदरस्थानी होते. 'क्वासी स्टेडी स्टेट थिअरी'संदर्भातील त्यांचं संशोधन मैलाचं दगड ठरलं आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात मांडलेला विज्ञानवादी दृष्टीकोन, अंधश्रद्धेवरचा प्रहार कायम स्मरणात राहील. ‘महाराष्ट्रभूषण’, ‘पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’सारख्या मानसन्मानाने गौरवान्वित डॉ. जयंत नारळीकरांचं निधन ही देशाची कधीही भरून न येणारी हानी आहे. त्यांनी सुरू केलेलं विज्ञानप्रसाराचं कार्य पुढे सुरू ठेवणं, विज्ञानवादी दृष्टीकोन समाजात, विशेष करुन भावी पिढीमध्ये रुजवणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली.
पहिल्या पिढीतील खगोल शास्त्रज्ञ- खगोल अभ्यासक लीना अभ्यासक यांनी डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला. त्या म्हणाल्या, "डॉ. जयंत विष्णू नारळीकर हे खगोलप्रेमी आणि खगोल क्षेत्रात करियर करणाऱ्यांसाठी रोलमॉडेल होते. हे आम्ही दोन पिढ्यांपासून त्यांच्याबद्दल ऐकलं आहे. त्यांची पुस्तकं वाचली आहेत. डॉ. नारळीकर हे भारताचे पहिल्या पिढीतील खगोल शास्त्रज्ञ होते. साहित्यिक म्हणून देखील त्यांनी अभूतपूर्व योगदान दिलं. ते पुणे विद्यापाठीचे कुलगुरू होते. एक शिक्षणतज्ञ, साहित्यिक म्हणून त्यांचा मुलावर खूप चांगला परिणाम झाला."
तीन पिढ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण केली- जयंत नारळीकर यांच्या स्मृतींना उजाळा देत लीना बोकील पुढे म्हणाल्या, "आयुकामध्ये त्यांची अपॉईंटमेंट न घेता मला भेटता येत होतं. आम्ही परग्रहवासी, इतर विज्ञानाच्या विषयांवर चर्चा करायचो. त्यांच्यामुळे मला प्रेरणा मिळाली. मला खगोल अभ्यासक होता आले. त्यांच्यामुळे तीन पिढ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण झाली. पुढच्या पिढीसाठी त्यांचं काम खूप महत्त्वाचं आहे. ते सोप्या शब्दात विज्ञान समजावू सांगायचे. खूप शांत स्वभाव, हसरा चेहरा असायचा. ते एक समाधानी मनुष्य होते. 'पद्मभूषण' आणि 'पद्मविभूषण' गौरव कमावणाऱ्या जयंत नारळीकर यांच्या मृत्यूमुळे भारताचं आणि वैयक्तिक माझं मोठं नुकसान झालं आहे."
- जयंत नारळीकर यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन नागरिकांना उद्या 'आयुका'मध्ये घेता येणार आहे. उद्या त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.